गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गणेश स्थापना

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की ” आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस ” भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी ” तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत” करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने “संकष्ट चतुर्थी व्रत ” केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात.प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.


‘श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या १० व्या स्कंधाच्या ५६-५७ व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही.
चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा २१, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा.
सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।।
– ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय ७८
अर्थ : हे सुंदर सुकुमार ! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.’

अशोककाका कुलकर्णी

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *