गोरख चिंच

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

गोरख चिंच*

सुमारे २० मी. उंचीचा हा पानझडी, मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील परंतु अरबांनी तो भारतात आणला. तेथे व आशिया खंडात समुद्रकाठच्या प्रदेशात याची लागवड केली जाते. तो भारतात सर्वत्र आढळतो. माकडे आवडीने याची फळे खातात त्यावरून ‘मंकी ब्रेड ट्री’व आफ्रिकी भाषेतील याच्या नावावरून ‘बाओबाब’ ही इंग्रजी नावे पडली आहेत. गोरख हा संस्कृत ‘गोरक्षी’ चा अपभ्रंश दिसतो व चिंचेप्रमाणे आंबूस यावरून चिंच ही उपाधी भारतीय नावात अंतर्भूत दिसते. या झाडाचा बुंधा फारच मोठा (३० मी. पर्यंत घेराचा) म्हणजे जगात पहिल्या क्रमांकाचा असून स्वतः ॲडॅन्सन यांनी पाहिलेल्या वृक्षाचे वय ५,००० वर्षे असावे असा त्यांनी अंदाज केला होता. खोड २० मी.पर्यंत उंच वाढते. साल गुळगुळीत व करडी;पाने हस्ताकृती संयुक्त, लांब देठाची व मोठी दले ५-७; फुले मोठी, एकांकी, लोंबती, कक्षास्थ, १५ सेंमी. व्यासाची व पांढरी; केसरदले असंख्य व एकसंध; संवर्त पेल्यासारखा; अपिसंवर्त नसतो;

परागकण गुळगुळत फळ लोंबते, मोठे, लवदार, कठीण (मृदुफळ, घनकवची) असून बिया अनेक, पिंगट,मूत्रपिंडाकृती व आंबूस मगजात (गरात) विखुरलेल्या असतात.
रस्त्याच्या दुतर्फा लावण्यास हा वृक्ष गैरसोयीचा असला, तरी मोठ्या बागेत अथवा देवळाच्या आवारात लावलेला आढळतो. फुललेला असताना भव्य दिसतो. मऊपणामुळे लाकृड फक्त आगपेट्यांच्या कारखान्यात उपयुक्त आहे. सालीतील धागा दोऱ्या पिशव्या व जाड्याभरड्या कापडास आणि चलनी नोटांच्या चिवट कागदास उपयुक्त; फळातील मगज मधुर व थंड सरबताकरिता वापरतात, तसेच तो तापात प्रशीतक असतो. त्यात शामक,स्तंभक (आकुंचन करण्याचा) व रेचक गुण आहेत. साल कोयनेलाऐवजी वापरतात. सुकलेली पाने स्वेदक (घाम आणणारी) आणि मुत्रपिंड विकारावर उपयुक्त. डिंक पाळीव जनावरांच्या व उंटांच्या जखमांना लावतात. सुकी फळे कोळ्यांच्या जाळ्यांना तरंगण्याकरिता बांधतात.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *