नाटाचे ५४ अभंग सूची वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

                       मुख्य अनुक्रमणिका

अभंगाप्रमाणे (क्लिक करा.)  अक्षराप्रमाणे सूची पहा

नाटाचे अभंग

  1. १ विठ्ठल आमचें जीवन
  2. २ बरवा झाला वेवसाव
  3. ३ मी तंव अनाथ अपराधी
  4. 4 आतां पावन सकळ सुखें
  5. ५ सर्वसुखाचिया आशा जन्म गेला
  6. ६ अगा ए सावळ्या सगुणा
  7. ७ आतां मज धरवावी शुद्धी
  8. ८ जेणें हा जीव दिला दान
  9. ९ काय मी उद्धार पावेन
  10. १० तूंचि अनाथाचा दाता
  11. ११ सेंदरीं हें देवी दैवतें
  12. १२ विषय ओढीं भुलले जीव
  13. १३ आले हो संसारा तुम्ही एक करा
  14. १४ न बोलसी तें ही कळलें देवा
  15. १५ आतां मी न पडें सायासीं
  16. १६ आतां तुज कळेल तें करीं
  17. १७ देवा तूं कृपाकरुणासिंधु
  18. १८ कोण सुख धरोनि संसारीं
  19. १९ सुख या संतसमागमें
  20. २० न पवे सन्निध वाटते चिंता
  21. २१ देवा तूं आमचा कृपाळ
  22. २२ आतां धर्माधर्मी कांहीं उचित
  23. २३ बरवें झालें आलों जन्मासी
  24. २४ अल्प भाव अल्प मती
  25. २५ ऐसी हे गर्जवूं वैखरी
  26. २६ होतों तें चिंतीत मानसीं
  27. २७ मज ते हांसतील संत
  28. २८ बरें जालें आजिवरी
  29. २९ आतां माझा नेणों परतों भाव
  30. ३० बरवें जालें लागलों कारणीं
  31. ३१ अवघ्या दशा येणें साधती
  32. ३२ श्रीअनंता मधुसूदना
  33. ३३ माझा तंव खुंटला उपाव
  34. ३४ तरि म्यां आळवावे कोणा
  35. ३५ हें चि भवरोगाचें औषध
  36. ३६ मागुता हा चि जन्म पावसी
  37. ३७ दास्य करी दासांचें
  38. ३८ हरि तैसे हरिचे दास
  39. ३९ बहुत जाचलों संसारीं
  40. ४० जंव हें सकळ सिद्ध आहे
  41. ४१ चांगलें नाम गोमटें रूप
  42. ४२ तुझिया पार नाहीं गुणां
  43. ४३ कां हो माझा मानियेला भार
  44. ४४ तुळसीमाळा घालुनी कंठीं
  45. ४५ हातींचें न संडावें देवें
  46. ४६ आतां येणें बळें पंढरीनाथ
  47. ४७ ऐक पांडुरंगा एक मात
  48. ४८ चांगला तरी पूर्णकाम
  49. ४९ काय आम्ही भक्ती करणें कैसी
  50. ५० शरीर दुःखाचें कोठार
  51. ५१ इतुलें करीं भलत्या परी
  52. ५२ संसारसिंधु हा दुस्तर
  53. ५३ विठ्ठल भीमातीरवासी
  54. ५४ ताप हें हरण श्रीमुख

अक्षराप्रमाणे सूची

अगा ए सावळ्या सगुणा(६)
अल्प भाव अल्प मती(२४)
अवघ्या दशा येणें साधती(३१)
आतां तुज कळेल तें करीं(१६)
आतां धर्माधर्मी कांहीं उचित(२२)
आतां पावन सकळ सुखें(4)
आतां मज धरवावी शुद्धी(७)
आतां माझा नेणों परतों भाव(२९)
आतां मी न पडें सायासीं(१५)
आतां येणें बळें पंढरीनाथ(४६)
आले हो संसारा तुम्ही एक करा(१३)
इतुलें करीं भलत्या परी(५१)
ऐक पांडुरंगा एक मात(४७)
ऐसी हे गर्जवूं वैखरी(२५)
कां हो माझा मानियेला भार(४३)
काय आम्ही भक्ती करणें कैसी(४९)
काय मी उद्धार पावेन(९)
कोण सुख धरोनि संसारीं(१८)
चांगला तरी पूर्णकाम(४८)
चांगलें नाम गोमटें रूप(४१)
जंव हें सकळ सिद्ध आहे(४०)
जेणें हा जीव दिला दान(८)
तरि म्यां आळवावे कोणा(३४)
ताप हें हरण श्रीमुख(५४)
तुझिया पार नाहीं गुणां(४२)
तुळसीमाळा घालुनी कंठीं(४४)
तूंचि अनाथाचा दाता(१०)
दास्य करी दासांचें(३७)
देवा तूं आमचा कृपाळ(२१)
देवा तूं कृपाकरुणासिंधु(१७)
न पवे सन्निध वाटते चिंता(२०)
न बोलसी तें ही कळलें देवा(१४)
बरवा झाला वेवसाव(२)
बरवें जालें लागलों कारणीं(३०)
बरवें झालें आलों जन्मासी(२३)
बरें जालें आजिवरी(२८)
बहुत जाचलों संसारीं(३९)
मज ते हांसतील संत(२७)
मागुता हा चि जन्म पावसी(३६)
माझा तंव खुंटला उपाव(३३)
मी तंव अनाथ अपराधी(३)
विठ्ठल आमचें जीवन(१)
विठ्ठल भीमातीरवासी(५३)
विषय ओढीं भुलले जीव(१२)
शरीर दुःखाचें कोठार(५०)
श्रीअनंता मधुसूदना(३२)
संसारसिंधु हा दुस्तर(५२)
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला(५)
सुख या संतसमागमें(१९)
सेंदरीं हें देवी दैवतें(११)
हरि तैसे हरिचे दास(३८)
हातींचें न संडावें देवें(४५)
हें चि भवरोगाचें औषध(३५)
होतों तें चिंतीत मानसीं(२६)

नाटाचे अभंग

१ विठ्ठल आमचें जीवन

विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥ विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥५॥

२ बरवा झाला वेवसाव

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥धृ.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रम्हीची ॥२॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमुर्ती मधुसूदन। सम चरण देखियेले ॥३॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥४॥ आतां या जीवाचिया साठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका म्हणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुसऱ्याची ॥५॥

३ मी तंव अनाथ अपराधी

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥धृ.॥ केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥ आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका म्हणे ॥५॥

4 आतां पावन सकळ सुखें

आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥धृ.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुऱ्हावली ॥२॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥५॥

५ सर्वसुखाचिया आशा जन्म गेला

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ति यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥धृ.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥ मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥

६ अगा ए सावळ्या सगुणा

अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥ बहु या उदराचे कष्ट । आम्हासि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥धृ.॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥२॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥३॥ जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥४॥ माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरू तुका म्हणे ॥५॥

७ आतां मज धरवावी शुद्धी

आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥धृ.॥ मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥२॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥३॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥४॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका म्हणे ॥५॥

८ जेणें हा जीव दिला दान

जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥धृ.॥ जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥२॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥३॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥४॥ जयाचे नाम पाप नासी । लक्ष्मी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥५॥

९ काय मी उद्धार पावेन

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥ काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥धृ.॥ काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥ काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥

१० तूंचि अनाथाचा दाता

तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥ संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥ मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥३॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥४॥ जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥५॥

११ सेंदरीं हें देवी दैवतें

सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंखेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥धृ.॥ दासीचा पाहुनरउखतें। धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तिहीन ॥२॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥

१२ विषय ओढीं भुलले जीव

विषय ओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥धृ.॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥ जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥३॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥४॥ तुका म्हणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥५॥

१३ आले हो संसारा तुम्ही एक करा

आले हो संसारा तुम्ही एक करा । मुक्तिमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥१॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोई । अग्निस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती । लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥६॥ म्हणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तीरस तुका म्हणे ॥७॥

१४ न बोलसी तें ही कळलें देवा

न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥ उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥ म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥४॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं म्हणे तुका म्हणे ॥५॥

१५ आतां मी न पडें सायासीं

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥२॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥३॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसाराची स्थिती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥४॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका म्हणे ॥५॥

१६ आतां तुज कळेल तें करीं

आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥धृ.॥ मन स्थिर नाहीं माझिये हातीं। इंद्रियें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥२॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥३॥ राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥४॥

१७ देवा तूं कृपाकरुणासिंधु

देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु । जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥१॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥धृ.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥२॥ नेणें भाव परि म्हणवीं तुझा । नेणें भक्ती परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥३॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां। न भीं सर्वथा तुका म्हणे ॥४॥

१८ कोण सुख धरोनि संसारीं

कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरि । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥ प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन व्दारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका म्हणे करीं कृपा आतां ॥५॥

१९ सुख या संतसमागमें

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥ म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥ ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळा ॥३॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भक्तीमुक्ति जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आम्हापाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हा आनंदास । सेवूं ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥

२० न पवे सन्निध वाटते चिंता
न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघड्या नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥धृ.॥ तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥२॥ अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥३॥ होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥

२१ देवा तूं आमचा कृपाळ

देवा तूं आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥ आम्हा भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥३॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका म्हणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आम्हा ॥५॥

२२ आतां धर्माधर्मी कांहीं उचित

आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥१॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥धृ.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । किर्ती हे जगे वाणिजेते ॥२॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥३॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥४॥ केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका म्हणें सांगितलें संतीं। देई अंतीं ठाव मज देवा ॥५॥

२३ बरवें झालें आलों जन्मासी

बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥१॥ दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥धृ.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांई होऊं उतराई। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥३॥ फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥४॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा। तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥५॥

२४ अल्प भाव अल्प मती

अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाहीं ॥धृ.॥ विविध कर्म चौऱ्यांशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरण सांटवण ॥२॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥३॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥४॥ म्हणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥

२५ ऐसी हे गर्जवूं वैखरी

ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥१॥ जनार्दना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥धृ.॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥३॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥४॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥५॥

२६ होतों तें चिंतीत मानसीं

होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥ धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥धृ.॥ मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृष्टि उघडली बरें जालें ॥२॥ आतां हा सिद्धी पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुम्हा भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥५॥

२७ मज ते हांसतील संत

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मुर्तीमंत । म्हणोनि उव्देगलें चित्त । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥धृ.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आम्हा लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसऱ्याचा ॥२॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥३॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥४॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका म्हणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥५॥

२८ बरें जालें आजिवरी

बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हा समर्पण ॥१॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥धृ.॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥२॥ तुम्हासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥ रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आम्हा दोष । तूं जगदीश कैवारी ॥४॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका म्हणे ॥५॥

२९ आतां माझा नेणों परतों भाव

आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥१॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥धृ.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥३॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळां लेइलों तें ॥५॥

३० बरवें जालें लागलों कारणीं

बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥ न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥धृ.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥ जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥३॥ आस निरसली ये खेपे। अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥४॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपें आप एकाएकीं ॥५॥

३१ अवघ्या दशा येणें साधती

अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती । प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥ बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥धृ.॥ जेथें कि हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें । आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा ॥५॥

३२ श्रीअनंता मधुसूदना

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दनना । आनंदघना अविनाशा ॥१॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥धृ.॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥५॥

३३ माझा तंव खुंटला उपाव

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥ म्हणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥

३४ तरि म्यां आळवावे कोणा

तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना । तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥धृ.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥२॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढया आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥३॥ आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥४॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केलें अंतरीं ॥५॥

३५ हें चि भवरोगाचें औषध

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥धृ.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी । होईल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥४॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगीं वैराग्य ॥५॥

३६ मागुता हा चि जन्म पावसी

मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी । हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौऱ्यांशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥ क्षण एक मन स्थिर करूनी । साव होई डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥

३७ दास्य करी दासांचें

दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥धृ.॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥२॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥३॥ राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥ भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका म्हणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥

३८ हरि तैसे हरिचे दास

हरि तैसे हरिचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें जालें ॥धृ.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गिऱ्हे हे राबवीती ॥२॥ बळें तरि नागवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥५॥

३९ बहुत जाचलों संसारीं

बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं । लक्ष चौऱ्यांशी योनिव्दारीं । जालों भिकारी याचक ॥१॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥धृ.॥ न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥२॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥३॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥४॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥

४० जंव हें सकळ सिद्ध आहे

जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रम्हवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥३॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥५॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥५॥

४१ चांगलें नाम गोमटें रूप

चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥१॥ शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥धृ.॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥२॥ म्हणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥३॥ येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥४॥ पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥५॥

४२ तुझिया पार नाहीं गुणां

तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा । भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥धृ.॥ न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥२॥ तुज समर्पिली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥३॥ चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥४॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥५॥

४३ कां हो माझा मानियेला भार

कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥ पाप बळिवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका म्हणे आतां होई प्रगट ॥५॥

४४ तुळसीमाळा घालुनी कंठीं

तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥१॥ भक्तीमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धीसिद्धी वोळगती व्दारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पक्षीश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका म्हणे स्वामी माझा । पावे भक्तीकाजा लवलाहीं ॥५॥

४५ हातींचें न संडावें देवें

हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥धृ.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥२॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥३॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥४॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥५॥

४६ आतां येणें बळें पंढरीनाथ

आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥१॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥२॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥३॥ होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भक्तीप्रिय लोभापर । करी आदर याचकपणें ॥४॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां । तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥५॥

४७ ऐक पांडुरंगा एक मात

ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आम्हा जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥ उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥धृ.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥ शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥३॥ आतां पुढें बोलणें तें काई । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज कळसी ॥४॥

४८ चांगला तरी पूर्णकाम

चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥ उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी किळकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥धृ.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥२॥ गांढ्या तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा । लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥५॥

४९ काय आम्ही भक्ती करणें कैसी

काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हासी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥ कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥ काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥ काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥ तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका म्हणे ॥५॥

५० शरीर दुःखाचें कोठार

शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुर्गंधीचे थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥ शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥धृ.॥ शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें । पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥२॥ शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥३॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥४॥ शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं ॥५॥

५१ इतुलें करीं भलत्या परी

इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥ जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥ करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥

५२ संसारसिंधु हा दुस्तर

संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥धृ.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥ ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥५॥

५३ विठ्ठल भीमातीरवासी

विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हाडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥धृ.॥ उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥ रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुट्या धाकुटा ॥३॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका म्हणे चित्तें चित्त मेळवूनी ॥५॥

५४ ताप हें हरण श्रीमुख

ताप हें हरण श्रीमुख । हरि भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥ न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥धृ.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥२॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥३॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥४॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥५॥

नाटाचे अभंग समाप्त

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

भजनी मालिका मंगलचरण 1, 2, 3

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *