चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?

यासंबंधी वराहपुराण आदिकृतवृत्तांत-महातप उपाख्यान-विनयकोत्पत्ति-२३ वा अध्याया मधील कथा अशी आहे–
पूर्वीं देव, ऋषि, मुनि कार्यारंभ करीत पण तें कार्य विध्नें येऊन नंतरच पूर्ण होई. सत्कार्यांत विध्न येऊन कार्य पूर्ण होई, तर असत्कार्यांत मात्र विध्न न येतांच ( इतर ठिकाणीं ) कार्य पूर्ण होत असे. तेव्हां सर्व देवादि असत्कार्यांत वि॑ध्न यावें यासाठीं आणि सत्कार्य निर्विध्न-पणें पार पडावें म्हणून विचारार्थ एकत्र आले. विचार करीत असतां त्यांना शंकरांकडे जाण्याची बुद्धि झाली.
ते कैलासाला जाऊन विनम्रपणें स्तुति करून म्हणाले, “ शंकरा, असत्कार्यांत विध्न आणण्यासाठीं तूंच समर्थ आहेस. ”
देवांचें तें बोलणें ऐकून शंकरांनी पार्वतीकडे आनंदानें पाहिलें. शंकरांनी पूर्वीं ब्रह्मदेवांनीं कथन केलेल्या शरीराचें स्मरण करतांच एक अत्यंत तेजस्वी, प्र॑ज्वलित मुखाचा, सर्व दिशा तेजाळून टाकणारा, साक्षात् रुद्रा-सारखा कुमार उत्पन्न झाला. तो उत्पन्न होतांक्षणींच स्वत:च्या कांतीनें, तेजानें, रूपानें, स्वत:च्या आकारानें, सर्वोना मोह निर्माण करीत हंसला. त्याचें विशेष सुंदर रूप पाहून चकित झालेली पार्वती त्याच्याकडे पहातच राहिली.
त्याचें तें अति सुंदर रूप पाहन आणि स्त्री – स्वभाव चंचल असतो हें जाणून त्याला शंकरांनीं शाप दिला कीं, “ तुझें तोंड गजाचें होईल आणि तुझें पोट मोठें होईल. ”


शंकरांच्या त्या रागांत हलूं लागलेल्या शरीरांतून जमिनीवर जें पाणी पडलें, त्यापासून तमाल-वृक्षाप्रमाणें निळ्या काळ्या रंगाचे, नाना प्रकारचे, नाना अस्त्रें धारण करणारे विनायक तयार झालें. त्यांनीं सारी पृथ्वी खवळून टाकली.
तेव्हां ब्रह्मदेव म्हणाले, “ देवहो! आश्चर्यकारी त्रिलोचन शंकरांकडून तुमच्यावर अनुग्रह झाला आहे. सुरद्बेष करणार्यांवर आणि विध्न निर्माण करणार्यांवर मात्र हा अनुग्रह नाहीं. ” नंतर ब्रह्मदेव शंकरांना म्हणाले, “ तूं या विनायकांचा स्वामी हो. हे तुझे अनुयायी होवोत. तुझ्या वरानें त्यांनीं सर्व व्यापलें आहे. त्यांना तूं अस्त्रें, आणि वर दे. ” एवढें बोलून ब्रह्मदेव निघून गेले.
नंतर शंकर त्या आत्म-पुत्राला – गजवक्त्राला म्हणाले, “ विनायक, विध्नकर, गजास्य, गणेश, भवपुत्र अशीं तुझीं नांवें आहेत. हे तुझे क्रूर दृष्टीचे, प्रचण्ड विनायकगण सर्व कार्यांमध्यें सिद्धि निर्माण करणारे आहेत. तूं सर्व यज्ञ्जयागंत व इतर कार्यांत पूजाप्राथम्य मिळवशील. नाहींतर कार्यांसिद्धि नष्ट करशील.” शंकरांनीं असें म्हणतांच सर्व देवांनीं सोन्याच्या घागरींतील पाण्यांनीं त्या गणनायकाला अभिषेक केला. शंकरांसमोर त्याची सर्व देवांनीं स्तुति केली.

देवा ऊचु: ॥
नमस्ते गजवक्त्राय नमस्ते गणनायक ॥
विनायक नमस्तेऽस्तु नमस्ते चण्डविक्रम ॥१॥
नमोऽस्तु ते विध्नकर्त्रे नमस्ते सर्पमेखल ॥ नमस्ते ॥
रुद्रवक्त्रोत्थ प्रलम्बजठराश्रित ॥
सर्वदेवनमस्कारात् अविध्नं कुरु सर्वदा॥२॥

सर्वांनीं अशी स्तुति केल्यानंतर शंकरांनींहि त्याला अभिषेक केला. पार्वतीनें त्याला आपलें अपत्य मानलें. हे सर्व चतुर्थी तिथीला घडलें म्हणून सर्व तिथींमध्यें चतुर्थी तिथि सर्वांत श्रेष्ठ आहे आणि वद्य पक्षातील चतुर्थील संकष्ट चतुर्थी म्हणतात.
शिवाय एकदां गणेश उंदरावर बसून जात असतांना पडले, ते पाहून चंद्र हसला होता त्यावेळेस त्याला गणेशानें त्याला शाप दिला होता की, कोणीही त्याचे तोंड पाहणार नाही, परंतु ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून गणेशाने उशाःप दिला, माझ्या प्रिय संकष्टीला तुला पाहून जो माझा उपवास सोडेल त्याला त्या उपवासाचें आणि माझ्या भक्तीचे पुण्य मिळेल. म्हणून संकष्टीला चंद्र पाहून उपवास सोडतात. या तिथीला तीळ खाऊन जो गणेशाची आराधना करतो, त्याच्यावर गणेश लवकर संतुष्ट होतो आणि वर सांगितलेले स्तोत्र जो म्हणतो त्याला व जो ऐकतो त्याला सुद्धां कोणतींही विघ्नें येत नाहीत. त्यामुळें कार्य निर्विघ्न होऊन पुण्यप्राप्ति पदरी पडते आणि पापांचा नाश होतो.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *