हनुमान जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

१ देवांगना हातीं आणविला
२ आनंदोनी म्हणे राया धन्य केलें
४ विभाग सत्वर वसिष्ठानें केले
५ पिंड घारीनें झडपिला

हनुमान जन्माचे अभंग प्रारंभ

देवांगना हातीं आणविला
देवांगना हातीं आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरीं वेगीं आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्हीं देखतां नयनीं । आनंदला मनी म्हणॆ नामा ॥४॥

आनंदोनी म्हणे राया धन्य केलें
आनंदोनी म्हणे राया धन्य केलें । इच्छिलें सोहळे पुरवीन ॥१॥
यज्ञाचा आरंभ करी लवलाह्मा । पुसोनी आचार्या वसिष्ठांसी ॥२॥
सर्व ऋषीजन मिळाले सकळ । मंत्रांचा कल्लोळ करिताती ॥३॥
नामा म्हणे शृंगी मुख्यत्वें शोभला । यज्ञ आरंभिला तेणें जेव्हां ॥४॥

आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र
आरंभिला यज्ञ सन्तोष सर्वत्र । आनंदे नगर दुमदुमीत ॥१॥
यज्ञनारायण सन्तोष पावला । प्रत्यक्ष तो आला कुंडांतुनीं ॥२॥
पायस तें पात्र घेऊनियां करीं । शृगीस झडकरी बोलतसे ॥३॥
विलंब करितां विघ्न ओढवेल । सत्वर वहिले भाग करा ॥४॥
नामा म्हणे देव येईल पोटासीं । ऎंसे गूज त्यासी अग्नी सांगे ॥५॥

विभाग सत्वर वसिष्ठानें केले
विभाग सत्वर वसिष्ठानें केले । राया बोलाविलें सान्निधचि ॥१॥
प्रथम तो भाग कौसल्यसी दिला । तेणें क्रोध आला कनिष्ठेसी ॥२॥
येतांचि तो क्रोध विघ्न ओढवलें । मुखीं झडपिला पिंड घारीं ॥३॥
आसडोनी पिंड घारीनें पै नेला । नामा म्हणे घातिला अंजनी करीं ॥४॥

सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाणा घारी झाली ॥१॥
अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करविला ॥२॥
शृंगी पायसपात्र दिधलें वसिष्ठा हातीं । त्वरें करीजेती तीन भाग ॥३॥
तीन भाग वसिष्ठें करुनी निश्चितीं । दिधलें राणी हातीं तिघी तीस ॥४॥
कैकई रुसली तेथें विघ्न झालें । घारीनें तें नेलें निजभागा ॥५॥
एका जनार्दनी घारीं पिंड नेतां । पुढें झाली कथा श्रवण करा ॥६॥

पिंड घारीनें झडपिला
पिंड घारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं । महारुद्र आले पोटीं ॥२॥
चैत्र शुद्ध पौर्णिमेसी । सुर्योदय समयासी ॥३॥
महारुद्र प्रगटला । नामा म्हणे म्यां वंदिला ॥४॥

ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥
तपाचिया अंती शिव झाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
येरी म्हणे तुज ऐसा व्हावा मज पुत्र । ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी ॥३॥
म्हणतसे शिव अंजुळी पसरुनी । बैस माझे ध्यानीं सावधान ॥४॥
वायुदेव येउनी प्रसाद देईल तुजला । भक्षीं कां वहिला अविलंबें ॥५॥
एका जनार्दनीं घारीं नेतां पिंड । वायूनें प्रचंड आसुडिला ॥६॥

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥
नवमास होतां झाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥
वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥
जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥
अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥
वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥
सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥
सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥
तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥

हनुमान जन्माचे अभंग समाप्त

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *