गुरुवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

guruwarche-abhang-warkari-bhajni-malika/

गुरुवार चे अभंग-सूची

अभंग संख्या : ३५

ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा
अजानवृक्षांची पाने जाण । जो
अहो सखीये साजणी । ज्ञानाबाई
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं
उभारिला ध्वज तिही लोकावरी
काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील
ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी
ज्ञानदेव म्हणता माया । गेलि
ज्ञानराज माझी योग्यांची माउली
ज्ञानाचा सागर । सखा माझा
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ
तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
\पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा
भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव
म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती
यात्रे अलंकापुरा येती । ते
विश्रांतीचे स्थान संतांचे माहे । तें या
शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष
संदेह गमला । रेडा कैसा बोलविला
सदाशिवाचा अवतार । स्वामी
सर्व सुखाची लहरी
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष

गुरुवार चे अभंग प्रारंभ

1.            उभारिला ध्वज तिही लोकावरी

उभारिला ध्वज तिही लोकावरी ।
ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ॥१॥
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ।
मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा ॥२॥
धरुनी सगुणरुपे केली बाळक्रीडा ।
बोलविला रेडा निगमवाचे ॥३॥
बैसुनिया वरी चालविली भिंती ।
चांगदेवाप्रति दीली भेटी ॥४॥
मग वास केला अलंकापुरासी ।
पिंपळ द्वाराशी कनकाचा ॥५॥
नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष ।
नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥

2.            नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ।
निवृत्ती उदारा सोपान देवा ॥१॥
नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी ।
आदित्रय जननी देवाचिये ॥ धृ ॥
जगदोध्दारालागी केला अवतार ।
मिरविला बडिवार सिद्धाईचा ॥३॥
निळा शरणागत म्हणवी आपुला ।
संती मिरविला देऊनि हाती ॥४॥

3.            ज्ञानियांचा राजा गुरु महाराव

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्‍हणती ज्ञानदेव तुम्‍हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायीची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रह्मंदिक जेथें तुम्‍हां ओळंगणे । इतर तुळणें कायं पुरे ॥३॥
तुका म्‍हणे नेणें युक्‍तीची ते खोली । म्‍हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥

4.            कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा

कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा ।
चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥
ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं ।
सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥
चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती ।
मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥
रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला ।
शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥
गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन ।
चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥

5.            म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती

म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती । चालवणे भिंती बैसोनिया ॥१॥
नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातीचा मूर्ति जेवीं ॥२॥
उदकामाजी वह्या ठेऊनि कोरड्या । दाखवणे रोकड्या विश्वजनां ॥३॥
निळा म्हणे तिहीं संगेचि तारणे । दीनें उद्धरणे नवल कोण ॥४॥

6.            तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे

तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे । जगी सुर्य जैसे प्रकाशले ॥१॥
धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥२॥
उपजतांचि ज्ञानी हें वर्म जाणोनी । आले लोटांगणी चांगदेव ॥३॥
प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वाद । बोलविला वेद म्हैशीपुत्रा ॥४॥
संस्कृताची गांठी उकलोनि ज्ञानदृष्टि । केलीसे मराठी गीता देवी ॥५॥
नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे । एकवेळा जाइजे अलंकापुरा ॥६॥

7.            जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ

जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐंसें बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुध्द अंगी ॥२॥
जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥४॥

अर्थ:
संतशिरोमणी जगदगुरू तुकोबारायांनी, सर्व वारकऱ्यांची माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती, शक्ती आणि महती सांगण्यासाठी या अभंगाची रचना केली आहे. तुकोबा म्हणतात, माऊलींची शक्ती, कीर्ती काय वर्णावी? माऊलींच्या दारात उभा राहिल्याने ते पिंपळाचे झाड सोनियाचे झाले आहे. कारण सातत्याने माऊलींच्या मुखातून होणारा जप, नामघोष ऐकून तो पिंपळ इतका पवित्र झाला आहे की त्याला सोन्यापेक्षाही महत्व प्राप्त झाले आहे. वारकरी संप्रदाय या पिंपळाची पाने शिरी लावून भक्तिभावाने जपून ठेवतात. ही त्या पिंपळाची एक प्रकारची भक्तीच आहे.

भक्तीच्या नऊ प्रकारापैकी ही श्रवण भक्ती. जर सामान्य माणसाने भजन, कीर्तन, प्रवचन, इ. श्रवण केले तर त्याचे आयुष्यही असेच या पिंपळासारखे सोन्याचे होईल. माऊलींच्या अंगी इतके बळ होते की त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. काही लोक सांगतात कि माऊलींनी रेड्याच्या मुस्काटात मारली आणि रेडा वेद बोलू लागला. हे असे नाही तर माऊलींनी रेड्याच्या माथ्यावर हात ठेवताच रेडा वेद बोलू लागला. हे कसले बळ माऊलींच्या अंगी होते? तर हे आत्मिक बळ होते जे जप, तप, भक्ती याद्वारे माऊलींनी प्राप्त केले होते. एकप्रकारे माऊलींनी भक्तीची शक्ती याद्वारे दाखवून दिली आहे. या भक्तीच्या शक्तीनेच माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. जर माऊलींच्या कृपेने रेडा वेद बोलू लागतो, तर तुम्हा आम्हा माणसांवर माऊलींची कृपा झाली तर निश्चितच त्या परमेश्वराचे ध्यान आणि ज्ञान आम्हाला प्राप्त होईल.


आणि हे काही कुण्या राजा महाराजाला शक्य आहे असे नाही . त्यांनी त्यांची कोणतीही शक्ती वापरली तरी त्यांना हे शक्य नाही. त्यासाठी अंगी शुद्ध बीज असायला हवे. तुकोबाराय म्हणतात, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ‘ । हे शुद्ध बीज यावे कुठून? तर भक्ती, जप, तप आणि साधनेने षड्रिपूंवर विजय मिळविल्यानंतर ही शुद्ध सात्विक बीजे निर्माण होतात आणि या बीजांपासून जी संतती निर्माण होते त्या संततीच्या अंगी असे बळ निर्माण होते. त्यालाच अशी शक्ती प्राप्त होते जी माऊलींच्या अंगी होती. अशी माणसेच तप आणि साधनेने ही शक्ती प्राप्त करू शकतात.
अशा या महात्म्याने मुक्तीची एक पायवाट बनविली आहे. आणि या वाटेवर तो एकटा चालत नाही तर लाखो करोडो भक्तांची मांदियाळी गोळा करून त्यांना ही भक्तीची, मुक्तीची वाट दाखवतो आहे. संत जनाबाई म्हणतात, ‘ महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर । ‘ असा हा अवतारपुरुष सर्व भक्तजनांना सवे घेऊन या मुक्तीच्या वाटेवर चालतो. या वाटेवर चालून पाप-पुण्य आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्यातून आम्ही स्वत:ला वाचवू शकतो.


तुकोबाराय म्हणतात, अशा या भक्तीच्या महामार्गावर आपण चाललो तर आपले चित्त शुद्ध राहील. आपल्या चित्तात समाधान नांदेल आणि असे समाधान ज्याच्या चित्ती आहे अशा मानवाला सुखाची काय कमी आहे? माणूस आज सुखाच्या मागे धाव धाव धावतो आहे. पण खरे सुख त्याला प्राप्त होत नाही. जर हे परमार्थिक सुख प्राप्त करावयाचे असेल तर या भक्तीच्या वाटेवर संपूर्ण श्रद्धेने चालायला हवे. मनाचे समाधान हेच खरे सुख. इथे माझ्याच एका कवितेच्या काही ओळी द्याव्याशा वाटतात.
सुखा अरे सुखा
तुला शोधले मी फुका
तू तर राहतो माझ्या
मनाच्या कोपऱ्यात एका

अशा प्रकारे तुकोबारायांनी या अभंगातून माऊलींच्या भक्ती आणि शक्तीचे गुणगान गाइले आहे. अशा सर्व शक्तिमान अवतार पुरुषाला माझे साष्टांग दंडवत ।

8.            सर्व सुखाची लहरी 

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥
शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानबाई आई ॥३॥
ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

9.            सदाशिवाचा अवतार स्वामी
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥

10.      शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव पाही 

शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव पाही । ब्रम्हा तो सोपान मुळ माया मुक्ताई ॥१॥
धन्य धन्य धन्य निवृती राया । धन्य ज्ञानदेव सोपान सखया ॥२॥
प्रत्यक्ष पैठनी भटा दावीली प्रचिती । रेङियाच्या मुखी बोलविली वेद श्रुती ॥३॥
चोदासे वरूषाचे तप्तीतीर रहीवासी । गर्व हरावया चालविले भितीसी ॥४॥
धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची । भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणोनिया ॥५॥

11.      ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा

ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा ।
ज्ञानाज्ञान विरहिता ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा ।
ज्ञानाग्निने पापे जळती ही ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ।
वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे तो ॥धृ.॥
नररुपे विष्णु अवतरला हा भगवान ।
नदि नद वापी कूप पाहता उदक नोहे भिन्न ।
नवल हेचि पशु म्हैसा करितो वेदाध्यन ।
नमन करुनि सद्भावे जपता होय विज्ञान ॥२॥
देवाधिदेव भगवान भक्तांप्रती वर दे ।
देता वर ब्रह्मांडीँ ब्रह्मानंद कोँदे ।
देशिकराज दयानिधी अलंकापुरी जो नांदे ।
देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥
वक्ते श्रोते ग्रंथपठणेँ पावती समभाव ।
वर्णू जाता अघटित महिमा होतो जीव शीव ।
वंदूनि अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव ।
वर्षती निर्झर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव ॥४॥

12.      यात्रे अलंकापुरा येती । ते आवडी 

यात्रे अलंकापुरा येती । ते आवडी विठ्ठला ॥१॥
पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ॥२॥
भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या ॥३॥
निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी ॥४॥

13.      आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ॥ दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ॥ तो सुख सोहळा काय वानू ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव ॥ स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया ॥ विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥

14.      माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव

माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥
तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥
तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥
श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥

15.      ज्ञानराज माझी योग्यांची माउली

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥

16.      काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविलें ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्धारा बोलविलें ॥३॥
नामा ह्मणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥

17.      ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ

ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ ॥१॥
ऐसें बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥
ज्ञानोबाचें पायीं । मिठी घाली गंगाबाई ॥३॥
नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायीं ॥४॥

18.      गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या

गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥
परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥

19.      ज्ञानदेव म्हणता माया । गेलि

ज्ञानदेव म्हणता माया । गेलि समूळ विलया ॥१॥
संत महिमा वर्णू किती । निर्जीव चालवली भिंती ॥२॥
जड मूढ उद्धरीले । रेङ्यामुखी वेद बोलवीले ॥३॥
म्हणे नामयाचा नारा । नमन माझे ज्ञानेश्वरा ॥४॥

20.      ज्ञानाचा सागर । सखा माझा

ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें । बा माझ्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

21.      अहो सखीये-साजणी । ज्ञानाबाई

अहो सखीये साजणी । ज्ञानाबाई हो हरणी ॥१॥
मज पाडसाची माय । भक्तिवत्साची ते गाय ॥२॥
का गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बैसले दळणी । धाव घाली म्हणे जनी ॥४॥

22.      भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने

भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगलमुनी । सेवा करी दासी जनी ॥३॥

23.      सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष

सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त मायामोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥
चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

24.      धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग

धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझें ॥१॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळें ॥२॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥
सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें । ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती ॥४॥

25.      ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेवे ॥४॥

26.      ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा

ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों । पावन झालों चराचरीं ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥
एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥

27.      विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या

विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या भूमीवर अलंकापुर ॥१॥
तये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥
सिद्धेश्वर स्थान दरुशनें मुक्ति । ब्रह्मज्ञान प्राप्ति वटेश्वर ॥३॥
चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥
तयासी नित्यतां घडता प्रदक्षणा । नाहीं पार पुण्या वास स्वर्गी ॥५॥
अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनी तीर्थराज ॥६॥
ऐशिया स्थळी समाधि ज्ञानदेव । एका जनार्दनीं ठाव अलंकापुर ॥ ७ ॥

28.      कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥

29.      अजानवृक्षांची पाने जाण । जो

अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाहीं ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेके ॥
तो होय ज्ञानी अधिकें । येथे संशय नाहीं ॥२॥
मनकर्णिका भागीरथीं । इंद्रायणीचें स्नान करिती ।
तें मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥
अश्वत्थ सिद्धेश्वर । समाधीसी करी नमस्कार ।
तो पावे मोक्ष पैं सार । येथे संशय नाही ॥४॥
येथीचें वृक्षपाषाण । तें अवघे देव जाण ।
म्हणे एका जनार्दन । येथे संशय नाहीं ॥५॥

30.      संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष

संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥
एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥

31.      श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो

श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्‍हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥
एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठाव अलंकापुरीं ॥६॥

32.      उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं

उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥
केला भगवद्गीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥
बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥
एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥

33.      तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी

तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं ।
तया सायुज्यता मुक्ति । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव ।
तया ब्रह्मपदी ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥
सोपान ही तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें ।
तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥
मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥
ऐसी ही चौदा अक्षरें । जो ऐके कर्ण विवरें ।
की उच्चारी मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥
एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम ।
तयास पुन्हा नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥

34.      पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा

पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा कीर्ती हे तुमची ॥१॥
अचेतन भिंती चालवणे । हेहीं करणें विचित्र ॥२॥
तेरा दिवस उदकीं ठेवा । कागद देवा कोरडे ॥३॥
निळा म्हणे नारायण । ब्राम्हणजन तुम्हा घरी ॥४॥

35.      संदेह गमला । रेडा कैसा बोलविला

संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ॥१॥
सांगा देव कां न होती । निर्जीव चालविली भिंती ॥२॥
कोरडे कागद । उदकी लागों नेदी बुंद ॥३॥
निळा म्हणे बरा । द्यावा संतांपायीं थारा ॥४॥

गुरुवार चे अभंग समाप्त

सात वाराचे अभंग पहा

संपूर्ण भजनी मालिका



1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *