शुक्रवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शुक्रवार चे अभंग प्रारंभ

शुक्रवार चे अभंग
अभंग संख्या : ०९

१ तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा
२ पति जन्मला माझे उदरीं
३ निर्गुण निराकार दादा माहूर माझें
४ सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला
५ सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो
६ सुंदर मुख साजिरें कुंडलें
७ फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह तूं गे बाई*
८ पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा
९ स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला

1.            तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा

तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा ।
माझे मन लागों तुझ्या पायीं हो करीं कृपा ।
तुं सावळे सुंदरी हो करीं कृपा ।
लावण्य मनोहरी हो करीं कृपा ।
निजभक्तां करुणा करी हो करीं कृपा ।
पंढरपुरीं राहिली । डोळां पाहिली ।
संतीं देखिली । वरुनि विठाई वरुनि विठाई ॥१॥
सच्चिदानंद अंबाबाई हो करीं कृपा ।
उजळ कुळदीपा । बोध करीं सोपा ।
येऊनी लवलाही येऊनी लवलाही ॥२॥
तुझा देव्हारा मांडिला हो करीं कृपा ।
चौक आसनीं कळस ठेविला हो करीं कृपा ।
प्रेमचांदवा वर दिधला हो करीं कृपा ।
ज्ञानगादी दिली बैसावया हो करीं कृपा ।
वरी बैसविली आदिमाया हो करीं कृपा ।
काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार ।
त्यांचें बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥
शुक सनकादिक गोंधळी हो करीं कृपा ।
नाचताती प्रेमकल्लोळीं हो करीं कृपा ।
उदो उदो शब्द आरोळी हो करीं कृपा ।
पुढे पुंडलिक दिवटा हो करीं कृपा ।
त्याने मार्ग दाविला निटे हो करीं कृपा ।
आई दाविली मूळपीठा हो करीं कृपा ।
बापरखमादेविवरु । सुखसागरु ।
त्याला नमस्कारू । सर्व सुख देई ॥४॥

2.            पति जन्मला माझे उदरीं

पति जन्मला माझे उदरीं ।
मी झालें तयाची नोंवरी ॥१॥
पतिव्रता धर्म पाहा हो माझा ।
सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२॥
निर्गुण पति आवडे मज ।
आधीं माय पाठीं झालिये भाज ॥३॥
मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ।
ज्ञानदेवो निरंजनीं क्रिडा करी ॥४॥

3.            निर्गुण निराकार दादा माहूर माझें

निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव ।
शंकुन सांगावया आले यमाई माझें नाव ।
तये नगरीं वस्ती केली मी तरी आलें एकभावें ।
ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावें॥१॥

कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश ।
शकुन सांगावया मी आलें कलियुगास ।
ब्रह्याविष्णु महेश पुसती शकुन आम्हांस ।
ऐसें निदान आम्हीं सांगितलें त्यास ॥२॥

धरित्री आकाश मज देखतां उप्तत्ती ।
चंद्र सुर्य दादा मज देखतां होतीं ।
ब्रह्याविष्णुमहेश मज देखतां उपजती ।
जेथें आहे शिव तेथें आदि शक्ती ॥३॥

दाही अवतार मज देखतां झाले ।
अकराही रुद्र दादा होऊनियां गेले ।
अठ्ठयाशीं सहस्त्र ऋषी मज देखतां जन्मले ।
ब्रह्मादि तेहतीस कोटी खेळविले ॥४॥

अठ्ठावीस युगें झाली चक्रवर्ती ।
कौरव पांडव गेले दादा नेणों किती ।
छ्प्पन्न कोटी यादव गेले दादा कोणी पंथीं ।
आम्ही तुम्ही जाऊं मागें कोणी न राहाती ॥५॥

पृथ्वीमध्यें दादा एका विपरीत होईल ।
बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल ।
पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल ।
सहा वरुषांची नारी गर्भिण होईल॥६॥

आणिक एक दादा माझा ऐकावा बोल ।
पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल ।
थोर थोर दादा पर्वत उडोनि जातील ।
अठराही जाती एके ठिकाणीं जेवतील ॥७॥

कलियुगाची दादा ऐकावी थोर ।
पुत्र तो होईल पित्याचा वैरी ।
भ्रतारा सोडोनी घरोघरीं फिरतील नारी ।
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥८॥

आणिक एक दादा माझे ऐका उत्तर ।
आकार जाईल अवघा होईल निराकार ।
जाती चंद्र सूर्य मग पडेल अंध:कार ।
धरित्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥९॥

आणिक एक शकुन माझा ऐकावा संतीं ।
तुम्ही मूळ पिठीं राहणें नाव माझें आदिशक्ती ।
अबेंचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमूर्ति ।
एका जनार्दनीं प्रसन्न झाली आदिशक्ती ॥१०॥

4.            सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञानवैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत जळिला वो ।
घालुनि सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥१॥
उदो बोला उदो सदगुरु माऊलीचा वो ॥धृ.॥
प्रवृत्तीचें आणि निवृत्तीचें घालुनि शुध्द आसन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो ।
कायावाचामनें एकाविध केलें अर्चन वो ।
व्दैतअव्दैतभावें दिलें आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान यांहीं पूजियेली अंबा वो
सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥

5.            सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो

सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।
पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असे वो ।
नवस पुरवी माझ्या मनींची जाणोनियां इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥
बैसली देवता पुढें वैष्णवांचे गाणें वो ।
उद्गारें गर्जती कंठीं तुळशीचीं भूषणें वो ॥४॥
स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो ।
ओवाळली माता विठोबाई पंचभूतीं वो ॥५॥
तुझें तुज पावलें आतां नवस पुरवीं माझा वो ।
तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥

6.            सुंदर मुख साजिरें कुंडलें

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो ।
नागर नागखोपा केशर कस्तुरी मळवटीं वो ।
विशाळ व्यंकटनेत्र वैजयंती तळपे कंठीं वो ।
कांस पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
अति वरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा वो ।
राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटी रविशशीप्रभा तेजें लोपल्या सकळा वो ।
नकळे ब्रम्हादिकां अनुपम्य हिची लीला वो ॥२॥
सांवळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो ।
सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।

कटीं क्षुद्र घंटिका शध्द करिताती माधुरी वो ।
गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥३॥
अष्टांगीं मंडित काय वर्णावी रुप ठेवणी वो ।
सोलीव शुद्ध रसाची ओतील लावाण्याची खाणी वो ।
सर्वकाळसंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो ।
बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥४॥
घटस्थापना गेली पंढरपुर महानगरीं वो ।
अस्मानी मंडप दिला तिन्ही तळांवरी वो ।
आंरभिला गोंधळ हिनें चंद्रभागेतीरीं वो ।
आली भक्तीकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो॥५॥
तेहतीस कोटी देव चांमुडा अष्ट कोटी भैरव वो ।
आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन ब्रम्हानंदें करिती गंधर्व वो ।
वंदी चरणरज तेथें तुकयाचा बांधव वो ॥६॥

7.            फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह

फुगडी फूगे बाई फू ।
निजब्रम्ह तूं गे बाई परब्रम्ह तूं गे ॥धृ॥
मनचित्त धू । विषयावरी थू ॥१॥
एक नाम मांडी । दुजाभाव सांडी ॥२॥
हरि आला रंगीं । सज्जनांचे संगीं ॥३॥
सकळ पाहे हरि । तोचि चित्तीं धरीं ॥४॥
नमन लल्लाटीं । संसारेसी साटी ॥५॥
वामदक्षिण । चहूं भुजीं आलिंगन ॥६॥
ज्ञानदेवे गोडी । गेली संसारा फुगडी ॥७॥

8.            पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा

पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा ।
सांपडला ते साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरि ह्रदयीं धरा ।
आळस नका करुं सांगतों लहाना थोरां ॥१॥
याहो याहो बाईयांनो निघाले हरी ।
सिलंगणा वेगीं घेउनी आरत्या करी ।
ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं ।
आम्हां दैव आलें येथें घरींच्या घरीं ॥२॥
अक्षय मुहूर्त औटामध्यें साधतें ।
मग येरी गर्जे जैसें तैसें होत जाते ।
म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें ।
सांडा परते काम जाऊं हरी सांगातें ॥३॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं ।
नका गई करुं आईकाल ज्या कानीं ।
मग हें सुख तुम्ही कधी न देखाल स्वप्नीं ।
उरेल हाय हाय मागें होईल कहाणी ॥४॥
ऐसियास वंचता त्याच्या अभाग्या पार ।
नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।
मग ही वेळ घटिका न ये अजरामर ।
कळलें असो द्या मग पडतील विचार ॥५॥
जयासाठीं ब्रम्हादिक झाले ते पिसे ।
उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे ।
अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे ।
तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासे ॥६॥

9.            स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला

स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो ।
चारी वेदांचा फुलवरा बांधिला वो ।
शास्त्रें पुराणें अनुवादती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥
उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो ॥धृ.॥
जीवशिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो ।
अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो ।
तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।
पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो ।
एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥३॥

शुक्रवार चे अभंग समाप्त

सात वाराचे अभंग पहा

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *