सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

76-14
पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥76॥
पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही,
77-14
तेवीं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे । परी कांहीं अनारिसें । देखिजेना ॥77॥
त्याप्रमाणे आत्म्याचें निवळ स्वरूप ज्या वेळी खरोखर दिसत नाही, व दुसरी काही वस्तू आहे, असाही निश्चय होत नाही.
78-14
ना राती ना तेज । ते संधि जेवीं सांज । तेवीं विरुद्ध ना निज । ज्ञान आथी ॥78॥
रात्र नाही व दिवसही नाही त्या वेळेला जशी सांजवेळ म्हणतात, त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते व स्वरूपज्ञानही नसते केवळ अज्ञान असते.
79-14
ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा । तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम ॥79॥
अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असे म्हणतात. आणि त्या अज्ञानाने गुंडाळलेला जो चित्प्रकाश आहे त्याला क्षेत्रज्ञ असे नाव आहे.
80-14
अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे । तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें ॥80॥
आता क्षेत्रज्ञाचा स्वभाव सांगतात) अज्ञानास महत्व आणावे आणि आपल्या स्वरूपाला तर जाणू नये ते क्षेत्रज्ञाचे स्वरूप समजावे.

81-14
हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु । सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा ॥81॥
हाच क्षेत्रज्ञ व क्षेत्र या दोघांचा संबंध आहे. तो तू बाबा चांगला समज. हा अज्ञानाशी संबंध असणे हा सत्तेचा सामान्य चैतन्याचा सहज स्वभाव आहे.
82-14
आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपांचि देखे । परी रूपें अनेकें । नेणों कोणें ॥82॥
आता वस्तू आपण आपल्यालाच अज्ञानाप्रमाणे म्हणजे दृश्यत्वाने व नाना तर्‍हेने पहातो, परंतु किती अनेक रूपांनी पहाते ते कळत नाही.
83-14
जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला । कां मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां॥83॥
जसा एखादा भ्रमिष्ट झालेला दरिद्री मनुष्य म्हणतो की जा रे, ‘मी राजा आलो आहे’, अथवा जसा एखादा मूर्च्छा आलेला मनुष्य भ्रमाने आपण स्वर्गास गेलो आहोत असे मानतो,
84-14
तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी । तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा ॥84॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपावरून दृष्टी घसरल्यावर मग जे जे दृश्य पुढे मांडले जाते त्याचेच ना व मी सृष्टी प्रसवतो.
85-14
जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखे बहुवा । तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे ॥85॥
ज्याप्रमाणे एकटा निजलेला पुरुष स्वप्नाच्या भ्रमाने अनेक पदार्थरूपाने पहावा (पाहिला जातो) तीच स्थिती आत्म्याची (आपल्या स्वरूपाच्या) स्मरणावाचून आहे.


86-14
हेंचि आनीभ्रांती । प्र मेय उपलवूं पुढती । परी तूं प्रतीती । याचि घे पां ॥86॥
परंतु हे सर्व मी सृष्टीला प्रसवतो वगैरे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, ही दृढ प्रतीती आत ठेऊन तू ऐक
87-14.
तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी । अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे ॥87॥
तरी ही माया माझी विवाहित स्त्री असून, आद्यंतरहित, तरूण, अलौकिक व गुणवान आहे.
88-14
इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप । हें निद्रितां समीप । चेतां दुरी ॥88॥
हिला वस्तुत: अस्तित्व नाही, हेच हिचे स्वरूप आहे. ही अविद्या स्वरूपी निजलेल्यांना जवळ आहे व स्वरूपी जागे असलेल्यांना दूर आहे,
89-14
पैं माझेनिचि आंगें । पहुढल्या हे जागे । आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय ॥89॥
परंतु मी स्वत: झोपलो म्हणजे ही जागृत असते (स्वरूपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येच्या गमज्या चालतात). माझ्या सदत्वाचा आश्रय उपयोगात आणून (उपभोगून) ही (ब्रह्मांडे पोटात साठवलेली) मोठी गरोदर होते.
90-14
महद्ब्रह्मउदरीं । प्रकृतीं आठै विकारीं । गर्भाची करी । पेलोवेली ॥90॥
महद्ब्रह्म आपल्या उदरात प्राकृत आठ विकारांनी जगद्रूप गर्भाची वाढ करते.

91-14
उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्वें प्रसवलें । बुद्धितत्त्व भारैलें । होय मन ॥91॥
उभयतांच्या (माझ्या व मायेच्या) संगात प्रथम बुद्धी तत्व जन्मास आले, ते बुद्धी तत्व (रजोगुणाने) भारले गेले, म्हणजे मन तयार होते.
92-14
तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची । तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय ॥92॥
मनाची तरुण स्त्री जी ममता ती अहंकारतत्व तयार करते व त्यायोगाने पंचमहाभूते स्पष्ट दशेस येतात.
93-14
आणि विषयेंद्रियां गौसी । स्वभावें तंव भूतांसी । म्हणौनि येती सरिसीं । तियेंही रूपा ॥93॥
अणि विषय व इंद्रिये यांचा स्वभावत:च पंचमहाभूतात अंतर्भाव होत असल्यामुळे विषय व इंद्रिये देखील त्या भूतांबरोबरच आकारास येतात.
94-14
जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें । तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों ॥94॥
पंचभूते, विषय व इंद्रिये ही तयार झाल्यानंतर मागील सूक्ष्मप्रकृतीपासून उत्पन्न झालेला हा गर्भपिंड व्यक्त होतो. त्यावेळी वासनेत सूक्ष्मरूपाने राहिलेला जीव जसा असावयास पाहिजे, तसा त्या गर्भपिंडात प्रवेश करतो
95-14
रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका । जीवीं बांधें उदका भेटतखेंवो ॥95॥
ज्याप्रमाणे बीजाचा दाणा पाण्याला भेटल्याबरोबर आपल्यामधे वृक्षाचा सूक्ष्म आकार तयार करतो.


96-14
तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें । आर घेवों लागे । आणियाची ॥96॥
त्याप्रमाणे माझ्या संगाने अविद्या ही अनेक जगरूपी अणकुचीदार अंकुर घेऊ लागते.
97-14
मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया । तें परियेसें राया । सुजनांचिया ॥97॥
हे सुजनाच्या राजा अर्जुना, त्यावेळी मग त्या गर्भगोलाचा आकार कसा व्यक्त होतो ते ऐक.
98-14
पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज । उमटती सहज । अवयव हें ॥98॥
तेव्हा अंडज, स्वेदज, उद्भिज व जरायुज असे हे अवयव स्वभावत: उमटतात.
99-14
व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें । मणिजु उससे । अवयव तो ॥99॥
मणीज हा अवयव आकाश व वायू यांच्या योगाने गर्भरस वाढाल्याने जीवन पावतो.
100-14
पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें । उठितां निफजे । स्वेदजु गा ॥100॥
तम व रज हे दोन गुण पोटात घालून आप आणि तेज यांचे आधिक्य झाले असता, निश्चयेकरून स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading