सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४५१ ते ४७३ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

451-16
तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥ 451 ॥
ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातींत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला ! 51
152-16
तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें । तंव तोचि आणिकीकडे । मरणें नेला ॥ 452 ॥
त्याप्रमाणे विषयांच्या लालचीने त्याने परलोक तर लाथाडलाच; पण विषयभोग तरी घडेल म्हणावें तर इतक्यांत त्यास मृत्यूने गांठलें ! ( सारांश, दोन्ही अंतरला!) 52
453-16
एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो? ॥ 453 ॥
ह्याप्रमाणे, परलोक किंवा स्वर्ग नाहीं व ऐहिक विषयभोगही नाही, अशा स्थितीत मोक्षाची गोष्टच कशाला पाहिजे? 53
454-16
म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेवूं पाहे सळें । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥ 454 ॥
म्हणून कामाच्या नादी लागून जो विषयांचे बळाने सेवन करू पाहतो, त्याला विषयही नाहीं व स्वर्गही नाही असे होते; उद्धार तर. 54
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहाऱसि ॥ 16.24॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥16॥
अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला. ॥16॥
455-16
याकारणें पैं बापा । जया आथी आपुली कृपा । तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥ 455 ॥
म्हणून अर्जुना, ज्याला आपल्या स्वतःवरच कृपा करणे असेल त्याने वेदाज्ञेचे उल्लंघन करू नये. 55

456-16
पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते ॥ 456 ॥
पतीच्या मनोगताप्रमाणे वागल्याचे श्रेय जोडून त्यांतच पतिव्रता जसें आत्मकल्याणही साधिते. 56
457-16
नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना- । माजीं पैसे ॥ 457 ॥
किंवा श्रीगुरुवचनाकडे लक्ष्य देऊन त्याचे काळजीपूर्वक जतन (चिंतन) करणारा शिष्य जसा आत्मभुवनामध्ये म्हणजे स्वरूपच्या ठिकाणीं स्थित होतो. 57
458-16
हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरें जेवीं दिवा । पुढां कीजे ॥ 458 ॥
हेंही असो; आपलाच ठेवा खरा; पण सांपडावा असे वाटत असेल तर जसें दीपाचे सहाय्य घ्यावें लागतं, 58
459-16
तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणें श्रुतिस्मृति माथां । बैसणें घापे ॥ 459 ॥
तसे, अशेष पुरुषार्थाचा धनी होण्याची ज्याची इच्छा असेल त्यानें श्रुति व स्मृति ह्यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्या. 59
460-16
शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें । जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥ 460 ॥
शास्त्र ज्याचा निषेध करील ती राज्यासारखी वस्तूही तृणवत् मानावी व ज्याचा स्वीकार कर असे शास्त्रवचन असेल ती वस्तु विषाप्रमाणे असली तरीही आपला वैरी अहितकारी आहे असे म्हणू नये. 460

461-16
ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा? ॥ 461 ॥
अर्जुना, अशा वैदिकनिष्ठ पुरुषाला कधीतरी अनिष्टाची गांठ पडेल काय? 61
462-16
पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥ 462 ॥
हे पहा; अहितापासून रक्षण करणारी व हितबोध करून वाढविणारी अशी श्रुतीसारखी साऱ्या जगाची माउली कोणी नाहीच नाहीं. 62
463-16
म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी । तंव हे कोणें न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसीं ॥ 463 ॥
म्हणून जिच्या योगे ब्रह्मप्राप्ति होते अशा ह्या श्रुतीची कोणीही करू अवज्ञा नये आणि अर्जुना, तू तर तिचे विशेषच पालन कर. 63
464-16
जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें । जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि ॥ 464 ॥
कारण अर्जुना, शास्त्र सत्य व सार्थ आहे हे लोकांना स्पष्टपणे पटवून देण्याकरितां म्हणून महान् पूर्वपुण्याचरणाने तुझा येथे जन्म झाला आहे.64
465-16
आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें अपैसें । म्हणौनि आनारिसें । करूं नये ॥ 465 ॥
आणि सहज ओघानें तुं धर्मानुजहि आहेस; म्हणूनही तुझा त्याबद्दल विशेष आदर असावा. 65

466-16
कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं । अकृत्य तें कुडें लोकीं । वाळावें गा ॥ 466 ॥
कार्य काय व अकार्य काय हा विचार किंवा निर्णय शास्त्राज्ञे प्रमाणेच करावा व जें अकृत्य तें अनिष्ट मानून त्याचा त्याग करावा. 66
467-16
मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपुलेनि आंगें । आचरोनि आदरें चांगें । सारावें गा ॥ 467 ॥
व जे कर्तव्य असे ठरेल, तें आदरपूर्वक तू जातीने आचरून पुरें करावें. 67
468-16
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥ 468 ॥
कारण तुझे शुद्ध बुद्धि असून, तुझा आचार लोकांनीं प्रमाणभूत मानावा, असा तुझा व्यावहारिक अधिकारही आहे; व म्हणूनच लोकसंग्रहदृष्टयाही तुं निःसंशय योग्य आहेस. 68
469-16
एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥ 469 ॥
ह्याप्रमाणे आसुरी संपत्ति व तिचे परिणाम ह्यांचे देवांनीं अर्जुनास निरूपण केलें. 69
470-16
इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥ 470 ॥
ह्यापुढे तो पंडुकुमर जें कांहीं सद्भावपूर्वक विचारील तें सावधान चित्ते ऐकावें. 470

471-16
संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥ 471 ॥
श्रीव्यासाचे आज्ञे प्रमाणे संजयाने ह्या निरोपाने राजा धृतराष्ट्राचा जसा कालक्षेप केला तसा मीही तुमचा करीन. 71
472-16
तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥ 472 ॥
तुम्ही संतजन जर मजवर आपला कृपावर्षाव कराल तर तुम्हाला मान्य व्हावा अगर पटावा असा (व्याख्यान करणारा) मी ही होईन. 72
473-16
म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥ 473 ॥
म्हणून महाराज संतांस म्हणतात, आपले अवधान देऊन मज शिष्यावर प्रसाद व्हावा म्हणजे मी अनाथ राहाणार नाही. 473
॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः॥16॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-24 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 473 ॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *