सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

126-7
येऱ्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परी काय कीजे । न बोलणें बोलों ॥126॥
येऱ्हवी ज्ञानी ज्याला म्हणतात; तो केवळ माझा जीव की प्राण होय. हे सांगू नये, पण काय करावे? ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगोपात सांगितली.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥7.19॥

127-7
जे तो विषयांची मोट झाडी । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडीं । सद्वासनेचिया ॥127॥
जो विषयरूप दाट झाडीतून कामक्रोधादिक संकटे टाळून व सद्वासनेच्या पहाडावर चढून आला
128-7
मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृतीचा अव्हांटा । डावलूनि ॥128॥
नंतर, हे वीरश्रेष्ठा अर्जुना,साधूंच्या संगतीने, सत्कर्माच्या सरळ वाटेने; दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून,,
129-7
आणि जन्मशतांचां वाहतवणा । तेविंचि आस्थेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥129॥
आणि आस्थेच्या (फलाशेच्या) वाहणा पायांत न घालतां शेकडो जन्म भक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त तो फलाच्या हेतूंचा का हिशेब करील?
130-7
ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहती । पाहांट जाली ॥130॥
याप्रमाणे शरीसंबंधी अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहीत वाट चालत असतां सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते.


131-7
तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची ओतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥131॥
त्याच वेळेस गुरुकृपारूप उषःकाल होतो आणि मग ज्ञानरुप सुर्याची कोवळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते.
132-7
ते वेळी जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । तऱ्ही मीचि तया ॥132 ।
त्या वेळी तो जिकडे जिकडे पाहातो, तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. अथवा तो जरी स्वस्थ बसला, तरी त्याला मीच दिसतो.
133-7
हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥133 ।
फार काय सांगावे? त्याला सर्व ठिकाणी माझ्यावांचून दुसरे कांही दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यांत बुडालेल्या घटाच्या आंत व बाहेर पाणीच असते,
134-7
तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतु बाहेरी । हें सांगिजे बोलवरी । तैसें नव्हे ॥134 ॥
त्याप्रमाणे तो माझ्या आंत व मी त्याच्या अंतर्बाह्य आहे; हे बोलून दाखविण्यासारखे नाही.
135-7
म्हणोनि असो हें इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥135 ॥
म्हणून ते असो. याप्रमाणे त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते; आणि तो जिकडे जिकडे संचार करितो, तिकडे तिकडे त्याला आपणच विश्व आहो असे भासते.


136-7
हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणोनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥136 ॥
या सर्व विश्वांत वासुदेव भरला आहे असा त्याचा पुर्ण अनुभव असतो, म्हणून भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय.
137-7
जयाचिये प्रतीतीचा वाखौरां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥137 ॥
धनुर्धरा, ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व सांठविले आहे, असा हा महात्मा फार दुर्लभ आहे.
138-7
येर बहु जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टीं- । मंद जाले ॥138 ॥
ज्याच्याशिवाय, अर्जुना, पुष्कळ मला भजतात, पण त्यांची भक्ती फक्त विषयसुखाशेने असते; कारण आशातिमिराने त्यांची दृष्टी विषयांध झालेली असते.
कामैस्तैस्तैर्हृतज्ञाना:प्रपद्यन्तेऽन्यदेवता: ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता: स्वया ॥7.20 ॥

139-7
आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा झाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥139 ।
आणि फलाच्या इच्छेनें त्याच्या ह्रदयांत कामाचा रिघाव झाला की, त्याच्या संसर्गानें ज्ञानरुपी दिवा मालवतो.
140-7
ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणोनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरा ॥140॥
अशा रीतीने त्यांना अंतर्बाह्य अंधार होतो, म्हणून मी त्यांच्याजवळ असुनही ते मला अंतरतात, आणि मग सर्व भावानें इतर देवांना भजूं लागतात.


141-7
आधींच प्रकृतीचे पाईक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुप्यें कौतुक । कैसे भजती ॥141॥
अगोदर ते मायेच्या आधीन झालेले, आणि त्यांत फलप्राप्तीकरिंता दीन झालेले, मग काय? ते मोठ्या कौतुकाने लंपट होऊन देवांची कशी भक्ती करितात
142-7
कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥142 ॥
कोणत्या नियमाने व उपचारद्रव्याने, तसेच यधाविधि, त्याला काय वस्तु अर्पण केल्या पाहिजेत इकडे लक्ष देऊन, जे जे उपचार त्याला आवडत असतील ते ते करतात !
योयो यां यां तनुं भक्त:श्रद्धयार्चितुमिच्छति l
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥7.21 ।

143-7
पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥143॥
परंतु जो जो ज्या ज्या देवतेची फलाकरितां उपासना करितो, त्याची ती इच्छा मीच पुरवितो.
144-7
देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चय त्यासि नाहीं । भाव ते ते ठायीं । वेगळाला धरी ॥144॥
हे पहा की, देव-देवी मीच आहे; परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो, म्हणून त्या त्या देवतांचे ठिकाणी त्याचा निरनिराळा भाव असतो.
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान्मयैव विहितान्हि तान् ॥7.22॥

145-7
मग श्रद्धायुक्त । तेथिंचे आराधन जें उचित । तें सिद्धिवरी समस्त । वर्तों लागे ॥145 ॥
मग त्यांना ज्या ज्या देवतेची श्रद्धा असेल, त्या त्या देवतेचे, आपली कार्यसिद्धी होईपर्यंत, ते यथाविधि पूजन करितात.


146-7
ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे । परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥146॥
याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते त्याला प्राप्त होते, परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥7.23 ।

147-7
परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती । म्हणोनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥147 ॥
परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते आशापाशांतून मुक्त होत नाहीत, (त्यांतच घोटाळतात) आणि म्हणूनच,नाशवंत अशी इच्छित फले प्राप्त होतात.
148-7
किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन । येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥148॥
किंबहुना अशा प्रकारचे हे भजन म्हणजे संसाराचे साधनच होय. बाकी त्याचा फलभोग म्हणजे स्वप्नांतील क्षणिक सुखाप्रमाणेंच होय.
149-7
हें असो परौतें । मग हो कां आवडे तें । परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥149॥
हे एकीकडे राहूं द्या. त्यांचे आवडते दैवत का असेना? त्याने त्या देवतांचे पूजन केले म्हणजे तो देवत्वच पावतो.
150-7
येर तनुमनप्राणीं । जे निरंतर माझेयाचि वाहणीं । ते देहाचां निर्वाणीं । मीचि होती ॥150॥
बाकी तनमन अर्पण करुन जे माझ्याच भक्तीमार्गाला लागले ते देहांती माझ्याकडे येतात.
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥7.24॥

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading