ताटीचे अभंग सूची वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका

                       मुख्य अनुक्रमणिका

संत मुक्ताबाईचे ताटीचे अभंग

१ – संत जेणें व्हावें–

२ – योगी पावन मनाचा

३ – सुखसागरी वास झाला

४ – वरी भगवा झाला नामें

५ – संत तेचि जाणा जगीं

६ – एक आपण साधू झाले

७ – ब्रह्म जैसें तैशा परी

८ – सुखसागर आपण व्हावें

९ – सांडी कल्पना उपाधी

१० – गिरीगव्हारे कशासाठीं

११ – अहो क्रोधे यावें कोठें

१२ – अवघी साधन हातवटी

योगी पावन मनाचा

मुक्ता, नावाप्रमाणेच मुक्त असलेली निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानाची ही सर्वात धाकटी बहिण. वयाने धाकटी असली तरी मोठमोठयांचा नक्षा आपल्या ज्ञानाच्या अधिकारावर क्षणात उतरवून टाकणारी ती तेजस्वी मूर्ती होती.

अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१ साली शुक्रवारी म्हणजेच इ. स. १२७९ ला जणू काही आदिशक्ती मुक्तेच्या रुपाने इंद्रायणीतिरी सिद्धबेटावर जन्माला आली. ज्ञानाने लखलख करणारी आकाशीची वीजच जणू चांदण्यांचा शीतल साज लेवून आपल्या ज्ञानी भावंडांना साथ देण्यासाठी भूतलावर अवतरली.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार भावंडांमध्ये मुक्ता सर्वात धाकटी. परंतू आळंदीच्या ब्राम्हणांच्या सांगण्यानूसार जेव्हा त्यांच्या आई बाबांनी त्रीवेणी संगमात देहत्याग केला, तेव्हापासून या असाधारण कुटुंबाचे गृहिणीपणाची जबाबदारी मुक्तेवर पडली. त्यामुळे खेळण्या बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आले.

मुक्तेने आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. म्हणुनच तर पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे ज्ञानदादाचा मनावर बिंबवले. ही समजूत घालत असताना मुक्तेने उस्फुर्तपणे जे अभंग गायले तेच पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले. ताटीच्या अभंगात मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्तेने जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.

TATICHE ABHANG SANT MUKTABAI

१ – संत जेणें व्हावें –

संत जेणें व्हावें ।
जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण ।
जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें ।
तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी ।
आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

२ – योगी पावन मनाचा

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही ।
संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

३ – सुखसागरी वास झाला

सुखसागरी वास झाला ।
उंच नीच काय त्याला ॥१॥
अहो आपण जैंसे व्हावें ।
देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ ।
स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले ।
त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें ।
वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले ।
एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥

४ – वरी भगवा झाला नामें

वरी भगवा झाला नामें ।
अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू ।
जगीं विटंबना बाधू ॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें ।
विवेक नांदे त्याच्या सवें ॥३॥
आशा दंभ अवघें आवरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

५ – संत तेचि जाणा जगीं

संत तेचि जाणा जगीं ।
दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना ।
जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी ।
शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

६ – एक आपण साधू झाले

एक आपण साधू झाले ।
येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ ।
अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां ।
विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं ।
मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

७ – ब्रह्म जैसें तैशा परी

ब्रह्म जैसें तैशा परी ।
आम्हा वडील भूतें सारी ॥१॥
अहो क्रोधें यावें कोठे ।
अवघे आपण निघोटे ॥२॥
जीभ दातांनी चाविली ।
कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥
मन मारुनी उन्मन करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

८ – सुखसागर आपण व्हावें

सुखसागर आपण व्हावें ।
जग बोधें निववावें ॥१॥
बोधा करुं नये अंतर ।
साधू नाहिं आपपर ॥२॥
जीव जीवासी पैं दयावा ।
मग करुं नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्तीं धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

९ – सांडी कल्पना उपाधी

सांडी कल्पना उपाधी ।
तीच साधूला समाधी ॥१॥
वाद घालावा कवणाला ।
अवघा द्वैताचा हो घाला ॥२॥
पुढे उमजेना काय ।
उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी ।
भूतें बापुंडी शेजारी ॥४॥
अवघी ईश्वराची करणी ।
काय तेथें केलें कोणीं ॥५॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥

१० – गिरीगव्हारे कशासाठीं

गिरीगव्हारे कशासाठीं ।
रागें पुरवीली पाठी ॥२॥
ऐसा नसावा संन्यासी ।
परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥
घर बांधिलें डोंगरीं ।
विषया हिंडे दारोदारीं ॥४॥
काय केला योगधर्म ।
नाही अंतरी निष्काम ॥५॥
गंगाजळ ह्रदय करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥

११ – अहो क्रोधे यावें कोठें

अहो क्रोधे यावें कोठें ।
अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसें कळलें उत्तम ।
जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिलें चरणीं ।
नये दावितां करणीं ॥३॥
वेळे क्रोधाचा उगवला ।
अवघा योग फोल झाला ॥४॥
ऐशी थोर दृष्टी धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

१२ – अवघी साधन हातवटी

अवघी साधन हातवटी ।
मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला ।
दुरी नाही देव त्याला ॥२॥
कोणी कोणास शिकवावें ।
सार साधुनिया घ्यावें ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई ।
जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥
तुम्ही तरुनी विश्व तारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

ज्ञानियांच्या राजाची समजूत घालण्याच्या निमित्ताने ताटीच्या अभंगांमधून जगाला ईतका मोलाचा संदेश देणारी चिमुरडी मुक्ता तेव्हा जेमतेम नऊ दहा वर्षांची असेल.

मुक्ता अतिशय स्पष्टवक्ती होती. एकदा ज्ञानदेवादी भावंडं पंढरपूरला गेली असताना तिथं त्यांना संत नामदेव भेटतात. त्यांना ज्ञानदेव नमस्कार करतात पण नामदेव त्याना नमस्कार करीत नाहीत. आपण ज्येष्ठ भक्त असल्यानं ज्ञानदेवांनी आपल्याला नमस्कार करणं योग्यच आहे, असं नामदेवाला वाटतं. ही गोष्ट मुक्ताईला रुचत नाही. ती नामदेवाला म्हणते –

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाही गेला?
मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हातीं घेसी।।
परब्रह्मसंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्याचे डोहळे का बाट जाले?
कल्पतरुतळवटी इच्छिली ते गोष्टी। अद्यापि नरोटी राहिली कां?
घरी कामधेनू ताक मागूं जाये। ऐसा द्वाड आहे जगामाजी।।

अशी नामदेवांची कानउघाडणी करुनच मुक्ताई थांबत नाही तर नामदेवांना भक्तीचं खरं मर्मच कळलं नाही, त्यासाठी योग्य गुरुपाशी जाऊन उपदेश आणि मार्गदर्शन घ्यायला हवं असा सल्लाही ती देते –

झालासी हरिभक्त तरी आम्हा काय? आंतुली ती सोय न ठाउकी।
घेउनि टाळदिंडी हरिकथा करिसी। हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे।।
गुरुवीण तुज नव्हेचि गा मोक्ष। होशील मुमुक्षु साधक तूं।
तुझ रुप तुवां नाही ओळखिलें। अहंतेतें धरिले कासयासी?

मुक्तेने केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी विसोबारायांना आपला गुरु केले.

जी गत भक्तराज नामदेवांची, तीच गत योगिराज चांगदेवांची. योगसामर्थ्याने चौदाशे वर्ष जगणार्‍या चांगदेवाचं कोरं पत्र पाहताच ती उद्गारली, “अरेरे… एव्हढी चौदाशे वर्ष जगूनही हा चांगदेव योगी कोरडाच राहीला.”. याच कोर्‍या कागदावर ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्या लिहून चांगदेवाला पाठविल्या. आणि या चौदाशे वर्ष म्हातार्‍या बाळाने चिमुरडया मुक्ताईला आपला गुरु केलं.

मुक्तेने केलेल्या अभंगांची संख्या मोजकीच असली तरी तिची अभंगरचना अतिशय प्रासादिक आणि रसाळ आहे. तिच्या अभंगांच्या ओळीओळीतून, शब्दाशब्दांमधून तिचा अध्यात्मामधील अधिकार, तिचे योगसामर्थ्य, तिची प्रौढ आणि प्रगल्भ जाण, तिचा आत्मविश्वास जाणवतो.

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

भजनी मालिका मंगलचरण 1, 2, 3

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading