10 वाचावे असे भीष्मपंचकव्रत, तुळशी माळ कशी धारण करावी.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🌹 भीष्मपञ्चकव्रत व तुळशीमाळ धारण 🌹


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

कार्तिक शुक्ल एकादशीपासून पांच दिकस भीष्मपंचकव्रत करावे. हे शुद्ध एकादशीचे दिवशी व्रताला आरंभ करून चतुर्दशीने विद्ध नसून सूर्योदयव्यापिनी अशा पौर्णिमेचे दिवशी समाप्त करावे. जर शुद्ध एकादशीला आरंभ केला असता क्षयाचे योगाने दिवस कमी होऊन पौर्णिमेपर्यंत पाच दिवसांच्या व्रताची समाप्ति होत नसेल तर विद्ध एकादशीचे दिवशीही आरंभ करावा.

शुद्ध एकादशीचे दिवशी आरंभ केला असता दिनवृद्धीच योगाने प्रतिपदाविद्ध पौर्णिमा समाप्ति येईल तर सहा दिवस होतात, आणि व्रत तर पाच दिवसांचे आहे, याकरिता चतुर्दशी विद्ध पौर्णिमेला समाप्ति करावी. या व्रताचा प्रयोग कौस्तुभ वगैरे ग्रंथी पहावा. कार्तिक महिन्यामध्ये एकादशी इत्यादि पर्वणीचे दिवशी चंद्रबल व ताराबल पाहून शिव व विष्णु यांच्या मंत्रांची दीक्षा ग्रहण करावी. कारण

“कार्तिकामध्ये मंत्रदीक्षा घेतली असता ती जन्मापासून मुक्त करणारी म्हणजे मोक्ष देणारी होते” असे नारदाचे वचन आहे. या मासात तुलसीच्या काष्ठांची माला धारण करावी असे स्कंदपुराणातील द्वारकामाहात्म्यामध्ये व विष्णुधर्मामध्ये सांगितले आहे. “तुलसीच्या काष्ठांची माला केशवाला अर्पण करून नंतर जो मनुष्य ती भक्तिपूर्वक धारण करतो त्याचे पाप निश्चयाने रहात नाही.” मालेच्या प्रार्थनेचा मंत्र –

“तुलसीकाष्ठसंभूते माले कृष्ण जनप्रिये ।
बिभर्मि त्वामहं कण्ठे कुरु मां कृष्णवल्लभम् ॥”

या मंत्राने प्रार्थना केल्यावर कृष्णाचे कंठी अर्पण केलेली माला जो कार्तिक मासामध्ये यथाविधि धारण करतो तो विष्णुपदाला जातो. असे निर्णयसिंधूमध्ये स्पष्ट सांगितले आहे. आणि रुद्राक्षांच्या आकाराप्रमाणे केलेल्या तुलसीकाष्ठाच्या मण्यांची माला करून ती गळ्यामध्ये धारण केल्यावर पूजेला आरंभ करावा, तुलसीकाष्ठांच्या मालेने भूषित असा पितर अथवा देव यांची पूजा वगैरे करील तर त्याचे ते कर्म द्विगुणित होते” अशी जी पद्मपुराणामध्ये पातालखंडात ७९ व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष वचने आहेत .

हरिवासराच्या लक्षणाचे ठिकाणी वैष्णवांनीच हविवासर अवश्य पाळावा असे पुरुषार्थचिंतामणीमध्ये सांगितले आहे. आवळीच्या काष्ठांची माला धारण करण्याचा विधि जाणावा. रामार्चनचंद्रिका इत्यादि ग्रंथामध्ये तुलसीच्या काष्ठांचे मणि करून त्यांच्या मालेने जप करावा. इत्यादि विधिवाक्ये स्पष्ट आहेत; आणि अशीच दुसर्‍या ग्रंथांमध्येही बहुत आढळतात.

तसेच पूर्वी अग्रोदक, गंध, पुष्पे, अक्षता इत्यादि पूजा सामुग्री मिळवून हातपाय धुवून ज्याप्रमाणे सामर्थ्य असेल त्याप्रमाणे पीतांबर इत्यादि शुद्ध वस्त्र धारण करून अलंकार धारण केलेला असा मोत्ये, पोवळी, कमलाक्ष, तुळसीच्या काष्ठांचे मणि यांच्या माला कंठामध्ये धारण करून पूजेला आरंभ करावा, असे प्रयोगपारिजात ग्रंथामध्ये आह्निकांत पूजाप्रकरणी सांगितले आहे. याप्रमाणे सर्व देशांमधील वैष्णवांमध्ये तुलसीच्या काष्ठांची माला धारण करून जप करण्याचा सांप्रदायही आढळतो.

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *