नामपर अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

204.नामपर अभंग

भजन – गोविंद राधे गोविंद । जय गोपाळ राधे गोविंद

1546.कामामाध्यें काम । काहीं
कामामाध्यें काम । काहीं म्हणा रामराम । जाईल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ॥१॥ कळों येईल अंतकाळी । प्राण प्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडा पोरें सकळ ॥२॥ जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहेरे वोळसा । उगवूनी फांसा । काय करणें तें करी ॥३॥ केलें होतें याचि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे कर्में । जालोनियां तरसी ॥४॥


1547.कळे न कळे ज्या धर्म
कळे न कळे ज्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचे नाम । अट्टाहासें उच्चारा ॥१॥ तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोठा । पाहिजे तो चाळवळा ॥२॥ पुसतां चुका होतो वाटा । सर्वे बोळवा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं चुका चोरांसी ॥३॥ तुका म्हणे मोल नलगे । द्यावें वेंचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥४॥


1548.पडतां जड भारी । दासीं
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥२॥ हरिनामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥३॥ तुका म्हणे प्राण । करा देवासी अर्पण ॥४॥

1549.ब्रम्हरस घेईं काढा । जेणें
ब्रम्हरस घेईं काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥ पथ्य नाम विठोबाचें । आणिक वाचे न सेवीं ॥२॥ भाव रोगा ऐसे जाय । आणिक काय क्षुल्लकें ॥३॥ तुका म्हणे नव्हे बाधा । आणिक कदा भूतांची ॥४॥


1550.भक्तिभावें आम्ही बांधिलासे
भक्तिभावें आम्ही बांधिलासे गांठीं । सादावितों हाटी घ्यारे कोणी ॥१॥ सुखाचिया पेठे घातलें दुकान । मांडियेले वान रामनाम ॥२॥ सुखाचें फुकाचें सकळांचे सार । तरावया पार भवसिंधु ॥३॥ मागें भाग्यवंत झाले थोर थोर । तिहीं केला फार हाचि सांठा ॥४॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका म्हणे चित्त शुद्ध तरी ॥५॥

1551.फलकट तो संसार
फलकट तो संसार । तेथें सर भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥२॥ अवघें निरसुनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥४॥


1552.मुखीं नाम हातीं मोक्ष
मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची ॥१॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरां वस्तूंसी ॥२॥ भस्म दंड नलगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥३॥ तुका म्हणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥४॥

1553.देवा ऐकें हे विनंति
देवा ऐकें हे विनंति । मज नको रे हे मुक्ती । तया इच्छा गति । हेंचि सुख आगळें ॥१॥ या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रिद्धी सिद्धी द्वारीं । कर जोडुनी तिष्ठती ॥२॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अदभुत हा रस । कथाकाळी नामाचा ॥३॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघश्यामा । तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठीं ॥४॥

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *