ज्ञान अंतिम साधन आहे का?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

बुध्दीमंतांनी साधनेत सावध रहावे । ज्ञान हे जीवनाचे सर्वस्व नव्हे ॥

निव्वळ कर्मयोग करण्यामध्ये मनुष्याचे आयुष्य सार्थक होत नाही, त्यातच साधनेचा अंत होत ना ही. प्रामाणिकपणे केलेल्या कर्मयोगाने मानवाचे चित्त निर्मल होऊन त्याच्या प्रज्ञाचक्षूला मनःपटलाला प्रज्वलित करणारा ज्ञानाचा प्रकाश गोचर व्हायला सुरुवात होते. स्वतःच्या जीवनात कर्मयोगाचे काबाडकष्ट करण्याचे प्राथमिक ध्येय अज्ञानाचा अंधकार नाहीसा करुन ज्ञानाची पहाट उगविणे हे आहे. एकदा ज्ञानप्रबोधनाची पहाट झाली की कालांतराने जेव्हा तो ज्ञानसूर्य मध्यान्हीस येऊन डोक्यावर तळपतो तेव्हाकुठे आत्मबोध होण्याची शक्यता असते. त्यानंतर अजून काही करायची आवश्यकता नसते. परंतु ही अंतिम घटना घडण्यासाठी पहिल्यांधी अज्ञानाची रात्र संपणे जरुरी आहे. आपल्या कर्मयोगरुपी साधनेद्वारे आपण जणू पहाटेच्या दरवाज्यावर दस्तक देतो.

श्रध्दावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ गीता ३९:४ ॥

प्रत्येक साधकाला कर्मयोग समजून चालणार नाहीतर परंतु त्याचबरोबर त्याच्यापुढेही जायचे आहे. साधनेची पकड आणि त्यामधील स्वत्मानुभव हि सर्वांगीण प्रगती होय. कर्मयोग विशद केल्यानंतर ज्ञानाचे महत्व माहित असायला हवे. ‘सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥’. ज्ञानाचे महत्व, म्हनजेच या संसाराचे खरे रुप कळण्याचे महत्व विशद केल्यावर ते प्राप्त करायचे असल्यास साधकाला काय तयारी करावी लागते याबद्दल विवरण करताना श्लोकात म्हणत आहेत: ‘ज्याच्या मनात अपार श्रध्दा आहे आणि ज्याने आपल्या इंद्रियांवर संयम मिळविला आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होऊ शकते. ज्ञानप्राप्तीनंतर मनात पराकोटीची शांति उत्पन्न होऊन आत्मबोधाचा मार्ग मोकळा होतो.’

इथे बहुतांशी साधकांच्या मनात एक संशय उत्पन्न होण्याचा संभव आहे. तो म्हणजे ज्ञानप्राप्ती हीच साधनेची अंतिम अवस्था का नाही? एकदा ज्ञान मिळाले की आयुष्याचे सार्थक झाले असे का होत नाही? या प्रश्नामागे आपली अशी भूमिका आहे की एकदा ज्ञान मिळाले की ते परत कुठे जात नाही. अंधारात क्षणभर काजवा चमकून जातो तसे ज्ञान आपल्याला होईल असे कुणीही समजत नाही. अथवा अंगावर लक्षावधी रुपयांचे कर्ज असताना लॉटरीत अचानक मिळालेले पैसे संपून जातात तसे आपले ज्ञान आपल्या विचारसरणीवरील पूर्वसंस्काराचा नाश करता-करता नष्ट होईल असे कुणाला वाटत नाही. परंतु वास्तवात आपले ज्ञान काजव्यासारखे वा तात्पुरत्या हातात आलेल्या पैशासारखेच असते. अहो, या जीवनात सर्व काही अशाश्वत आहे, पराधीन आहे आणि यातून खरे सुख मिळणे असंभव आहे हे आपणा सर्वांना कधीनाकधी कळलेले आहेच की! हेचतर ज्ञान आहे.

पण म्हणून आपण स्वतःला परिपूर्ण समजतो का? आपल्या मनात कधीही न ढळणारी शांति आहे का? ‘नाही’ असेच उत्तर या दोन्ही प्रश्नांचे आहे. तेव्हा तात्कालीन दुःखदायक प्रसंगाने उत्पन्न झालेले ज्ञान मिळणे साधनेची अंतिम अवस्था नाही हे स्पष्ट होते. आणि आत्ता मिळालेले ज्ञान क्षणिक आहे का कायमचे आहे हे कसे कळणार? असा काही निकष नाही की अमुक एका काळाने ज्ञान आपोआप शाश्वत होईल.

विश्वामित्रांनी एवढी तपश्चर्या केली ते संसाराच्या व्यर्थतेचे ज्ञान मिळाल्यावरच. परंतु वर्षोनुवर्षे साधना करुनही शेवटी मेनकेच्या जाळ्यात ते फसलेच. म्हणजे त्यांना झालेले ज्ञान अचल नव्हते. तेव्हा आपण असे कधीही म्हणू शकत नाही की आता माझे ज्ञान स्थिर झाले आहे. ज्ञानाची स्थिरता पहायला आपणास ज्ञान आणि अज्ञान या दोन्हींपासून दूर गेले पाहिजे तरच त्यांचे निरीक्षण करता येईल. अज्ञानाचे निरसन म्हणजे ज्ञान असेल तर निरसन करण्यास ज्ञानाचा संपर्क अशा गोष्टीशी आला पाहिजे जी अज्ञानाने भरली आहे.

म्हणजे ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच पातळीवर आल्या की! तेव्हा नुसते ज्ञान होणे आपली अंतिम अवस्था होणे शक्य नाही हे आपण जाणून घेतले पाहिजे. ज्ञान आणि अज्ञान या द्वैतापलिकडे आपली जी तटस्थ अवस्था आहे तिकडे आपले लक्ष अखंड केंद्रित होणे म्हणजे आत्मबोधाची सुरुवात होणे आहे. जोपर्यंत मनात ज्ञान मिळविण्याची इच्छा आहे तोपर्यंत मनात अशांति आहे. भले हा अस्वस्थपणा चांगल्या गोष्टीच्या हव्यासाने आलेला असो, अशांति ही अशांतीच असते.

तुम्ही मित्राशी गप्पा मारण्यामुळे आगगाडी चुकवा वा शत्रूशी भांडल्यामुळे चुकवा, शेवटी तुमची गाडी चुकली हेच सत्य आहे!! त्याचप्रमाणे संसारात पुढे येण्यासाठी जी धडपड आपण करीत आहोत त्यामुळे अशांति येऊ दे वा परमार्थाचे ज्ञान मिळविण्याच्या आशेने व्यथा येऊ दे, आपण अशांत आहोत ही वस्तुस्थिती बदलत नाही. तेव्हा निव्वळ ज्ञानप्राप्तीमध्येच आपल्या जीवनाची सांगता होत नाही हे माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे.

ज्ञानप्राप्तीनंतर मनात शांति उत्पन्न होण्यासाठी साधक कुठल्या मार्गाने जातो याचे ज्ञान होईल. ( अभ्यास, ज्ञान, ध्यान, त्याग आणि शांति असा साधकाच्या प्रगतीचा क्रम दिला आहे) तेव्हा निव्वळ ज्ञानप्राप्तीने सर्वकाही प्राप्त होईल असे आपण कधीही मानू नये.

॥श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्री गुरुदेव दत्त॥ श्रीदत्तस्मरणं ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥ श्री गुरुदेवदत्त॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयाचरणर्पणमस्तु ॥

॥ॐॐॐॐॐ॥ आदिनाथ सांप्रदाय ॥ॐॐॐॐॐ॥
ॐ सखामाझापांडुरंग मठ, श्री अवधूतचिंतनदत्तात्रेयदिगंबर मंदिर, करंजखोल, महाड़, रायगड.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇