सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

201-13
किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥13-201॥
फार काय सांगावे? अशी लक्षणे तू ज्या पुरुषाच्या ठिकाणी पाहशील त्या पुरुषाचे व ज्ञानाचे एकच अंथरूण झाले आहे असे तू समज.
202-13
पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं । आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥13-202॥
साधकामधे असणारा अमानित्व हा जो गुण म्हणतात तो या लक्षणांनी जाणावा.
2) अदंभित्व, आता अदंभाच्या ओळखीकरता त्याच्या लक्षणांचा अभिप्राय सांगतो.
203-13
तरी अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥13-203॥
तर ऐक. अदंभित्व असे आहे, ज्याप्रमाणे लोभ्याचे मन आपल्या धनाविषयी इतके आसक्त असते की जीव गेला तरी तो आपली धन ठेवलेली जागा सांगत नाही.
204-13
तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं । तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें ॥13-204॥
अर्जुना, त्याप्रमाणे त्याच्या प्राणावर जरी संकट आले तथापि आपण केलेले पुण्यकर्म हे देहचेष्टेने अथवा वाचेने उघड करत नाही.
205-13
खडाणें आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना । कां लपवी पण्यांगना । वडिलपण ॥13-205॥
खोड्याळ गाईला आलेला पान्हा ती गाय जशी चोरते अथवा उतार वयाला आलेली वेश्या उतार वयाने रहाते काय? तर नाही, मग ती आपले उतार वय झाकते.


206-13
आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता जेवीं हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें ॥13-206॥
श्रीमंत मनुष्य एकटा अरण्यात सापडला असता तो जसा आपली श्रीमंती लपवतो अथवा कुलीन स्त्री जशी आपले अवयव झाकते,
207-13
नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥13-207॥
अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकून झाकतो, तसेच तो आपण केलेले दान पुण्य झाकून ठेवतो.
208-13
वरिवरी देहो न पूजी । लोकांतें न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे ॥13-208॥
वरवर देहाची पूजा करत नाही, (लोकांना फसवणारा बाह्यवेष धारण करून देहाला सजवीत नाही) व लोकांच्या मनाजोगते बोलून त्यांचे मनोरंजन करत नाही व आपण केलेला धर्म आपल्या वाचारूपी ध्वजेवर बांधण्याचे त्यास माहीत नसते. आपण केलेला धर्म तो आपल्या तोंडाने बोलून दाखवत नाही.
209-13
परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें । न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥13-209॥
आपण दुसर्‍यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करत नाही, आपण जो काही वेदशास्त्र वगैरेचा अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळवलेले पुण्य विकण्यास धजत नाही,
210-13
शरीर भोगाकडे । पाहतां कृपणु आवडे । एऱ्हवीं धर्मविषयीं थोडें । बहु न म्हणे ॥13-210॥
तो आपल्या शरीराला जे विषय भोग देतो त्यावरून त्याच्या उदारपणाचा अंदाज केला तर तो कृपण आहे असे वाटेल. परंतु धर्माच्या कामी त्याचे औदार्य पाहिले तर तो आपल्या जवळचे धन वगैरे खर्च करण्यास कमीपणा करत नाही थोडेफार असे म्हणत नाही.


211-13
घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड । परी दानीं जया होड । सुरतरूसीं ॥13-211॥
घरामधे सर्व गोष्टींची टंचाई दिसते, परंतु दानाच्या बाबतीत तो कल्पतरूशी प्रतिज्ञेने चढाओढ करतो.
212-13
किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥13-212॥
फार काय सांगावे? स्वधर्मामधे तो थोर असतो. योग्य प्रसंगी तो उदार असतो, आत्मचर्चा करण्यात हुशार असतो. एरवी इतर गोष्टीत तो वेडा असतो.
213-13
केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परी फळोनियां गाढें । रसाळ जैसें ॥13-213॥
केळीचे सर्व अंग हलके व पोकळ असे वाटते, पण या केळीला फळे आल्यावर ते केळीचे सर्व अंग रसाने दाट भरलेले असे वाटते.
214-13
कां मेघांचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । परी वर्षती नवल । घनवट तें ॥13-214॥
अथवा मेघाचे अंग पाहिले तर ते अगदी हलके व दिसण्यात वार्‍याने नाहीसे होईल असे वाटते, पण तेच मेघ एकदा का वर्षाव करायला लागले की जिकडे तिकडे आश्चर्यकारक रीतीने एकसारखे जलमय करून टाकतात.
215-13
तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी । एऱ्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥13-215॥
त्याप्रमाणे पूर्णतेच्या दृष्टीने तो पुरुष पाहिला तर इच्छा तृप्त होतात, एरवी पाहिले तर कमीपणाला तोच जागा आहे, त्याच्या येथे सर्व गोष्टींचे दारिद्र्य आहे.


216-13
हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढें ॥13-216॥
हे वर्णन पुरे. या वर सांगितलेल्या गुणांचा उत्कर्ष ज्याचे ठिकाणी असेल त्याच्या हाताला ज्ञान आले असे समज.
217-13
पैं गा गति अदंभपण । म्हणितलें तें हें जाण । आतां आईक खूण । अहिंसेची ॥13-217॥
अर्जुना अदंभपण ते हे समज.
3) अहिंसा, पूर्वमीमांसेने सांगितलेली अहिंसा -आता अहिंसेचे लक्षण ऐक.
218-13
तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं । आपुलालिया मतांतरीं । निरूपिली ॥13-218॥
आपापल्या निरनिराळ्या मतांचे निरूपण करताना पुष्कळ प्रकारांनी अनेक लोकांनी अहिंसा सांगितली आहे. ऐक.
219-13
परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा । मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे ॥13-219॥
परंतु त्यांनी सांगितलेली ही अहिंसा ही जशा वृक्षाच्या फांद्या तोडून मग त्या शाखांनी वृक्षाच्या बुडाशी त्या वृक्षाच्या रक्षणार्थ कुंपण करावे तशी आहे.
220-13
कां बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे । नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा ॥13-220॥
किंवा हात तोडून तो विकावा व जे पैसे मिळतील त्यांनी भुकेची पीडा शांत करावी अथवा देऊळ मोडून देवाच्या रक्षणाकरता देवळाच्या सामानाने आवाराची भिंत बांधावी.


221-13
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥13-221॥
त्याप्रमाणे हिंसाच करून अहिंसा उत्पन्न करावी असा हा निर्णय पूर्वमीमांसेने केला आहे.
222-13
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥13-222॥
पाऊस न पडल्यामुळे अतिशय पीडा होऊन त्यामुळे सर्व प्राणी जर्जर झाले, म्हणजे त्यावर उपाय म्हणून पाऊस पाडणारे पर्जन्येष्टी यज्ञ करावेत.
223-13
तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे? ॥13-223॥
तर प्राण्यांच्या बचावाकरता करावयाच्या यज्ञामधे आरंभीच जनावरांचे प्रत्यक्षपणेच प्राण घेतले जातात, अशा स्थितीत अहिंसेचे पलीकडचे तीर कसे दिसणार?
224-13
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥13-224॥
नुसती हिंसा पेरली असता तेथे अहिंसा उगवेल काय? (तर नाही). परंतु याज्ञिकांचे धाडस आश्चर्यकारक आहे.
225-13
आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥13-225॥
आयुर्वेदीय अहिंसा : आणि सर्व आयुर्वेदही (वैद्यकशास्त्रही) अर्जुना याच धोरणचा आहे. कारण की एका जीवाचे रक्षण करण्याकरता दुसर्‍या जीवाचा घात करावा असे तो प्रतिपादन करतो.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading