मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीगणेशवाहन मूषक

गणेशाचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर आहे हे सर्वश्रुत आहेच. हे मूषक श्रीगणेशाचे वाहन कसे झाले याबाबत पुराणात दोन कथा आढळून येतात :

कथा १

एकदा इंद्रसभेत ‘क्रौंच’ नावाच्या एका गंधर्वाची वामदेव नावाच्या महर्षीस लाथ लागली, तेव्हा ‘तू उंदीर होशील’ असा त्यांनी शाप दिला. त्यामुळे तो गंधर्व (क्रौंच) उंदीर होऊन पराशर ऋषिंच्या आश्रमात येऊन पडला. त्याने आपल्या स्वभावधर्माप्रमाणे अनेक पदार्थ खाऊन त्या ऋषिंस फार त्रास दिला. ऋषिंच्या आश्रमातही तो उन्मत्तासारखा वागू लागल्यावर पराशरांनी श्रीगणेशस्मरण केले. गजाननाने आपला पाश त्य मूषकावर टाकला. तेव्हा उंदीर विव्हल झाला व गजाननाची करुणा भाकू लागला. यावर ‘तुला पाहिजे तो वर माग’ असे श्रीगणेश म्हटल्यावर स्वभावात परिवर्तन न करता उन्मत्त उंदीर म्हणाला, ‘मी तुम्हाला काही मागण्याऐवजी तुम्हीच मला वर मागा’ तेव्हा श्रीगणराज म्हणाले, ‘तू आजपासून माझे वाहन हो.’ लगेच गजानन त्याच्या पाठीवर बसला. त्याच्या भाराने तो अतिशय दीन झाला. या दिवसापासून उंदीर हे श्रीगणेशाचे वाहन झाले.
कुठल्याही मोठया माणासाने लहान वृत्तीच्या माणसाबरोबर भांडत बसण्याऐवजी त्याच्या कलेने घेऊन त्याचा उपद्रव थांबवावा हेच या घटनेतून सिद्ध होते.

कथा २

पूर्वी सौभरी नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची मनोमयी नावाची सौंदर्यवती व पतिव्रता स्त्री होती. एके दिवशी सौरभीऋषी वनात गेले होते त्यावेळी क्रौंच नावाचा एक गंधर्व त्यांच्या आश्रमाजवळ आला आणि त्याच्या दृष्टिस ती लावण्यवती मनोमयी पडताच त्याने एकटया असलेल्या मनोमयीचा हात धरला. तेव्हा त्या साध्वीने पति-आज्ञेशिवाय एकदम शाप न देता त्याला उपदेश करु लागली. इतक्यात सौभरी ऋषी तेथे आले. त्यांना तो प्रकार पाहून क्रोध आला, पण क्रौचाने त्यांची क्षमा मागितली. तेव्हा सौभरी ऋषींनी त्यास –
‘नीचा, मी आश्रमात नाही हे पाहून माझ्या पत्नीस धरलंस! आता तू उंदराच्या जन्मास जा आणि लोकांच्या दृष्टिआड राहून चोरुन-मारुन उदरभरण करीत राहा. तू मला शरण आला आहेस, म्हणून मी तुला शाप देत नाही, एवढंच’
या शापाप्रमाणे क्रौंचगंधर्वाला उंदराचा देह प्राप्त झाला आणि तो पराशर ऋषींच्या आश्रमात येऊन पडला.तो गजाननाजवळ गेला आणि मुनींच्या आर्शीवादाच्या सामर्थ्याने तो गजाननाचे वाहन बनला.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *