ब्रम्हगिरी प्रदक्षिणा माहात्म्य त्र्यंबकेश्वर नाशिक

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Bramhagiri Pradakshana mahatmy Tryambakeshwar Nashik

*ब्रम्हगिरी पर्वत – गौतम ऋषी एक परिचय –* महर्षी गौतम ऋषिंचा जन्म शारद्वत झाला होता. लहानपणापासूनच गौतम ऋषी वैज्ञानिक व धार्मिक विचारधारेचे होते. गौतम ऋषींच्या हृदयात प्रेम आणि त्यागाची भावना होती. बाल अवस्थेपासूनच गौतमऋषी शिवभक्त होते. म्हणून तरूण अवस्थेत ते एक महान योगीराज तपस्वी झाले. त्यांचे हृदय अभयदानासाठी तत्पर असे तर संताप आल्यावर त्यांनी दिलेल्या शापापासून देवगण सुद्धा मुक्ती देत नसे. ऋषीवर गौतम न्यायशास्राचे प्रवर्तक होते व त्र्यंबकेश्वर क्षेत्रात ते दक्षिण दिशेला निवास करत होते. गौतम ऋषींना देवादिदेव महादेवाकडून असे वरदान मिळाले होते की, त्यांच्या दृष्टीमध्ये दिव्यतेज असून ते कोणत्याही अदृश्य व अनोळखी माणसाला सहज ओळखू शकतात. गौतमऋषी त्र्यंबकराजाचे अनन्य भक्त होते. त्र्यंबकराजाची कथा गौतमऋषींच्या जीवनाशी जुळलेली आहे.. 

*–त्र्यंबकेश्वर कथा –* 

नाथांचे नाथ भगवान आदिनाथ भोलेशंकर आपल्या चरणी येणाऱ्या भक्तांचे दुःख, संकट दूर करतात. नाथांचे नाथ भोलेनाथांनी अमृत मंथनाच्या वेळी विष पिऊन स्वर्ग लोकातील देवांचे संकट दूर केले तर गंगेच्या पवित्र धारेला आपल्या जटांत समाविष्ट करून महादेव भक्त भागीरथीचे संकट दूर केले होते.  *एकदा माता पार्वतींनी भगवान भोलेनाथ व गंगामातेला एकांतात बोलताना बघितले तेव्हापासून माता-पार्वतीला गंगामातेविषयी घृणा निर्माण झाली. त्यामुळे माता पार्वती कायम चिंताग्रस्त राहु लागल्या.* 

श्री गणपती आपल्या माता पार्वतीला चिंतीत बघून फारच दुःखी झाले आणि माता पार्वतीला चिंतेचे कारण विचारले, माता पार्वतीने सांगितले की, गंगामातेला नाथांपासून दूर करा, कसेही करून माता गंगा नाथांपासून दूर जायलाच हवी, श्री गजानन गणेश विचारात पडले आणि मातेच्या इच्छेनुसार त्यांनी वचन दिले की, मी माता गंगेला पिता भोलेनाथांपासून दूर करण्याचा उपाय अवश्य शोधून काढील. 

*श्री गणेशांनी भगवान वरुणदेवाला विनंती केली आणि त्यांनी पृथ्वीलोकांवर वर्षानुवर्षे भयंकर दुष्काळ उत्पन्न करायला लावले. भगवान वरुणदेवाने श्री गौरीपुत्र गजाननाच्या विनंतीनुसार तसेच केले असे म्हणतात की, त्यावेळी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला ज्यामुळे अनेक जिवजंतु, पशु-पक्षी, अकारण मरण पावले आणि चारही दिशेला त्राही त्राही झाली. पाण्याचा भयंकर दुष्काळ पडला तेव्हा गौतमऋषीवर त्यांच्या सौभाग्यवती अहिल्यामातेने भगवान वरुणदेवाची पुजा अर्चना केली व त्यांना प्रसन्न करून घेतले.* 

भगवान वरुणदेव श्री गजाननाच्या विनंती वरदानात अडकले होते तरीही त्यांनी गौतमऋषींना कष्ट न करता एक उपाय सुचविला. मुनिवर तुम्ही एक खड्डा तयार करा आणि मग मी तो खड्डा अक्षय शितल पाण्याने तुडुंब भरून देईन. नंतर या खड्ड्याचे पाणी कधीही संपणार नाही. गौतम ऋषींनी तसेच केले आणि बघता बघता तो खड्डा अक्षय शितल पाण्याने भरून गेला. पृथ्वीलोकावर भयंकर दुष्काळ आणि प्रलय उत्पन्न करण्याचे कारण गंगामातेला पृथ्वीवर पाठविण्यासाठी होते पण तसे झाले नाही. असे म्हणतात की,

गौतम तलावाजवळ आजूबाजूचे साधुसंत येऊ लागले व नंतर तेथेच निवास करून राहु लागले. हळूहळू गौतम तलावाजवळ नंदनवन वस्ती होत गेली पण श्री गणेशांना माता पार्वतीचे वचन पूर्ण करावयाचे होते. म्हणून त्यांनी दुसरी योजना अंमलात आणली. तरीही त्यात परत *गौतम ऋषींचाच उध्दार झाला.* 

एके दिवशी गौतम तलावाजवळ पाणी भरण्यावरून माता अहिल्याचे दुसऱ्या ऋषी पत्नीबरोबर भांडण झाले. ही गोष्ट अन्य ऋषीपत्नींनी वाढवून आपल्या ऋषीपतींना सांगितली. तेव्हा ऋषीपतींनी आपापल्या सौभाग्यवतींना आश्वासन केले की, आम्ही सगळे मिळून गौतम ऋषींना त्र्यंबकेश्वर स्थान सोडून जाण्यास भाग पाडतो मग तुम्हा लोकांना पाणी भरायला कोणताही त्रास होणार नाही. सर्व ऋषीमुनींनी श्री गणेशांची आराधना करून त्यांना विनंती केली की गौतम ऋषींवर कोणत्याही पापांचा दोष लावा. त्यामुळे गौतम ऋषी कलंकित होऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्र सोडून लांब जातील. तेव्हा गणेश तथास्तु म्हणाले आणि नंतर ऋषींना येऊन सांगितले की, यामुळे गौतम ऋषींचाच उध्दार होईल.

*नंतर गौरीपुत्र गणेशाने गायीचे रूप धारण केले व गौतम ऋषींच्या शेतावर चरायला गेले. गौतम ऋषींनी गायीला चरताना बघितले व तिला हुसकवण्यासाठी दर्भाच्या काडीने मारले. दर्भाच्या काडीचा स्पर्श होताच गाय मरण पावली तेव्हा सर्व ऋषी तेथे आले आणि त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्या पापांचा दोष लावला. असाह्य गौतम ऋषीमुनींनी अन्य ऋषींना या महापाप दोषांचे निवारण विचारले. तेव्हा सगळे ऋषीगण म्हणाले, तुमच्याकडे फक्त दोनच उपाय आहेत एकतर तुम्ही ब्रम्हगिरी पर्वत सोडून जाणे नाहीतर तीन वेळा पृथ्वीची आणि १०१ वेळा शिवस्वरूप ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून नाथांचे नाथ भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांच्या जटेतील गंगामातेला ब्रम्हगिरीत आणून त्या पवित्र जलधारेने स्नान करा आणि त्या पाण्याने शिवस्वरूप १०१ शिवलिंगावर अभिषेक करा. तेव्हा तुम्ही या गोहत्येच्या महापापातून दोषमुक्त होवू शकाल.*   गौतम ऋषींनी समस्त ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीची ३ वेळा प्रदक्षिणा व ब्रम्हगिरी पर्वताची १०१ वेळा प्रदक्षिणा करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतले. तत्पश्चात भगवान आदिनाथ भोलेनाथ प्रगट झाले आणि म्हणाले, मुनीवर गौतम आपण निष्पाप आहात. तुमचा छळ केला आहे. मी तुमच्या गोहत्या महापाप दोषमुक्ती करिता आपल्याला गंगा अवश्य प्रदान करील.  

*ब्रह्मगिरी प्रदक्षिणा*

त्र्यंबकेश्वर येथील पौष  महिन्यातील कृष्ण पक्षातिल एकादशी, संत निवृत्तिनाथांची वारी य दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे महात्म्य आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलित आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्याचे जाणकार म्हणतात. प्रदक्षिणा तिसर्या सोमवारीच करावी, हा नवा पायंडा वर्षानुवर्षे रूढ झाला आहे. सलग पाच वर्षे तिस-या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली जाते.


वास्तविक पाहता, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी चालते, अशी ज्येष्ठ मंडळी सांगतात. केवळ श्रावणातील तिस-या सोमवारचा आग्रह धरल्याने ठराविक वेळेत काही भाविक या २० किलोमीटच्या मार्गावर चालतात. श्रावणी सोमवारला फेरी करणे विशेष फलदायी मानले जाते. पूर्वी पहिल्या दोन श्रावण त्र्यंबकला विशेष गर्दी असायची. पौर्णिमेपर्यंत लिंगार्चन, पोथीपुराण व पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल, भाविकांची गर्दी त्यातून व्यावसायिकांना उसंत मिळायची नाही. श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिस-या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तिसरा सोमवार हा प्रदक्षिणेचा पर्वकाळ मानला गेला.

१९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारली जाते. सर्वसाधरणत: त्यास ‘फेरी’ म्हणून संबोधण्यात येते. ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे. सुमारे २० किलोमीटरचा हा मार्ग असून या मार्गावर अनेक तीर्थ आहेत. त्यापैकी काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत.

ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे, म्हणजे साधारणत: पहाटे पाच वाजता ही फेरी सुरू करावी. सूर्योदय होताना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गेसृष्टी सौंदर्याचा अस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत, शिवाचे नामस्मरण करत सात्विक मनाने फेरी करावी. प्रदक्षिणा मार्गावर अनेक तिर्थे लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, राम तीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आदी आणि नद्या व मंदिरे लक्ष वेधून घेतात. प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.

सकाळाच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन पाहायला मिळते. श्रावण महिना सुरू होताच महिनाभर प्रदक्षिणा करणारे भाविक या मार्गावर असतात. तसेच श्रावणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमीदेखील येतात.
*”दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥*
*”नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।*

शिव शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणार्या नाशिकपासून हे ज्योतिर्लिंग ३५ किलोमीटरवर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही त्र्यंबक ‘गौतमी तटे’ असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली जाते.

तिसऱ्या सोमवारी तर मोठी गर्दी असते.या काळात कुशावर्तात स्नान करणे फार पवित्र मानले जाते.
धार्मिक ग्रंथात असा उल्लेख केलेला आहे की ब्रम्हगिरीच प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. असा पुराणात उल्लेख आहे. सर्वात प्रथम संत निवृत्तीनाथांनी ब्रम्हगिरीस प्रदक्षिणा घातली आहे. ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ थांबले त्याठिकाणीच फेरी मारणारे भाविक थांबून आराम करत असतात. यावेळी लाखो भाविक ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारत असतात. कुशावर्तात स्नान करून भाविक कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात. आमची प्रदक्षिणेला सुरुवात करतात. साधारणत: मंदिरापासून एक किलोमीटरवर प्रयागतीर्थ या ठिकाणी एक तळे लागते. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे निघावे लागते.


श्रावणामध्ये दर रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात होते. प्रचंड गर्दी असते तेथे २० किमी आणि ४० कि.मी अशा दोन प्रदक्षिणा आहेत. अनुभवी लोक मोठी प्रदक्षिणा करतात. बाकी छोटी प्रदक्षिणा करतात. त्यासाठी १२ तास लागतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. दहा ते पंधरा वर्षापूर्वी फक्त श्रावण महिन्यातील तिसर्या रविवारी रात्री १२ वा. कुशावर्त तीर्थावर स्नान करून फेरीस भाविक सुरूवात करत असत. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रम्हगिरीची फेरी घातली जाते. प्रदक्षिणा ही दोन प्रकारे असते. एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे-ती साधारणत: ३० किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत – ६० किलोमीटरची तर ६० किलोमीटरची प्रदक्षिणा ही कठीण आहे. त्यात ७ पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. याठिकाणचा जंगल परिसर आहे.


*ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरील देवालये*
प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ आहेत. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागतीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, धवल गंगा, बिल्व्तीर्थ, आदी तीर्थ मंदिरे लक्ष वेधतात. प्रदक्षिणा दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇