सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

501-15
एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ 501 ॥
ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आतां पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतों. 1
502-15
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा । तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा ॥ 502 ॥
अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष म्हणून आहे तो, पर्वतश्रेणींमध्ये मेरू पर्वत जसा मध्यभागी आहे तसा मध्यस्थ आहे. (म्हणजे एका टोंकास शुद्ध परमात्मा व दुसच्या टोकास अशुद्ध व क्षणिक जगत असें जें “मध्यस्थ” परमात्मविषयक अज्ञान ते आहे उपाधि ज्या चैतन्याला व अक्षर पुरुष होय=मायाविशिष्ट चैतन्य ) 2
503-15
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं । इहीं न भेदे तिहीं भागीं । तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो ॥ 503 ॥
तो मेरूपर्वत, स्वर्ग, पृथ्वी व पाताळ ह्या तीन लोकांपैकीं अमक्या लोकांतला असे म्हणतां न येतां जसा सर्वत्र समच आहे, तसा हा अक्षर पुरुष शुद्ध ज्ञानही नव्हे किंवा अज्ञानकार्य जगत् तद्रूपही नव्हे असा मध्यस्थ आहे. 3
504-15
ना यथार्थज्ञानें एक होणें । ना अन्यथात्वें दुजें घेणें । ऐसें निखिळ जें नेणणें । तेंचि तें रूप ॥ 504 ॥
ज्या स्थितीत जीवाला यथार्थं ब्रह्मौक्य ज्ञानही नसतें, किंवा विक्षेपकार्य जो व्यवहार तद्रूपही तो नसतो, अशी जी त्याची मध्यस्थ घनसुषुप्त अवस्था, ते अक्षर पुरुषाचे रूप होय.4
505-15
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये । तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें ॥ 505 ॥
ढेपूळता तर निःशेष मोडलेली, पण अद्याप घडयागाडग्यांच्या आकाराला न आलेला असा जो मध्यस्थ मृत्पिंड (मातीचा गोळा) तसे ह्या अक्षर पुरुषाचे स्वरूप जाणावें. 5

506-15
पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु । तया ऐशी अनाकारु । जे दशा गा ॥ 506 ॥
ज्या स्थलावरील समुद्राचे पाणी ओहोटून ओसरलें आहे, त्या स्थलाच्या निराकार दशेप्रमाणे जी स्थिति (निराकारता अशी की, त्या स्थलाला समुद्र म्हणावें, तर लाटाही नाहींत व पाणीही नाही; पृथ्वीचे क्षेत्र म्हणावें, तर, पुढल्या क्षणाला समुद्र तेथे आपला अंमल गाजवणार). 6
507-15
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे । तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें ॥ 507 ॥
पार्था, जागृति लोप पावली आहे आणि स्वप्नादि व्यवहार बंद आहे अशी जी झोंप याप्रमाणे हे समजावें. 7
508-15
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे । तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम ॥ 508 ॥
सर्व विश्वदर्शन मावळले आहे पण आत्मबोधाचा तर उदय नाही अशी जी केवळ अज्ञानावस्था तिला “अक्षर” असे नांव आहे. 8
509-15
सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे। रूप जाणावें तैसें । अक्षराचें ॥ 509 ॥
सर्व कलाशून्य (गडद अंधकाररूप) अमावास्येच्या चंद्राप्रमाणे ” अक्षराचे रूप समजावें. 9
510-15
पैं सर्वोपाधिविनाशें। हे जीवदशा जेथ पैसे । फळपाकांत जैसें । झाड बीजीं ॥ 510 ॥
पक्वफळाच्या बीजांत तरु जसा सूक्ष्मरूपाने असतो त्याप्रमाणे जागृदादि सर्व उपाधिनाशानंतर ही जीवदशा ज्या ठिकाणी लीन होऊन असते. 510

511-15
तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ । तयातें अव्यक्त । बोलती गा ॥ 511
तसेच उपाधि व उपाधीने युक्त असणारे जेथें लीन होतात त्या स्थानाला “अव्यक्त” असे म्हणतात. 11
512-15
॥ घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा ॥ 512 ॥
गाढ अज्ञानरूप जी सुषुप्त्यवस्था तिला “बीजभाव” म्हणतात व दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती हा तिचा फलभाव होय. 12
513-15
जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो । तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा ॥ 513 ॥
वेदान्तांत ज्या स्थितीला ” बीजभाव ” असे म्हणतात ते त्या अक्षर पुरुषाचे स्थान होय. ( तोच अक्षर पुरुष होय. ) 13
514-15
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न । नानाबुद्धीचें रान । रिगालें असे ॥ 514 ॥
जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन तें जागृति, स्वप्न व नाना तऱ्हेचे बुद्धितरंग या रूपांनीं विस्तारते. 14
515-15
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी । ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु ॥ 515 ॥
अर्जुना, जीवत्व आणि विश्व ह्यांचा उदय जेथून होतो व हे दोन भेद पुन्हां शेवटी जेथे ऐक्य किंवा लय पावतात त्या अज्ञानोपहित चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात. 15

516-15
येरु क्षर पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं । तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥ 516 ॥
दुसरा जो क्षर पुरुष म्हणून म्हणतात व ज्याचा व्यवहार जागृति व स्वप्न ह्या अवस्थांत चालतो व त्या दोन्ही अवस्था जेथून उत्पन्न होतात. 16
517-15
पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती । या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥ 517 ॥
किंवा गाढ अज्ञानदशा जी, लोकांत “सुषुप्ति” ह्या नांवाने प्रसिद्ध आहे व जिला ब्रह्मा कां म्हणू नये याला एकच कारण आहे. 17
518-15
साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा । तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता ॥ 518 ॥
अर्जुना, खरोखर, ह्या सुषुप्त्यवस्थेतून जीव स्वप्न व जागृति ह्या अवस्थांना येताच ना, तर त्या सुषुप्तीलाच आम्हीं ब्रह्मस्थिति असे म्हटलें असतें. 18
519-15
परी प्रकृतिपुरुषें दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं । क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें ॥ 519 ॥
पण त्या सुषुप्तिरूप ज्ञानशून्य गगनांत प्रकृति व पुरुष असे दोन ढग येऊन क्षेत्र व क्षेत्रज्ञ असे भेद जिच्या स्वप्नांत दिसतात. ( म्हणून सुषुप्त्यवस्थेला ब्रह्मस्थिति म्हणतां येत नाही. ) 19
520-15
हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा । मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें ॥ 520 ॥
हे राहू दे, अधःशाख ( खाली खांद्या असलेला ) अशा ह्या संसारवृक्षाचें जो प्रथम मूळ ( वस्तूच्या ठिकाणीं अज्ञानाचें आर घेणे ) तो हा अक्षर पुरुष होय. 520

521-15
हा पुरुषु कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें । पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें ॥ 521 ॥
आतां ह्याला पुरुष कां म्हणतात? तर-” पूर्णतया शेते ” गाढ निद्रा घेतो म्हणून किंवा “ मायापुऱ्या शेते” मायापुरीमध्ये शयन करितो म्हणूनही पुरुष म्हणावा. 21
522-15
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा ॥ 522 ॥
विपरीत ज्ञानाचे खेळ जे विकारादि ते ज्या अवस्थेत मुळींच नसतात ती सुषुप्ति (व तोच अक्षर पुरुष होय.)
523-15
म्हणौनि यया आपैसें । क्षरणें या नसे । आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें ॥ 523 ॥
त्या अक्षर पुरुषाच्या अज्ञानोपाधीचा स्वभावतः किंवा ज्ञानावांचून अन्य कशानेही नाश होणे शक्य नाही.
524-15
यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु । केला देशी थोरु । सिद्धांताच्या ॥ 524 ॥
म्हणूनच वेदान्त सिद्धान्ताच्या प्रदेशांत ह्याला “ अक्षर ” अशी संज्ञा दिली आहे.24
525-15
ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण । अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें ॥ 525 ॥
ज्या चैतन्याशी असलेला मायेचा संबंध जीवत्वदशा व जगत् कार्यं ह्यांना कारण आहे तें मायोपहित चैतन्य अक्षर पुरुष जाण. 25
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ॥
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ 15.17॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading