२९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २९.

श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाहानिमि त्य निरनिराळ्या देशींचे राजे परिवारासह आवर्जुन आलेत.सृंजय,केकय,विदर्भ इत्यादी देशांचे राजे स्वतः पुढाकार घेऊन लग्नसमारंभातील कामे अगदी बिनबोभाट पार पाडीत होते.अश्या तर्‍हेने त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला.दोघांचे एकमेकांवर निःस्सिम प्रेम होते.रुख्मिणी श्रीकृष्णाची पट्टराणी झाली.गृहस्थाश्रम उत्कृष्ट रितीने सुरु झाला.थोड्याच दिवसांत त्यांच्या संसारवेलीवल प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला.प्रद्युम्न म्हणजे शंकराने भस्म केलेल्या मदनाचा अवतारच!त्याच्या पाठोपाठ रुख्मिणीला चारुदेष्ण,सुदेष्ण, चारुगुप्त,चारुविद,चारु,सुचास,भद्रचास असे सुंदर नऊ पुत्र आणि चारुमती नांवाची अतिसुंदर कन्या झाली.


त्यावेळच्या क्षत्रिय प्रथेनुसार श्रीकृष्णाने आणखी सात विवाह केले.या आठ राण्यांमधे रुख्मिणी सर्वात जेष्ठ व पट्टराणी असल्याने,ती सर्व जबाबदारी मोठ्या कुशलतेने व समर्थपणे,निःपक्ष पणे सांभाळत होती.अर्थात सवतीमत्सर हा स्री चा स्थायीभाव नैसर्गिकच आहे, पण! उत्कृष्ट आदर्श घालुन देणारा अष्ट नायिकांचा पतीही तितकाच चतुर व कुशल होता.तो प्रत्येकीशी अशा तर्‍हेने वागत असे की,प्रत्येकीला वाटायचे, आपल्या पतीचे प्रेम फक्त आपल्यावरच आहे.
प्रत्येकीचा वाडा,दासदासी वेगवेगळ्या होत्या.श्रीकृष्णाच्या प्रमुख सात भार्याः-


ससत्रजित राजाची कन्या सत्यभामा, हिचा मान रुख्मिणीच्या खालोखाल,पण पट्टराणीचा मान न मिळाल्यामुळे कधी कधी तीला विषाद वाटे.तशी ती मनाने चांगली होती,पण थोडी मत्सरी होती.२)नग्नजित राजाची कन्या ‘नाग्नजिती’ सत्या,३)सुंदता,४)मद्रराजाची कन्या,लक्ष्मणा,५)ऋशराज जांबवानची कन्या जांबवती,६)मित्रविंदा,७) कालिंदी.या सातही राण्यांना श्रीकृष्ण सारख्याच प्रेमाणे वागवित असे.त्या सर्वांना अनेक पुत्र व कन्या झाल्यात. सत्यभामेचा विवाह जगभर विख्यात असलेल्या “स्यमंतक” मण्याचा मनोरंज क इतिहास आहे.सत्रजित नावाचा प्रमुख सरदार इतर यादवांबरोबर मथुरेहुन कृष्णाबरोबर द्वारकेत आला होता.त्याने अहोरात्र सूर्यउपासना केल्याने प्रसन्न झालेल्या सूर्यदेवाने त्याला अत्यंत दैदिप्यमान स्यमंतक मणी दिला.

या मण्याची स्थापना त्याने देवघरांत केली होती.हा मणी स्वयंप्रकाशितच नव्हता तर,रोज आठ भार सोने देत असे,सत्रजित तसे अतिशय सधन होते.वास्तविक त्यांना अधिक धनाची आवश्यकता नव्हती. यादव मथुरा सोडुन द्वारकेत आल्यानंतर मथुरेची परिस्थिती खालावली होती. शिवाय जरासंध व शत्रु राजांच्या मथुरेवर होणार्‍या वारंवार स्वार्‍यांमुळेही मथुरा डबघाईला आली होती.उग्रसेनबद्दल कृष्णाच्या मनात आदर,व जन्मभूमी असल्याने ती सुखी व सपन्न व्हावी या उद्देशाने रोज सुवर्ण देणारा स्यमंतक मणी जर उग्रसेनला मिळाला तर मथुरेची अडचण दूर होईल,केवळ याच हेतूने सात्रजितकडे स्यमंतक मण्याची मागणी केली पण त्याने नकार दिला.कृष्णाने ही गोष्ट मनातुन काढुन सुध्दा टाकली.


एके दिवशी सत्रजितचा जुळा भाऊ प्रसेनने तो तेजस्वी मणी गळ्यात घालुन अश्वारुढ होऊन मृगयासाठी दूरच्या जंगलात निघुन गेला.त्या घनदाट एका सिंहाने अरण्यात त्याच्यावर व घोड्यावर हल्ला करुन ठार केले व तो मणी तोंडात धरुन पलायन केले.इतक्यात जांबवान नावाच्या प्रचंड अस्वलाने सिंहाच्या तोंडातल्या मण्याचा प्रकाश पाहुन त्याचा पाठलाग केला व सिंहाला ठार करुन तो मणी आपल्या पोराला खेळायला खेळणे म्हणुन दिले.इकडे बरेच दिवसांपासुन मृगयेला गेलेला भाऊ न आल्यामुळे श्रीकृष्णानेच त्याला ठार करुन स्यमंतक मणी हस्तगत केला अशी बदनाणी सर्वत्र पसरवली.


नाहक आपल्यावर आलेला चोरीचा आळ नाहीसा करण्याच्या उद्देशाने गावा तील प्रमुख लोकांना बरोबर घेऊन ज्या अरण्यात प्रसेन शिकारीला गेला होता तिथे गेल्यावर प्रसेन व घोडा सिंहाकडुन ठार झालेला असुन अस्वलाकडुन सिंहही ठार झाल्याचे आढळले.तिथे पडलेल्या वस्तू आणि अन्य खाणाखुणांवरुन माग घेत एका गुहेच्या तोंडापाशी पोहोचला. बाकीच्यांना बाहेर थांबवुन श्रीकृष्ण एकटाच गुहेत शिरला.तिथे एका कोपर्‍यात लख्ख प्रकाश दिसल्याने जवळ जाताच तो स्यमंतक मणी दिसला.तो उचलणारच तेवढ्यात जांबवान आला.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण संपूर्ण चरित्र

सर्व देवी देवतांचे व संतांचे चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *