201-9
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥201॥
ते साधू पहांट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात; अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवांचे रक्षण करतात; व योगसाधनाशिवाय धडधडीत डोळ्यांसमोर मोक्ष दाखवितात.
202-9
परि राया रंका पाड धरुं । नेणती सानेयां थोरां कडसणी करुं । एकसरें आंनदाचे आवारु । होत जगा ॥202॥
परंतु राजात व रंकात अंतर मानीत नाहीत, व लहान थोर जाणीत नाहीत. याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर होतात.
203-9
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥203॥
वैकुंठास जाणारा क्वचितच आढळतो; परंतु ह्या साधूंनी सर्व जगच वैकुंठ केले. अशा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व जग पवित्र केले.
204-9
तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥204॥
त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मल आहे. परंतु त्या सूर्यातही तो अस्तास जातो हा दोष आहे, चंद्रासारखे म्हणावे, तर तो एखादे वेळेसच पूर्ण असतो.
205-6
मेघ उदार परि वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥205॥
परंतु हे साधू नेहमी पूर्णत्वास पावलेले आहेत. यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे, तर तो ओसरतो; म्हणून उपमा देण्यास योग्य होत नाही. तर हे साधू निःशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत.
206-9
जयांचे वाचेपुढां भोजे । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे । एकवेळ मुखासि यावया ॥206॥
ज्या माझ्या नांवाचा मुखाने एकदा उच्चार होण्याकरिंता सहस्त्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नांव ज्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते, (ज्या माझ्या नांवाचा असा महिमा आहे,)
207-9
तो मी वैकुंठीं नसें । एक वेळ भानुबिंबींही न दिसें । वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥207॥
तो मी वैकुंठलोकीही नसतो, एखादे वेळी सूर्यमंडळातही दिसत नाही; इतकेच नव्हे तर, योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो,
208-9
परि तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥208॥
परंतु, हे पांडवा; जरी मी कोठे सापडलो नाही, तरी जे माझ्या नांवाचा सतत घोष करतात, त्यांच्याजवळ सापडायचाच.
209-9
कैसे माझां गुणीं धाले । देशकाळातें विसरले । कीर्तनसुखें झाले । आपणपांचि ॥209॥
ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की, ते देशकालाला विसरून मन्नामसंकीर्तनाच्या योगे आपल्या ठिकाणींच सुखी झालेले असतात.
210-9
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥210॥
कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या शुद्ध नांवांच्या कवितेने आत्मानात्मविचार करुन ते सतत नामस्मरण करतात.
211-9
हें बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक विचरती चराचरीं । पांडुकुमरा ॥211॥
हे पंडुकुमरा, अशा प्रकारे आणखी पुष्कळ तऱ्हांनी माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतांत हिंडतात.
212-9
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेउनी ॥212॥
अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना अंतर्यामी जिंकून जयपत्र मिळवितात.
213-9
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥213॥
बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून, आंत मूळबंधाचा कोट तयार करतात, व त्यावर प्राणायामरूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात.
214-9
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडे । मन पवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचें पाणियांडे । बळियाविलें ॥214॥
मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन, तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे – सतराव्या कलेचे तळे स्वाधीन करुन घेतात.
215-9
तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहेरिली । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥215॥
त्या वेळी प्रत्यहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादि विकारांचा, परिवारासह फडशा करतो? आणि इंद्रिये बांधून ह्रदयांत आणतो.
216-9
तंव धारणावारु दाटिले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥216॥
इतक्यांत धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करतात, व संकल्पाचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धि, चित्त व अहंकार) नाहींसे करतात.
217-9
तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निसाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥217॥
नंतर जयजयकार शब्द होतो; ध्यानरूपी नौबद वाजूं लागून एकरूपतेचे छत्र चमकूं लागते.
218-9
पांटी समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु देखां । समरसें जाहला ॥218॥
मागाहून समाधिरूप लक्ष्मीचा अखंड -आत्मानुभवरुपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो.
219-9
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥219॥
हे अर्जुना, असे जे माझे कठीन भजन, ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक.
220-9
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतु अंबरीं । तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥220॥
वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतुच असतो, त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जगत् दुसरे कशानेही व्यापलेले नाही, अशी त्यांची समजूत आहे.
221-9
आदि ब्रह्मा करुनी । शेवटीं मशक धरुनी । माजी समस्त हें जाणोनी । स्वरुप माझें ॥221॥
ब्रह्मदेव एका बाजूस व दुसरे बाजूस चिलीट धरून मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे कांही नाही असे तें समजतात.
222-9
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥222॥
मग लहान व मोठे, सजीव व निर्जीव असा भेद न धरतां जी जी वस्तु दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहेत.
223-9
आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥223॥
अशा सरळ भावानें ते जीवमात्राला नमस्कार करतात. आपला मोठेपणा विसरून, पुढे येणारी वस्तु योग्य आहे किंवा अयोग्य आहे हें न जाणतां सरसकट सर्व वस्तूंला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते.
224-9
जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥224॥
ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे, जो प्राणी दृष्टीस पडेल त्यांस नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो.
225-9
कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥225॥
किंवा फळाने भरलेल्या झाडाची खांदी जशी सहज भुईला लावल्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे प्राणीमात्रापुढे ते नमस्कार घालतात.