सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ त्रयोदशोऽध्यायःअध्याय तेरवा ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगः॥
अध्याय तेरावा
(श्रीगुरुस्तवन व साहित्य = 1-6)

1-13
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥1॥
ज्या चरणांचे अत्यंत परम आदराने स्मरण केले असता पुरुष संपूर्ण विद्येचे वसतिस्थान होतो, त्याच श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करू.
2-13
जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥2॥
ज्या चरणांचे स्मरण झाले असता इष्ट अर्थ प्रगट करणारे शब्दभांडार स्वाधीन होते आणि वाणीच्या ठिकाणी संपूर्ण रसाळ वत्कृत्व प्रगट होते.
3-13
वक्तृत्वा गोडपणें । अमृतातें पारुखें म्हणे । रस होती वोळंगणें । अक्षरांसी ॥3॥
रसाळवत्कृत्वाच्या गोडपणापुढे अमृतही फिके वाटते आणि नवरस अक्षरांना धरूनच राहतात.
4-13
भावाचें अवतरण अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद॥4॥
आत्मबोधाचे रहस्य प्रगट करणारी खूण ठिकठिकाणी भावार्थाला प्रगट करते आणि त्यामुळे अंतःकरणात आत्मबोध पूर्णपणे यथार्थ अवगत होतो.
5-13
श्रीगुरूंचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेखासी ॥5॥
जेव्हा श्रीगुरूचे पाय आपल्या ह्रदयात राहतात, तेव्हाच ज्ञानाचे एवढे सद्भाग्य प्राप्त होते.


6-13
ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥6॥
म्हणून त्या चरणांना आम्ही आता नमस्कार करतो; जो ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा पती होय तो भगवान श्रीकृष्ण पुढे असे म्हणाला.
श्रीभगवानुवाच ।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥13.1॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला ‘क्षेत्र’ असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला ‘क्षेत्रज्ञ’ असे क्षेत्रक्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात.
7-13
तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे । जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें॥7॥
तरी हे अर्जुना ! ऐक देहाला क्षेत्र म्हणतात व देहाला जो जाणतो त्यालाच येथे क्षेत्रज्ञ म्हटले आहे.
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥13.2॥

अर्थ हे भरतकुलोत्पन्ना, सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ, तो मी आहे असे जाण. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे.
8-13
तरि क्षेत्रज्ञु जो एथें । तो मीचि जाण निरुतें । जो सर्व क्षेत्रांतें । संगोपोनि असे ॥8॥
शरीरात जो क्षेत्रज्ञ म्हणून येथे सांगितला आहे व जो सर्व सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात व्यापून आहे, तो खरोखर मीच आहे असे जाण.
9-13
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणें जें निरुतें । ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ॥9॥
क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ कोण हे यथार्थ जाणणे यालाच आम्ही ज्ञान म्हणतो.
तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे श्रुणु ॥13.3॥

अर्थ ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता, हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर (क्षेत्र व क्षेत्रज्ञ कोण ते ब्रह्मादिकांनाही कळत नाही. = 7-26)
10-13
तरि क्षेत्र येणें नावें । शरीर जेणें भावें । म्हणितलें तें आघवें । सांगो आतां ॥10॥
तर आता हे शरीर ज्या उद्देशाने क्षेत्र या नावाने संबोधिले जाते तो उद्देश आम्ही आता सांगतो.


11-13
हें क्षेत्र कां म्हणिजे । केसें कें हें उपजे । कवण कवणीं वाढविजे । विकारा एथ ॥11॥
शरीराला क्षेत्र का म्हणतात? ते कसे व कशापासून उत्पन्न होते? कोणकोणत्या कार्यरूपाने त्याची वाढ होते?
12-13
हें औट हात मोटकें । की केवढें पां केतुकें । बरड कीं पिके । कोणाचें हें ॥12॥
हे एवढेसे साडे तीन हातच आहे किंवा केवढे मोठे आहे? व त्याची मर्यादा किती ! ते नापीक आहे किंवा पिकणारे आहे आणि ते कोणाचे आहे?
13-13
इत्यादि सर्व । जे जे याचे भाव । ते बोलिजेती सावेव । अवधान देई ॥13॥
इत्यादि जे सर्व भाव असतील ते संपूर्ण सांगतो, लक्ष देऊन ऐक.
14-13
पै याची स्थळाकारणें । श्रुति सदा बोबाणें । तर्कु येणेंचि ठिकाणें । तोंडाळु केला ॥14॥
उपनिषदांनी आक्रोश करून या क्षेत्रांविषयीच विचार सांगितला आणि याच स्थळाने तर्काला बडबड करायला लावली.
15-13
चाळितां हेचि बोली । दर्शन शेवटा आलीं । तेवींचि नाही बुझाविली । अझुनि द्वंदे ॥15॥
या क्षेत्राची चर्चा करण्यातच दर्शनांचा शेवट झाला, तरी त्यांच्यातील परस्पर विरोध नाहीसा झाला नाही.


16-13
शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें । याचेनि एकवंके । जगासि वादु ॥16॥
या एका क्षेत्रामुळेच निर्णयशास्त्रांच्या सोयरीक संबंधात बिघाड उत्पन्न झाला आणि क्षेत्राचे ठिकाणीच एकनिष्ठ झाल्यामुळे जगात वाद माजला.
17-13
तोंडेंसी तोंडा न पडे । बोलेंसी बोला न घडे । इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥17॥
एकाचे तोंड दुसर्‍याच्या तोंडासमोर होत नाही व एकाचा युक्तिवाद दुसर्‍यास पटत नाही. अशा युक्तिवादामुळे बडबडण्याची सीमा झाली.
18-13
नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ । जे घरोगरी कपाळ । पिटवीत असे ॥18॥
हे शरीर कोणाच्या मालकीचे आहे, हे सांगता येत नाही, तरीपण याची आसक्ती इतकी प्रबळ आहे की, घरोघर याच्या करिताच कपाळपिटी होत असते.
19-13
नास्तिका द्यावया तोंड । वेदांचे गाढें बंड । तें देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥19॥
नास्तिकांच्या कुतर्कांचे खंडन करण्याकरिता त्यांना तोंड देऊन वेदांनी त्यांच्याविरुध्द थोर बंड उभारले, हे पाहून पाखंड्यांनी भलतेच बोलायला सुरुवात केली.
नास्तिक— म्हणजे देहालाच चेतन आत्मा समजणारे. ते ईश्वर, वेद, वेदाचे ईश्वरप्रणितत्व, पापपुण्यकर्मे, कर्मानुसार गती, परलोक, पुनर्जन्म, मोक्ष इत्यादि श्रुतिमान्य सिध्दांत आहेत ते मुळीच मानीत नाहीत.
नास्तिका द्यावया तोंड— म्हणजे नास्तिकांची अविचारमूलक मते खोडून काढण्याकरिता.
वेदांचे गाढें बंड — म्हणजे वेदाने अनुमान व अनुभव यांच्या भक्कम आधारावर उभारलेले युक्तिसिध्द विचार. पाखंडी— वेदादि शास्त्रांच्या युक्तिअनुभवसिध्द विचारांचा व सिध्दान्ताचा त्याग करून, विचारास न पटणारे व अनुभवास कधी न येणारे स्वकपोलकल्पित सिध्दान्त प्रतिपादन करणार्‍यांना पाखंडी म्हणतात.
20-13
म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिकें हे वाग्जाळ । ना म्हणसी तरी पोफळ । घातलें आहे ॥20॥
(वेद प्रमाण मानणार्‍या अस्तिकाला पाखंडी म्हणतो) तुमचे म्हणणे निराधार व केवळ वायफळ पांडित्य आहे. “नाही ! आमचे म्हणणेच यथार्थ आहे” असे म्हणत असाल, तर ही आम्ही प्रतिज्ञेची सुपारी ठेविली आहे – म्हणजे पैेजेने आम्ही आपले म्हणणे सिध्द करून देऊ शकतो.


21-13
पाखांडाचिये कडे । नागवीं लुंचिती मुंडे । नियोजिलीं वितंडे । तळासि येती ॥21॥
असे हे, पाखंडाचे डफ वाजवून नागवे राहतात व डोक्याचे केस उपटतात आणि आपले मत प्रतिपादन करण्याकरिता स्विकारलेल्या वितंडवादानेच ते सर्वांच्या खाली येतात म्हणजे आपणच आपली मते निराधार ठरवितात.
22-13
मृत्युबळाचेनि माजें । हें जाईल वीण काजें । तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥22॥
मृत्यूचे सामर्थ्य अनिवार असल्यामुळे हे क्षेत्र व्यर्थच मृत्यूच्या स्वाधीन होईल, हे जाणून योगी देहाच्या आसक्तीने आयुमर्यादा वाढविण्यास निघाले.
23-13
मृत्युने आधिधिले । तिहीं निरंजन सेविलें । यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥23॥
देहांच्या आसक्ती मृत्यूला पाहून घाबरलेले ते एकांतात जाऊन राहिले व त्यांनी नाना प्रकारच्या यमनियमांचे समुदाय आचरणात आणले.
24-13
येणेंचि क्षेत्राभिमाने । राज्य त्यजिलें ईशानें । गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला॥24॥
या देहाचा अभिमान धरूनच कैलासाचे राज्य करण्यात बंधन आहे, हे जाणून भगवान शंकराने कैलासाचा त्याग केला व स्मशानात वास केला.
25-13
ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा । लांचकर म्हणोनि कोळसा । कामु केला ॥25॥
अशा त्याग करण्याच्या या प्रतिज्ञेनेच शंकराला दिशा पांघराव्या लागल्या- म्हणजे दिगंबर होऊन राहावे लागले व कामोत्पादक वनशोभेची लाच देऊ पाहणार्‍या मदनाला जाळून शंकराने त्याचा कोळसा केला.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *