सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

601-11
जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥601॥
ज्याच्या अंगाचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे.
602-11
मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें । शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥602॥
मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून, भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून, भगवंताच्या अंगानेच शृंगाराला अलंकृत केले आहे.
603-11
इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥603॥
आकाशात उठलेला मेघ, जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो, तसा वैजयंतीमाळेने भगवान वेढलेला दिसतो.
604-11
आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥604॥
असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे आणि गोविंदा! तुझ्या हातांतील सुदर्शन चक्रही, सौम्यतेजाने कसे युक्त दिसत आहे.
605-11
किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥605॥
किंबहुना प्रभो ते असे तुझे रूप पाहण्याकरिता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे, म्हणून तू तसाच चतुर्भुज हो.


606-11
हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आंधले कृष्णमूर्तीलागीं॥606॥
हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते, तुझे पूर्वीचे श्रीकृष्णस्वरूप पाहण्याकरिता आतुर झाले आहेत.
607-11
तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे॥607॥
त्या साकार श्रीकृष्णस्वरूपावाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्णस्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते.
608-11
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं । म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥608॥
आता तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे विदेहमुक्ति- या दोहोंकरिता, तुझ्या सगुण साकार मूर्तीवाचून दुसरे काही लागत नाही; म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्णरूपाने प्रगट हो.
श्रीभगवानुवाच ।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् । । 11.47 । ।

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे (रूप) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही॥11-47॥
609-11
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥609॥
अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून, विश्वरूप भगवंताला आश्चर्य वाटले आणि भगवान म्हणाले, अर्जुना! तुझ्यासारखा अविचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही.
610-11
कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥610॥
अरे ! केवढी ही थोर वस्तू तुला प्राप्त झाली, त्याच्या लाभाचा संतोष तुला होत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने भयभीत होऊन, एखाद्या दुराग्रही माणसाप्रमाणे, हे काय बोलत आहेस, कळत नाही.


611-11
आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥611॥
खरोखर, आम्ही जेव्हा प्रसन्न होतो, तेव्हा सर्व आपल्या शरीरासह त्यांच्या स्वाधीन होतो. प्रसन्नतेवाचून असा जीवभाव, आम्ही कोणाकरिताच वेचत नसतो.
612-11
तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥612॥
पण आमच्या ठिकाणीं असलेले सर्व सामर्थ्य वेचन जे हे आम्ही विश्वरूपाचे ध्यान प्रगट केले, ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरिताच केले.
613-11
ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥613॥
तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही; म्हणून सर्वांपासून गुप्त अशा विश्वरूपाचीही जगात ध्वजा उभारिली.
614-11
तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥614॥
ते हे माझे विश्वरूप, सर्व आकाशादिक अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे व येथूनच हे कृष्णादिक अवतार होतात.
615-11
हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥615॥
हे विश्वरूप, संपूर्ण केवळ ज्ञानतेजाचेच विश्वात्मक झाले आहे. हे अनंत, अढळ असून सर्व ब्रह्मांडाचे मूळ होय.


616-11
हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना । जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां ॥616॥
अर्जुना!तुझ्यावाचून कोणी ते पाहिले नाही व ऐकलेही नाही; कारण ते साधनेने प्राप्त होण्याजोगे नाही.
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ।।11.48।।

अर्थ हे कुरुकुलश्रेष्ठा, वेदपठन, यज्ञयागादि, शास्त्रपठन, दान, श्रौतस्मार्तादि कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्यलोकांमधे तुझ्यासशिवाय दुसर्‍या कोणालाही दिसणे शक्य नाही.॥11-48॥
617-11
याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां ॥617॥
या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले, यज्ञही स्वर्गापासूनच मागे फिरले.
618-11
साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥618॥
याच्या प्राप्तीकरिता कराव्या लागणार्‍या योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत. असे पाहून, साधकांनी योगाभ्यासाचा मार्ग सोडला आणि वेदशास्त्राध्ययनानेही हे प्राप्त होत नाही.
619-11
सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥619॥
पूर्ण झालेली सत्कर्मे देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता लगबगीने धांवली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने कसातरी सत्यलोक गाठला.
620-11
तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें ॥620॥
तपांनी विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्रपणाची काही मात्रा चालत नाही हें जाणून, त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले. याप्रमाणे तपरूपसाधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले.


621-11
तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा ॥621॥
तुवां अनायासे- म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे विश्वरूप पाहिलेस, तसे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही.
622-11
आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं । हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥622॥
आज या विश्वरूपाच्या ध्यानसंपत्तीकरिता तूच एक जगात भाग्यवान निघालास, हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही.
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ।।11.49।।

अर्थ हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस. तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंत:करण होऊन पुन: तू माझे पूर्वीचे रूप पहा.॥11-49॥
623-11
म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ । हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं॥623॥
म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज. विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या विश्वरूपावाचून दुसरे काही चांगले आहे, असे मनातही आणू नकोस
624-11.
हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि? ॥624॥
अमृताने भरलेला समुद्र, अकस्मात प्राप्त झाला असता, त्याच्यात बुडून प्राण जाईल, कोणी त्याचा त्याग केला आहे का?
625-11
नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ॥625॥
किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता, एवढा थोर पर्वत नेता येत नाही, म्हणून त्याची उपेक्षा करावी काय?

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading