पंढरपुर वारी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

1.                  वारी – पंढरपूर महात्म्य

अभंग संख्या: १२

अवघें जेणें पाप नासे

आमुची मिरास पंढरी

करा करा लाग पाठ । धरा पंढरी

चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा

नातुडे जो कवणे परी

पंढरीचें भूत मोठें

पंढरीसी जाय । तो विसरे बापमा

पंढरीसी जा रे आल्यांनो संसारा

पंढरीची वारी आहे माझें घरीं

ब्रीद ज्याचें जगदानी

भक्तवत्सल दीनानाथ

वाराणसी गया पहिली द्वारका|

साधन संपत्ती हेंचि माझें धन

होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी

1.      होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी

होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥धृ.॥
अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥२॥
तुका ह्मणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

2.      पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय

पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥धृ.॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥
तुका ह्मणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥

3.      करा करा लाग पाठ । धरा पंढरीची  

करा करा लाग पाठ । धरा पंढरीची वाट ।
जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतुनी ।
करा म्हणउनी । हा विचार ठायींचा ॥२॥
होतीं गात्रें बेंबळी । दिवस अस्तमाना काळीं ।
जंव मोकळी आहे ती ॥३॥
कां रें घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें ।
तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥४॥

4.      आमुची मिरास पंढरी

आमुची मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥
पांडुरंग आमुचा पिता । रखुमाबाई अमुची माता ॥२॥
भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा अमुची बहिणी ॥३॥
तुका जुनाट मिरासी । ठाव दिला पायापाशीं ॥४॥

5.      अवघें जेणें पाप नासे

अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥१॥
गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥२॥
अवघी सुखाचीच रासी । पुंडलीकाशी वोळली ॥३॥
तुका म्हणे जवळी आलें । उभें ठेलें समचरणी ॥४॥

6.      नातुडे जो कवणे परी

नातुडे जो कवणे परी । उमा केला विटेवरीं ॥१॥
भला भला पुंडलिका । मानलासी जन लोकां ॥२॥
कोण्या काळें सुखा । ऐसा कोण पावता ॥३॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥४॥
तुका म्हणे धन्य झालें । भूमीं वैकुंठ आणिलें ॥५॥

7.       पंढरीचें भूत मोठें

पंढरीचें भूत मोठें । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥
बहु खेचरीच रान । जातां वेडें होय मन ॥२॥
तेथें जाउं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनी ॥३॥
तुका म्हणे पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाहीं आला ॥४॥

8.      वाराणसी गया पहिली द्वारका

वाराणसी गया पहिली द्वारका । परि नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी लोका नाही अभिमान । पायां पडे जन एकमेकां ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥

9.       साधन संपत्ती हेंचि माझें धन

साधन संपत्ती हेंचि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेरची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥२॥
वैष्णवांचा संग रामनाम गाणें । मंडित भूषणें अलंकार ॥३॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावें पायीं ॥४॥
मायबाप दोघें पाहतील वाट । ठेवूनियां कटीं कर उभीं ॥५॥
तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥६॥

10.              ब्रीद ज्याचें जगदानी

ब्रीद ज्याचें जगदानी । तोचि मनीं स्मरावा ॥१॥
सम पाय कर कटीं । उभा तटी भिवरेच्या ॥२॥
पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥३॥
तुका म्हणे भक्तिकाजा । धांवे लाजा लवलाहें ॥४॥

11.              भक्तवत्सल दीनानाथ

भक्तवत्सल दीनानाथ तिहीं लोकीं ज्याची मात ॥१॥
तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटी ॥२॥
गर्भवासा धरी । अंबऋषीचा कैवारी ॥३॥
सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥४॥
तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥५॥

12.              चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा पाहूं

चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥२॥
संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥
तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥४॥
जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥५॥

पंढरपूर आषाढी-कार्तिक वारी महिमा

1.      संपदा सोहळा नावडे

संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टाकला पंढरीचा ॥ १ ।
जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥

2.      आषाढी पर्वकाळ एकादशी

आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरि जागरण देवा प्रिय ॥१॥
निराहारे व्रत जो करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरी ॥२॥
व्रत आचरती हरिकथा करिती । नाम घोष गाती आवडीने ॥३॥
प्रदक्षणा तीर्थ आदरे सेविती । पूर्वज ते जाती वैकुंठासी ॥४॥ |
पुंडलिकाचे दर्शन चंद्रभागे स्नान । विठ्ठल दरुशने धन्य होती ॥५॥
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम । तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ॥६॥

3.      आषाढी कार्तीकी विसरू

आषाढी कार्तीकी विसरू नका मज । सांगते गुज पांडुरंग ॥१॥
पतित पावन मी तो आहे खरा । तुमचेनी बारा दिसतसे ॥२॥
तुम्ही जाता गावा हुरहूर माझे जीव । भेटल केधवा मजलागी ॥३॥
धावोनिया देव गळा घाली मिठी । स्फुंदस्फुंदूनी गोष्टी बोलतसे ॥४॥
तीही त्रिभुवनी मज नाही कोणी । म्हणे चक्रपाणी नामायासी ॥५॥

संपूर्ण पंढपूर महात्म्य, अभंगासहित

संपूर्ण पंढपूर महात्म्य, अभंगासहित

वारकरी सांप्रदाय परिचय

वारकरी सांप्रदायिक नित्यनेम

वारकरी ग्रंथ

वारकरी वैभव

वारकरी संपर्क

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *