सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , ,

351-15
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ 351 ॥
काय सांगावें ! आत्मा चोखट खरा ! (शुद्धअसंग ) पण, प्रकृतीपाशी ऐक्य पावून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या माथ्यावर घेतो. 51
352-15
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें । तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥ 352 ॥
मन धरून होणारी सहा ज्ञानेंद्रियें हीं वस्तुतः प्रकृतिकार्ये आहेत, ती माझीं असें म्हणून, त्यांच्याकडून होणाच्या व्यापाराचा हाच कर्ता होतो. 52
353-15
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥ 353 ॥
ज्याप्रमाणे स्वनांत एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनून त्यांच्या मोहानें इतस्ततः धांवावें, 53
354-15
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥ 354 ॥
याप्रमाणे, स्वस्वरूपाच्या विस्मृतीमुळे (स्वप्नांतील कुटुंबाप्रमाणे) आत्मा हा आपणच प्रकृतीसारख बनून पुन्हा तिचींच कार्यं करू लागतो. 54
355-15
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ॥ 355 ॥
ती अशीं-मनाच्या रथावर आरूढ होऊन, श्रवणेंद्रियद्वारा बाहेर पडून शब्दारण्यांत प्रवेश करितो;

356-15
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥ 356 ॥
मग त्या रथाचा मोर्चा बदलून त्वगिंद्रियद्वारा स्पर्शरूपी घोर वनांत शिरतो. 56
357-15
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं । मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे ॥ 357 ॥
कधी नेत्रद्वारा बाहेर पडून रूपविषयरुपी पर्वतावर स्वैर संचार करितो.57
358-15
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥ 358 ॥
किंवा, अर्जुना, जिव्हेच्या द्वाराने निघून रसांची दरी जे उदर तेंच भरु लागतो. 58
359-15
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें । मग गंधाची दारुणें । आडवें लंघी ॥ 359 ॥
किंवा घ्राणेंद्रियद्वारा, माझा अंश जो हा जीव तो जेव्हां बाहेर पडतो, तेव्हां गंधाची मोठाली अरण्ये ओलांडतो. 59
360-15
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें । भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ॥ 360 ॥
अशारीतीने देहेंद्रियांचा स्वामी जो जीव तो, मनाला हाताशी धरून शब्दस्पर्शादि पंचविषयांचा भोग घेतो. 360
शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥15. 8॥

361-15
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे । जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥ 361 ॥
पण जीवावें हें कर्तुत्व, भोक्तृत्व, तो जेव्हां एखाद्या शरीराचा आश्रय करील तेव्हांच अनुभवाला येतं. 61
362-15
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया । जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥ 362 ॥
पुरुषाची संपन्नता किंवा त्याचा विलासीपणा, हीं, तो जेव्हां एखाद्या राजवाडासारख्या बंगल्यांत रहावयास येतो, तेव्हांच प्रत्ययाला येतात. 62
363-15
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे ॥ 363 ॥
जीवाला जेव्हां देह प्राप्त होतो तेव्हांच त्याच्या अहंकर्ता ह्या बुद्धीची वाढ, व विषयेंद्रियांचा धुमाकूळ ह्याचा निवाडा (स्पष्टता) होतो. 63
364-15
अथवा शरीरातें सांडी । तऱ्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ 364 ॥
अथवा, शरीरत्याग करतांना जीव आपल्याबरोबर येथील मन व ज्ञानेंद्रियें ह्यांचा समुदाय बरोबर घेऊन अन्य शरीरांत जातो. 64
365-15
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥ 365 ॥
अपमान करून अतिथीला विन्मुख केल्यास तो आपल्याबरोबर जसे यजमानाचे आणखी पुण्यही हरण करून नेतो, अथवा कळसूत्री खेळाचा दोरा काढून नेल्यास त्याबरोबर त्या चित्रांची गतीही जाते. 65

366-15
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें । हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी ॥ 366 ॥
अथवा सूर्य अस्तास जातांना बरोबर जशी लोकांची दृष्टीही नेतो, किंवा हे असो वारा आपल्याबरोबर जसा गंध (वास) नेतो. 66
367-15
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥ 367 ॥
त्याप्रमाणे, अर्जुना, हा देहस्वामी जो जीव, तो, हा देह सोडून जातांना, आपल्याबरोबर, मनासह असणाच्या सहा ज्ञानेंद्रियांना घेऊन जातो. 67
श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॥ 15.9॥

368-15
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी । तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ॥ 368 ॥
मग येथे असो, अथवा स्वर्गात असो; त्याला जेथे जो देह प्राप्त होईल या देहांत ह्या मनादिकांची तशीच व्यवस्था लावतो. 68
369-15
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥ 369 ॥
अर्जुना, दिवा मालविला असतां जसा आपल्या प्रभेसह जातो व पुन्हा लावला तर प्रभेसहच लावावा तेथें प्रकट होतो. 69
370-15
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुलें हें किरीटी । गमेचि गा ॥ 370 ॥
असे आहे,तरी, अर्जुना, हा क्रम चालू असतां अविवेकी जनाला एवढे तरी वाटणारच: 370

371-15
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती ॥ 371 ॥
कीं, आत्माच जन्माला आला, आणि विषयही त्यानेच भोगिला, तसेच आत्माच मेला; त्यांच्या दृष्टीने हा सर्व व्यवहार सत्य आहे. 71
372-15
एऱ्हवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें । हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ॥ 372 ॥
एऱ्हवीं विचारदृष्टीने पाहतां, येणे, जाणे, करणं, भोगणे हे सर्व प्रकृतीचे धर्म आहेत; पण तो ते आत्मधर्म असे मानतो. 72
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ 15.10॥
यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ 15.11॥

373-15
परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ॥ 373 ॥
देहाच्या आकाराच लहानसा पिंड उत्पन्न होऊन तेथें चेतना दिसू लागली की आत्मा आला असे म्हणतात. 73
374-15
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ॥ 374 ॥
त्याच प्रमाणे, अर्जुना, त्याच्या संगतीने इंद्रियें आपापल्या विषयांचा व्यापार करू लागली कीं तो त्याच भोग चालू आहे असे म्हणतात. 74
375-15
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा ॥ 375 ॥
भोग घेण्याचे संपून, आपोआप देह गेल्यावर चेतना दिसेनाशी झाली कीं, आत्मा गेला रे गेला अस एकच गिल्ला करितात.

, , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *