सोमवारचे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सोमवार चे अभंग

  1. ॐ नमो शिवा आदिस्वर्ग जयाची साळोंखा
  2. आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे
  3. तुम्ही विश्वनाथ
  4. भस्म उटी रुंडमाळा
  5. शिव भोळां चक्रवर्ती
  6. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती
  7. भजन करी महादेव
  8. हरिहरा भेद
  9. हरिहर सांडूनी देव
  10. आहा आहा रे भाई प्रथम नमू तो
  11. आहा रे भाई । गंगा नव्हे जळ
  12. सत्य ज्योतिर्लिंग बारा
  13. होऊनी वैष्णव । जो कां निंदी

1

ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी ।
मिळाली संत मांदी । त्याचे चरणरेणु  वंदी रे  । । १ ।।
शिवनाम शीतळ मुखी । सेवी पा कापडिया रे ।
दड दड दड दड दुडु दुडु दुडु दुडु ।
पळ सुटला कळीकाळा बापुडिया रे ।। २ ।।
गुरुलिंग जंगम । तेणे दाविला आगम ।
आधी व्याधि  झाली सम । तेणे पावलो विश्राम रे ।। ३ ।।
जवळी असता जगज्जीवन । का धांडोळीसी वन ।
एकाग्र करी मन । तेणे होईल समाधान रे ।। ४ ।।
देहभाव तेथे विरे । ते साधने दिधले पुरे ।
बापरखुमादेवी वरे । विठ्ठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे । ।५ । ।

2

स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्रपाळी पिंड देखा ।
शेषासारखी बैसका । जो आधार तीही लोका ।। १ ।।
लिग देखिले देखिले । त्रिभुवनी तीही लोकी विस्तारिले ।। २ ।।
मेघधारी स्नपन केले । तारापुष्पी वरी पूजिले ।
चंद्रफळ ज्या वाहिले । ओवाळिले रविदिपे ।। ३ ।।
आत्म नैवेद्य समर्पिले । ब्रम्हानंदी मग वंदिले ।
ज्योतिर्लिंग मग ध्याईले । ज्ञानदेवे हृदयी ।। ४ ।।

3

आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे । बारा वाटा पळती बापडी रे ।। १ ।।
पंढरपुरीचें आम्ही कापडी रे । उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे ।। २ ।।
आजी पाहले रे आजी पाहाले रे । संतसंगीत सुख झाले रे ।। 3 ।।
समता कवडी रे समता कावडी रे ।माजी नामामृत भरिले आवडी रे ।। ४ ।।
येणे न घेणे रे जाणे न घडे रे । निजमुख कोंदले पाहतं चहूंकडे रे ।। ५ ।।
नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे । नाम म्हणोनि कर्माकर्म खंडणे रे ।। ६ ।।
दु : ख फिटले रे दु : ख फिटले रे । बापरखुमादेविवरू विठ्ठले रे ।। ७ ।।

4

तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ।। १ ।।
कृपा कराल ते थोडा । पाया पडिलो बराडी ।। २ ।।
काय उणे तुम्हापासिं । मी तो अल्पाची संतोषी ।। 3 ।।
तुका म्हणे देवा । काही भातुकें पाठवा ।। ४ ।।

5

भस्म उटी रुंडमाळा । हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ।। १ ।।
गजचर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे वासुकी हार ।। २ ।।
भुते वेताळे नाचती । हर्ष युक्त उमापती ।। ३ ।।
सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ।। ४ ।।

6

शिव भोळां चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्ती ।। १ ।।
वाचे वदता शिवनाम । तया न बाधी क्रोध काम ।। २ ।।
धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखता प्रत्यक्ष ।। ३ ।।
एका जनार्दनी शिव । निवारी कळी काळाचा भेव ।। ४ ।।

7

कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती ।
पार्वतीचा पती योगीराज ॥१॥
तयाचिये पायी माझे दंडवत ।
घडो आणि चित्त जडो नामी ॥२॥
जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी ।
तिजा नेत्रज्वाळी जातवेद ॥३॥
कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती ।
सर्वांगी विभूती शोभतसे ॥४॥
गळा रुंडमाळा खापर हस्तकी ।
रामनाम मुखी सर्वकाळ ॥५॥
गजचर्मधारी स्मशानी राहिला ।
संगे भूतमेळा विराजित ॥६॥
नामा म्हणे नामे नासोनिया पाप ।
करी सुखरूप भक्तालागी ॥७॥

8

भजन करी महादेव |
राम पूजी सदाशिव ||१||
दोघ देव एक पाही |
तया ऐक्य दुजे नाही ||२||
शिवारामा नाही भेद |
ऐसे देव तेही सिद्ध ||३||
जनी म्हणी आत्मा एक |
सर्व घटी तो व्यापक ||४||

9

हरिहरा भेद |
नाही करू नये वाद ||१||
एक एकाचे ह्दयी |
गोडी साखरेच्या ठायी ||२||
भेदकासी नाड |
एक विलांटीच आड ||३||
उजवे वाम भाग |
तुका म्हणे एकचि अंग ||४||

10

हरिहर सांडूनी देव | धरिती भाव क्षुल्लकी ||१||
ऐका त्याची विटंबना | देवपणा भक्तांची ||२||
अंगी कवडे घाली गळा | परडी कळाहीन हाती ||३||
गळा गांठा हिंडे व्दारी | मनुष्य परी कुतरी ती ||४||
माथा सेंदूर दांत खाती | जेंगट हाती सटवीचे||५||
पूजिती विकट दोंद | पशु सोंड गजाची ||६||
ऐशा छेंदे चुकली वाटा | भाव खोटा भजन ||७||
तुका  म्हणे विष्णू शिवा | वांचूनी देवा भजती ते ||८|| 

11

आहा आहा रे भाई प्रथम नमू तो विनायक |
ठेवूनि गुरुचरणी मस्तक | वदेल प्रासादिक |
वाणी हरीहरांचे पवाडे ||१||
माझी ऐसी ब्रीदावळी | दासे दासात्वे आगळी |
पान्हेरीन मार्ग मळी | जीवन घ्या रे कापडी हो ||२||
जे सीतळाहूनी सीतळ | पातळाहूनी पातळ
प्रेमामृत  रसाळ ते आधी सेवा हो भाग्याचे नु ||३||
जिंकाल तरी जिंका अभिमान | दवडाल तरी दवडा लज्जा आधी मान |
धराल ते धरा शंभूचे ध्यान | दावाल पण ऐसा दावा तो ||४||
काळ घेऊ नेदी वाव | आला तो घाव  डाव |
शुध्द सत्वी राखोनि भाव | म्हणा महादेव हरहर वाणी गर्जो घ्य ||५||

पराविया नारी माऊलीसमान | परधनी बाटो नेदी मन |
जीवित्व ते तृनासामान | स्वामीकाजी जाण शूर म्हणो तया आम्ही ||६||
शक्ती वेचाविया परउपकारा | खोटे खोट्याचा पसारा |
सत्य ते भवनदीचा तारा | आळस तो न करा येथे आले हो सांगतो ||७||
व्रत करा एकादशी सोमवार | कथा पूजन हरिजागर |
पुण्य ते असे गाता नाचता फार | पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे ||८||
संग संतांचा करिता बरवा | उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा |
पंथ तो सुपंथे चालावा | उगवा वासना लिगाड ||९||
तुका चालवितो कावडी | प्रवृत्ती निवृत्ती चोखडी |
पुढती पुढती अधिक गोडी | भरुनी कळस भजन आवडी | केशवदास  नटतसे ||१०||

12
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ ।
वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ ।
श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा ।
संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥
काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु ।
राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान ।
शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू ।
झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥
कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ।
ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥

गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ।
परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु ।
नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा ।
जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥
गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति ।
तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी ।
तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥

13
 सत्य ज्योतिर्लिंग बारा | प्रात:काळी स्मरण करा |
कोटी कुळे उद्धारा | भव तरा बापहो ||१||
वाराणशी विश्वनाथ | मोक्ष दाता तो समर्थ |
पुरवील अंतरीचे आर्त  | सोमनाथ सोरटी ||२||
ॐकार ममलेश्वर | श्वेतबंध रामेश्वर |
भीमा उगमी भीमाशंकर | घृष्णेश्वर वेराळी ||३||
नागनाथ अमृतोदकी | विश्वजन केले सुखी |
परळी वैजनाथ सुखी | सुकृत जन्माचे ||४||

त्र्यंबक हा तीर्थराज | पुरवील अंतरीचे काज |
त्याही तेजामाजी तेज महाकाळ उज्जनी ||५||
दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लकार्जुन |
वाचे स्मरता धन्य धन्य | अनुपम्य क्षेत्र ते ||६||
ब्रदिकेदार उत्तरे |ज्याचे स्मरणे भाव हा तरे |
ध्यान धरिता वृत्ती नुरे | निज निश्चळ दासाची ||७||
नरहरी म्हणे जन्मा यावे | शुध्द सत्व प्रेम भावे |
वाचे हरी गुण गावे | मालो लपे सर्वदा ||८||   .

     

१४

होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥
त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥
एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥

सात वाराचे अभंग पहा

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *