खुळी काठी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

खुळी काठी

मजी त्या गोष्टीला आता लईं दी झालंगा. तवाच्या येळंला कुळस्वामीला जायाचं लई याड मानसाला. इतकं की, स्वत्ताला पन विसरून जावावं एखाद्यानं. हो. तर एकदा काय झालं म्हनतासा की, कराडच्या संगमाव एकजन आंगुळीला आला. काय ? आला तर किष्णा कोयना एकमेकींला भेटतेल्या. मिठी मारून बोलतेल्या. किष्णाकोयनेचा संगम होतेला. पाणी कसं झप्पाट्यानं जात्यालं हं ! तर तिथं एक नवाल विपलं. अगदी. एक काठी, आपुन डांब खवाय घेतो तसली गा, तर ती त्या पाण्यातनं येतेली. जशी काय तरण्या पोरीनं पळावं अशी धावतेली. म्हणताना ह्येनं काय केलं की, काय हाय बगावं तरी म्हून पुढं झाला. पाण्यात उतरला. पुढं निघाला न् गपकिनी धरली त्येनं काठी हं ! धरली तर काय गंमत देवा सांगावी. त्या काठीच्या मधभागातनं भळाळा रगात यला लागलं ! तरवो ? स्वत्ता डोळ्यानं पाहिलंय म्हनावं न् ! भळाळा रगात येत्यालं बगून ह्येची नजार तारवाटली. बोबडी वळली. घाबारला न् म्हटला की, बायलामी ही काय गोष्ट झाली गा ? आनिक लागला की आरोडवरोड करून सारं गाव गोळा करायला !
झालं. सारं रान त्येच्या आरोळीनं दनानलं. तशी त्या काठीनं मुंडकं हालीवलं. म्हटली की, गप र्‍हा बाबा न् काय म्हनतीया ते ऐक. म्हणाताना ह्यो अवचितच गप का घार झाला न् झपाटलंच जणू काय ह्या भावनेनं गेला भेदरून. न्हवं काठी बोलत्याली न् मान हालीवत्याली बगून भेदरून जाईना मजी गा ? ह्यो झाला आच्यारी का विच्यारी. तशी मग पुनाच्यान ती काठी बोलली. म्हटली कशी, “ मला माज्या माणकूबाकडं न्हे बाबा. त्यो माजा बंदु हाय. मैनभावांची भेट घडीव. पदरी पुन्य पडल. आऊक्षवान होशील. लक्ष्मीआई म्हनत्यात मला. ”


तशी ह्यो हारखून टुम्म झाला. त्येनं त्या काठीचं पाय धरलं. म्हटला कीं, “ मानकूबा देव माजा कुळस्वामी. दंडवत घालीत तुला न्हेतो. ” आनिक मग त्येनं त्या काठीला घरात न्हेली. तिला न्हाली धुली. चांगला कपडा तिच्यावर चढिवला न् दारात वाजंत्री तुर्‍यांचा नुसता भडीमार करून सोडला. तशी मग सारं गाव त्येच्या दारात गोळा झालं. शिंगाडे काय आले, ढोलवाले काय आले न् नगारनौबत काय झडली विचारू नका.
मग त्या काठीची पूजा झाली. निवद झाला. पंक्ती उठल्या न् ही सारी जत्रा देवा मानकूबाच्या दर्शनाला निघाली. निघाली तर त्या माणसानं हिला आपल्या खांद्यावर धरली न् बाकीच्यांनी तिला टेकू दिला.
माणसं म्हटली की, ही काठी अशी कशी खुळी तवा एवढे सोपस्कर लागत्याती ? झालं. त्या काठीनं त ए ऐकलं. म्हणाली की, “ भावानं लईंदी न्हेली न्हाई तवा घेऊन जा म्हटले. आमच्यात मुराळी लागतो. जीवभावाच्या एकी तळमळीला तवाच रगात आलं न्हवं जी ? मी खुळी असू दे. माजा भाऊ भेटू दे मजी झालं. काय तर ! ” त्यासरशी मग सगळी माणसं तिच्याकडं कवितकानं बगायला लागली. म्हणाली कशी, “ शानी हाईस बाई. मैन भावांची पिरतच आगळी. शिताफ़ळ वरनं दिसतंया हिरवं, वाळकं, तडाकल्यालं. अन आतला गर काअ गुळमाट न् चवीचा. तशी हाय ही पिरत. ” काठीला ते बरं वाटलं.
आनिक सांगायचं मजी तिचा ह्यो पोरउमाळा बगून वरचं आभाळबी गहिवरलं देवा. त्येनं हुंदका दिला. अस्मानीचा ढग फ़ुटला न् मेवग्हारांनी ह्या काठीला न्हायाला घातली. माणसं पाक भिजून वलीचिंब झाली. पन कुणी हं म्हटलं न्हाई का आवाज केला न्हाई. देवानं कौल दिला म्हटली माणसं न् माणकूबाच्या नावानं चांगभलं करीत झम्माट्यानं निघाली.


वाटेत मग आडवी लागली नदी. ह्यांनी विसावा घ्यावा म्हटलं. काठीला खाली ठेवली. जेवले खावले. पानतंबाखू मळली. भजनकीर्तन झालं. आणिक मग पुन्हा हिला उचलून निघाले. निघाले तर काय सांगावं देवा ? नदी दुभंगली. गळ्याशप्पथ ! खुळ्या काठीचा पाय लागला न् ते पाणी फ़ाटलं. कापडाची शिवण उसावावी तस्सं. मग काय दुनियावन् दुनिया झाली न् माणसं तेच बोलत सुटली. गावोगाव ह्या काठीचा डंका पेटला. आवई उठली. खुळ्या काठीच्या दर्शनाला या म्हटले सगळी मिळून. आणिक सांगायचं मजई सगळ्या वाटा चारी बाजूंनी फ़ुलल्या. लहानमोठी, थोरली धाकली, गरीब शिरीमंत, राजारंक, अशी आपली झाडून पाक माणसं ह्या काठीला बघायला धावली.
होता होता ही घनदाट जत्रा पेठ गावाला आली. शिवरात्रीचा उत्सव झाला न् मग नाचत नाचत ह्या खुळ्या काठीनं त्या गावच्या माणकूबाला भेट दिली. त्या नाचानं धरणी हादरली न् मैनभावंडांचा मेळा बसला. त्याला बघून लोकांच्या डोळ्याचं पारणं फ़िटलं. सगळीकडे बोलबाला झाला. नवस बोलले गेले. मैनभावंडाच्या मायेला चढती दौलत येऊ दे. जनलोकांनी डंका पिटला. नागारनौबत झडली.
आमची कहाणी सरली. तिनं राया इंद्राची गोष्ट दिली. तुमची आमची तानभूक हरपली.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *