सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

326-16
आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा ॥ 326 ॥
मुळांत आग्रही स्वभाव आणि त्यांत मूर्खपणाची भर, मग अशा स्थितींत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे कोठवर वर्णन करावें? 26
327-16
जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥ 327 ॥
ज्याने दुसऱ्याला पीडा होईल किंवा ज्यांच्या जीवाला धोका पोचेल अशा कर्माविषयीं ज्यांची जन्मत:च प्रवृत्ति असते. 27
328-16
मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती । दाहीं दिशीं पसरिती । स्पृहाजाळ ॥ 328 ॥
मग आपल्या कृत्यांची चहूकडें बढाई मिरवितात आणि साऱ्या जगाला तुच्छ लेखतात आणि आपल्या इच्छा दाही दिशांकडे मोकळ्या सोडतात. 28
329-16
ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें । धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें ॥ 329 ॥
देवाप्रीत्यर्थ मोकळी सोडलेली गाय जशी निष्प्रतिबंध वाटेल तिकडे चरते, त्याप्रमाणे अशा अभिमानाच्या वृत्तीने आपलीं पापे वाढवीत जातात. 29
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ 16.11॥

330-16
याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥ 330 ॥
अशाच प्रकारच्या पापसाधनांनी त्यांची सर्व कर्मप्रवृत्ति असते आणि ज्यांचे चित्त मरेपर्यंत (परौती-पर्यंत) असंख्य चिंतांनीं व्याप्त असतें. 330
331-16
पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये सानें गगन । जें पाहातां त्रिभुवन । अणुही नोहे ॥ 331 ॥
या चिंतेचे स्वरूप पाहू जातां तें पाताळाहून खोल व गगनापेक्षाही उंच असून तिच्यापुढे विश्वाला अणूचीही उपमा शोभत नाही. (इतकी ती मोठी असते) 31
332-16
ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी । जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी ॥ 332 ॥
संन्यासाच्या योगपट दीक्षेस नियम व माप आहे; पण ह्यांची ही भोगपट चिंता हिला नियम नाही व मापही नाही; पतिव्रता स्त्री पतीला जशी कधीही अंतर देत नाही, तशी ही चिंता ह्यांना मरणापर्यंत सोडीत नाहीं. 32
333-16
तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवीं सूनि असार । विषयादिक ॥ 333 ॥
तसेच, असार अशा विषयांदिकांची मनांत लालसा धरून त्यांच्या प्राप्तीविषयींची अपार चिंता हे नित्य वाढवितात. 33
334-16
स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें । सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि ॥ 334 ॥
स्त्रीचे गाणे ऐकावें, तिचे सौंदर्य पाहावें. व सर्वांगाने तिलाच आलिंगन द्यावे. 34
335-16
कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें । नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला ॥ 335 ॥
ज्यावरून अमृतही ओवाळून टाकावें अशा स्त्रीच्या भोगापरतें दुसरें सुखच नाही असा त्यांच्या मनाचा निश्चय झालेला असतो. 35

336-16
मग तयाचि स्त्रीभोगा- । लागीं पाताळ स्वर्गा । धांवती दिग्विभागा । परौतेही ॥ 336 ॥
मग त्याच स्त्रीभोग प्राप्तीसाठी, स्वर्ग, पाताळ किंवा वाटेल त्या दिशेला धांवण्याची त्यांची तयारी असते. 36
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायाणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥16. 12॥

337-16
आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा । तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा ॥ 337 ॥
मोठया आशेने गळाला लावलेले आमिष कांहीही विचार न करतां मासा गिळतो व नाश पावतो, तशी विषयांची आशा ह्या जीवांची स्थिति करिते. 37
338-16
वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे ॥ 338 ॥
त्यांना इच्छित विषय तर कधीं प्राप्त होत नाहीतच, पण नुसत्या कोरडया आशेचे मनोरे रचून कोशकीटकाप्रमाणे बंधन मात्र पावतात. 38
339-16
आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं ॥ 339 ॥
आणि केलेली अभिलाषा अपूर्ण राहिली की त्यामुळेच चित्तांत द्वेष उत्पन्न होतो; एवंच काम आणि क्रोध ह्यावाचून अधिक कोणताच पुरुषार्थ त्यांच्या पदरात पडत नाहीं. 39
340-16
दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरीयां जैसा पांडवा । अहोरात्रींही विसांवा । भेटेचिना ॥ 340 ॥
अर्जुना, ठाणेदाराला ज्याप्रमाणे दिवसा कामगिरी व रात्री पहारा, मिळून अहोरात्र विसांवा मिळतच नाहीं. 340

341-16
तैसें उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमें । न माती केंही ॥ 341 ॥
तसेच, मोठमोठया आशेच्या पर्वतांवरून खालीं क्रोधाच्या टेकडयांवर आदळलें (निराशेनें क्रोधाविष्ट झाले) तरी, विषयांविषयींचे प्रेम इतकें अनावर असतें कीं त्या विषयीचे रागद्वेष कोठेही मावत नाहीत. 41
342-16
तेवींचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थें कीं ना? ॥ 342 ॥
त्याचप्रमाणें मनांत वाटेल तेवढे विषयभोगाचे बेत जुळविले तरी ते भोगणेकरितां तर द्रव्य पाहिजे कीं नको? 42
343-16
म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पैं गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥ 343 ॥
म्हणून त्या वांच्छित भोगांस लागणारें द्रव्य मिळविणेसाठीं मग ते जगांतील लोकांना उपद्रव देण्यास सुरवात करतात. 43
344-16
एकातें साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वें हरिती । एकालागीं उभारिती । अपाययंत्रें ॥ 344 ॥
एखाद्याला खिंडीत गांठून मारतात, एखाद्याला फसवून त्याचे सर्वस्व लांबवितात, व एखाद्याच्या घातासाठीं अघोरी मंत्रादि उपायही योजितात. 44
345-16
पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें ॥ 345 ॥
पारधी रानांत शिकारीसाठीं जातांना ज्याप्रमाणे बरोबर पाश, पोती, जाळीं, शिकारी कुत्रे, ससाणे, घोरपडी व भाले वगैरे घेतात. 45

346-16
ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करिती ॥ 346 ॥
आणि आपलें पोट भरण्यासाठी ते जसे अनेक प्राणी ठार मारितात, तसलेंच दुष्ट कृत्य हे आसुरी संपत्तीचे लोकही (द्रव्यप्राप्तीसाठीं) करितात. 46
347-16
परप्राणघातें । मेळविती वित्तें । मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें ॥ 347 ॥
आणि ह्याप्रमाणे दुसऱ्यांचा प्राणघात करून मिळविलेल्या द्रव्याने चित्ताचे कसें समाधान करून घेतात म्हणशील तर असे. 47
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ 16.13॥

348-16
म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी? ॥ 348 ॥
तो म्हणतो, ” आज मी कित्येकांचे द्रव्य आपल्या हाती हस्तगत करून घेतलें आहे, तेव्हां बरोबर मी धन्य नाही काय? ” 48
349-16
ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे । सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं ॥ 349 ॥
अशी स्वतःपाशींच प्रौढीची भाषा चालू असतांना त्याच्या मनांत दुसरे असे विचार येतात कीं, असेच इतरांचेही आणखी द्रव्य मिळवून आणावें. 49
350-16
हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें । लाभा घेईन उरलें । चराचर हें ॥ 350 ॥
आजवर जेवढे मिळविले आहे, त्या भांडवलावर आणखी जेवढे स्थावरजंगम मिळवितां येण्यासारखे उरलें असेल तेवढे जोडीन. 350

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *