सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८७६ ते ९०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

876-13
आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम ॥876॥
आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रि` ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा, हे नाव आहे.
877-13
पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥877॥
जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पहाणारी आहे.
878-13
म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥878॥
म्हणून ‘विश्वतचक्षु’ (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत असा) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्य़ास वेद तयार झाला.
879-13
जें सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥879॥
जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा’ म्हटले जाते.
880-13
पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥880॥
अर्जुना, असे पहा कीश अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे,

881-13
यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥881॥
या कारणाने अर्जुना त्याला `विश्वतोमुख’ म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला.
882-13
आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न । तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥882॥
आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून असते त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत.
883-13
म्हणौनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥883॥
म्हणून आम्ही त्यास,सर्व ठिकाणी ऐकणारे’ असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे.
884-13
एऱ्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिया व्याप्ती । रूप केलें ॥884॥
ब्रह्माचे द्वैताने वर्णन का केले?
हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु’ या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले.
885-13
वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे? । सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जें ॥885॥
एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ठिकाणी (ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी) हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे?

886-13
पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे । परी ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई? ॥886॥
एका लाटेने दुसर्‍या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे ग्रासले जाणार्‍याहून वेगळे आहे काय?
887-13
तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक? । परी बोलावया नावेक । करावें लागे ॥887॥
त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तेथे व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो.
888-13
पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥888॥
शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवायचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृती) करावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते.
889-13
एऱ्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥889॥
अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत केले, नाही तर गुरुशिष्यांच्या सन्मार्गाला (संप्रदायाला) पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल.
890-13
म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥890॥
अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या सहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

891-13
तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं । तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥891॥
ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामधे व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक.
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥13.14॥

भावार्थ ~> सर्व चक्षु आदि इंद्रिये व सत्वादि गुण यांच्या आकाराने ते भासते (असे दिसते), पण ते स्वत: सर्व इंद्रियानी विरहित आहे. ते (सर्वत्र) असक्त आहे, तथापि सर्वभृत् आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे.
892-13
तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥892॥
तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे अथवा वस्त्रामधे तंतू जसा वस्त्र होऊन आहे.
893-13
उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥893॥
पहा की पाण्यामधे रस, जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामधे दिवा होऊन जसे तेज असते,
894-13
कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥894॥
ज्याप्रमाणे कापुरामधे सुगंध, कापूर होऊन असतो अथवा शरीरामधे जसे कर्म शरीर होऊन असते.
895-13
किंबहुना पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥895॥
फार काय सांगावे? अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा होऊन असतो, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे.

896-13
परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥896॥
येथून ब्रह्माची व्याप्ती जगामधे कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवतात). परंतु ते सोने तुकडेपणामधे असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते, पण वास्तविक पाहिले तर (तुकड्याच्या आकाराने असणारे) सोने हे सोन्यासारखेच आहे.
897-13
पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥897॥
हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला तरी पाणी जसे सरळच असते अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नी जसा लोखंड होत नाही.
898-13
घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें । मठीं तरी चौफळें । आये दिसे॥898॥
घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामधे जसे वाटोळे आहे, असे वाटते व मठामधे सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते.
899-13
तरि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें । जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे ॥899॥
परंतु आकाश हे जसे ते अवकाश (घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळी) झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार (मनादि इंद्रिये अथवा सत्वादि गुणादिक) होऊन, जे विकारवान झाले नाही.
900-13
मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- । सारिखें ऐसें धनंजया । आवडे की र॥900॥
अर्जुना ते ब्रह्म, मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादि गुणांसारखे असल्याचे (वरवर) दिसते खरे.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *