बुधवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

budhwarche-abhang-warkari-bhajni-malika/

अनुक्रमणिका २१ अभंग

बुधवार चे अभंग प्रारंभ

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं
विठ्ठल नाम नुच्चारिसी
भ्रम धरिसी या देहाचा
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
भवसागर तरतां
काय नव्हे केले
एक गाउ आम्ही विठोबाचे
विठ्ठल हा चित्तीं
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
आनंद अद्वय नित्य निरामय

न कळे ते कळों येईल उगले
जैं (जरी) आकाश वर पडों
काही नेणोनिया आण । एकला
सार सार सार विठोबा नाम
अनंत तीर्थाचे माहेर॥ अनंत
नेणो ब्रम्ह मार्ग चुकले।उघडे
सखी पुसे सखीयेसी । युगे
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा।करी
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी ।
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें।ब्रह्मानंदें
दोन्ही हात ठेवुनि कटीं उभा

1.            विठ्ठलु नाहीं जये शरीरीं

विठ्ठलु नाहीं जये शरीरीं ।
वाया कांगा जन्मले संसारी ।
विठ्ठलु नाहीं जये नगरीं
तें अरण्य जाणावें ॥१॥
विठ्ठलु नाहीं जये देशीं ।
स्मशान भूमि ते परियेसी ।
रविशशिवीण दिशा जैसी ।
रसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥
विठ्ठला वेगळें जितुकें कर्म ।
विठ्ठला वेगळा जितुका धर्म ।
विठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म ।
तितुकाही श्रम जाणावा ॥३॥
सच्चिदानंदघन ।
पंढरिये परिपूर्ण ।
कर ठेवोनियां जघन ।
वाट पाहे भक्ताची ॥४॥
विठ्ठलेंविण देवो ह्मणती ।
ते संसार पुढती ।
विठ्ठलाविण तृप्ती ।
नाहीं प्रतीति विठ्ठलेंविण ॥५॥
श्रीगुरुनिवृत्तीनें दिधलें ।
तें प्रेम कोणे भाग्यें लाधलें ।
बापरखुमादेविवर विठ्ठलें ।
ऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥

2.            विठ्ठल नाम नुच्चारिसी

विठ्ठल नाम नुच्चारिसी ।
तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥
विठ्ठल नाम उच्चारी ।
आळसु न करी क्षणभरी ॥२॥
विठ्ठल नाम तीन अक्षरें ।
अमृतपान केलें शंकरें ॥३॥
रखुमादेविवरा विठ्ठलें ।
महापातकी उध्दरिले ॥४॥

3.            भ्रम धरिसी या देहाचा

भ्रम धरिसी या देहाचा । विठ्ठलम्हणे कारे वाचा ॥१॥
पडोन जाईल हें कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥
रखुमादेविवरु अभयकारु । मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥

4.            बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

5.            भवसागर तरतां । कां रे करीतसां

भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता ।
पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी ।
भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥धृ.॥
सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार ।
दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्ति-मुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता ।
तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥

अर्थ :- हे जनाहो, हां भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे । १ ॥ त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तिभावाने त्याच्या पाई मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल ॥ धृ ॥ त्याला फक्त तुम्ही भक्तिभावाने चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सिखाने करा, दोन वार (वारि) चुकवु नका. मग दया क्षमा चालात तुमच्या घरी येतील ॥२॥ तुकोबा म्हणतात, या पांडुरंगाची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही, मुक्तिची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही

6.            काय नव्हे केले । एका चिंतिता

काय नव्हे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥
सर्वसाधनांचे सार । भवसिंधु उतरी पार २॥ 
योग याग तपे । केली तयाने अनुपे ॥३॥
तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥ 

7.            एक गावे आम्ही विठोबाचे नाम

एक गावे आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥२॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीने ॥३॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥४॥

==============

तुकाराम महाराज म्हणतात फक्त एका त्या हरीचे नाम गावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा हेच काय ते आता आमचे काम आणि हेच काय ते आम्ही जाणतो, बाकी इतर कसलेही काम आम्ही जाणत नाही म्हणजेच इतर कोणत्याही कठीण अशा साधनांकडे आम्ही वळत नाही ना त्यांचे आमच्याकडे काही चालत. ते म्हणतात कर्माच्या, संसाराच्या तसेच योग साधनांच्या सूक्ष्म आणि दुस्तर अशा वाटा आम्ही सोडून दिल्या आहेत आणि नामाने जी वाट आम्हांला दिसत आहे त्या वाटेवरूनच आम्ही परमार्थाचा राज्यकारभार पुढे रेटू. तसेच हाथी टाळ, मृदंग घेऊन नामाचा जयघोष करत आम्ही हरिकिर्तनाचा ब्रह्मरस आवडीने सेवत राहू. तुकोबाराय म्हणतात अशा या नामाच्या गजराने, नामसंकीर्तनाने जे महापातकी आहेत, मोठमोठे जे पतित आहेत त्यांचे कल्याण होऊन त्वरित त्यांचे हित साधले गेले आहे.

8.            विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे

 विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गितीं ॥१॥
आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

9.            पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य जःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचां डोळां पाहों गेलें तंव । भीतरीं पालटु झाला ॥६॥

10.      आनंद अद्वय नित्य निरामय

आनंद अद्वय नित्य निरामय । जें कां निजध्येय योगियांचें ॥१॥
तें हें समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरीं विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । तें झालें साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यान । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ॥४॥

11.      न कळे ते कळों येईल उगले

न कळे ते कळों येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥
न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥
न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥३॥
न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥४॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणता वाचे ॥५॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावे । तरतील नावे विठोबाच्या ॥६॥

===============

अर्थ

तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच्या नामस्मरणाने या संसारातल्या ज्या अशा अनेक गोष्टी आकलना पलीकडल्या आहेत, ज्या सहज ग्राह्य न करता येण्याजोग्या आहेत त्या बुद्धीला सहज कळू लागतील. तसेच मायेच्या भ्रमामुळे जे डोळ्यांस दिसत नव्हते ते सहज बघता येऊ शकेल, जिव्हेला जे बोलण्यास जड जात होते किंवा अवघड वाटत होते ते सहज वाचेवर येईल. तसेच त्या विठोबाच्या चिंतनाने जो भेटण्यास कठीण आहे तो नारायण देखील सहज भेटी देईल. ते म्हणतात विठ्ठलाच्या निरंतर नामचिंतनाने अलभ्य असा लाभ देखील अपार पदरात पडेल. तुकोबाराय म्हणतात एवढेच काय जे जीव आजतागायत या संसारात आसक्तीने अडकलेले आहेत ते देखील या विठोबाच्या नामाने सहज तरून जातील.

12.      जैं (जरी) आकाश वर पडों पाहे

जैं (जरी) आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये ।
वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥
न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥
सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती ।
पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥२॥
भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी ।
जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥

13.      काही नेणोनिया आण । एकला

काही नेणोनिया आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥
पुढति पुढति मन । एकला विठ्ठलुचि जाण ॥२॥
हेचि गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥३॥
बुझसि तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥४॥
हेंचि भक्ति हेंचि ज्ञान । एकला विठ्ठलुचि जाण ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥६॥

14.      सार सार सार विठोबा नाम

सार सार सार विठोबा नाम तुझें सार ।
म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥१॥
आदि मध्य अंती निजबीज ओंकार ।
ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥२॥
भुक्तिमुक्तिसुखदायक साचार ।
पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥३॥
दिवसें दिवस व्यर्थ जात संसार ।
बापरखुमादेविवर विठ्ठलाचा आधार ॥४॥

15.      अनंत तीर्थाचे माहेर ॥ अनंत रुपांचे

अनंत तीर्थाचे माहेर ॥ अनंत रुपांचे हे सार ॥
अनंता अनंत अपार ॥ तो हा कटी कर ठेवूनि उभा ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग ॥ सकळ दोषा होय भंग ॥
पूर्वज उध्दरती सांग ॥ पंढरपूर देखिलिया ॥ धृ० ॥
निराभिवरा पडतां दृष्टी ॥ स्नान करितां शुध्द सृष्टि ॥
अंती तो वैकुंठ प्राप्ती ॥ ऐसें परमेष्ठि बोलिला ॥२॥
तेथे एक शीत दिधल्या अन्न ॥ कोटी कुळाचे होय उद्भरण ॥
कोटि याग केलें पूर्ण ॥ ऐसे महिमान ये तीर्थीचें ॥३॥
नामा ह्मणे धन्य जन्म ॥ जे धरिती पंढरीचा नेम ॥
तया अंती पुरुषोत्तम ॥ जीवें भावें न विसंबे ॥४॥

16.      नेणो ब्रम्ह मार्ग चुकले । उघडे

नेणो ब्रम्ह मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आला ।
भक्तें पुंडलिकें देखिले । उभे केला विटेवरी ॥१॥
तो हा विठोबा निधान । ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान ।
पाउलें समान । विटेवरी शोभती ॥२॥
रुप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु ।
महिमा वर्णितां महेशु । जेणें मस्तकीं वंदिला ॥३॥
भक्ति देखोनी लांचावला । जाऊं नेदी उभा केला ।
निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मीं न विसंबे ॥४॥

17.      सखी पुसे सखीयेसी । युगे

सखी पुसे सखीयेसी । युगे झाली अठ्ठावीसी ।
उभा ऐकिला संतांमुखी । अद्यापी वर ।
कटावरी कर । भीवरा तीर वाळुवंटी संत सभा सभा ॥१॥
देव कांहो विटेवरी उभा उभा ॥ धृ ॥
पुसू नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाहीं ।
शेष शिणला जाहल्या द्विसहस्र जिभा जिभा ॥२॥
जेथें करिताती गोपाळ काला । हरिनामीं तयांचा गलबला ।
देव भावाचा भुकेला । मिळालें संत ।
मदनारी । तो हरि आला । तयांचिया लोभा लोभा ॥३॥
हरि वैकुंठांहूनि । आला पुंडलिकालागुनी ।
उभा राहिला अझुनी । युगानुयुगें ।
भक्तासंगें । एका जनार्दनीं संत शोभा ॥४॥

18.      विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी

विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ ध्रु ॥
विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥२॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य ॥३॥

19.      विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ ध्रु ॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥

20.      विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें

विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥
वाजे टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ ध्रु  ॥
विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईका ॥३॥

21.      दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा

दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं ।
कष्टलासीसाठी । भक्तीकाजे विठ्ठला ॥१॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा ।
आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु॥
होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं ।
ह्मणोनियां घरीं । गौळीयांचे अवतार ॥२॥
केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा ।
तुका ह्मणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥

बुधवार चे अभंग समाप्त

सात वाराचे अभंग पहा

संपूर्ण भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *