201-15
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥201॥
आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाचेही असेच आहे. तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते.
202-15
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥202॥
त्याप्रमाने अर्जुना येथून या संसारवृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणार्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात.
203-15
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥203॥
म्हणून ब्रह्मदेव आणि देवांचे देव महादेव यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे.
204-15
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें । ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥204॥
परंतु हे असू दे. ब्रम्हादिक कितीही मोठे झाले.तरी उर्ध्वमुळ जे माया विशिष्ट ब्रम्ह म्हणजे ईश्वर,हे याच्या बरोबरीच्या तुलनेला येऊ शकत नाही.प्रलयाच्यावेळी ब्रम्हादिक संपुन जातील पण, ईश्वर कधीही नष्ट पावत नाही.
205-15
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥205॥
सनकादिक नावांनी वरच्या (निवृत्ति मार्गाच्या) सनकादिरुपी प्रसिद्ध शाखा आहेत, त्या या संसारवृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी एकरुप झालेल्या असतात.
206-15
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥206॥
याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक, ही जी (संसारवृक्षाची) शेवटची पालवी तेथपर्यंत, या संसारवृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज.
207-15
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥207॥
अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच (मनुष्यपणा) मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे
म्हटल आहे.
208-15
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु॥15-208॥
याप्रमाने वर खाली फांद्या असलेला व वर मुळ असलेला हा अलौकिक भववृक्ष सांगितला आहे.
209-15
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें ।
आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥ 209 ॥
ह्या प्रमाणे या वृक्षाच्या अधोर्ध्व मुळांचे आम्ही तुला सविस्तर कथन केले, आता ह्याचे उन्मूलन (उच्छेद) कसे होवू शकेल ते ऐक.
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेण छित्त्वा ॥15.3॥
क्ष्लोकार्थ परंतु (वर जसे वर्णन केले) त्याप्रमाणॆ इहलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आदिही नाही व स्थितीही नाही, अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थवृक्षाला बळकट अशा असंगरूपी वैराग्यजन्यज्ञानरूपी शस्त्राने छेदून संसारवृक्षाचा नाश होण्याचा उपाय
(संसारवृक्षाची विशालता)
210-15
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे? ॥210॥
परंतु अर्जुना, तुझ्या मनाला कदाचित असे वाटेल की या एवढ्या मोठ्या विशाल विस्तार पावलेल्या संसाररुपी झाड उपडले जाईल असे एवढे साधन काही आहे काय?
211-15
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥211॥
कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ (कोठे) वर निराकार ब्रह्मामधे आहे.
212-15
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं । माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥212॥
हा संसारवृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादि स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसर्या मनुष्यरूपी मुळांनी मधे विस्तारतो.
213-15
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥213॥
असा हा संसारवृक्ष बळकट व अमर्याद आहे, तर आता याचा शेवट (उपटून टाकणे) कोण करील? असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील तर आणू नकोस.
214-15
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे? ॥214॥
(संसारवृक्ष खरा नाहीच)
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय?
215-15
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं? ॥215॥
ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहेत काय? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का?
216-15
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी? ॥216॥
त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही (केवळ मिथ्याभास आहे) तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली?
217-15
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥217॥
आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला तो प्रकार जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असेच सांगण्याच्या प्रकारापैकीच होय).
218-15
कय कीजती चेइलेपणीं स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण ते काहाणी । दुगळींचि ते ॥218॥
जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची? त्याप्रमाणे ह्या संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज.
219-15
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥219॥
याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसारवृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच (स्वरूपे करून) खरा असता.
220-15
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥220॥
तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय?
221-15
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥221॥
म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. (कसे तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे.
222-15
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई? ॥222॥
बा अर्जुना मृगजळाची तळी आहेत ती दृष्टीने दुरूनच पहा, याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय?
223-15
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणौनि संसाररुख सतुकें । वावोचि गा ॥223॥
बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे? (काय किंमतीचे असणार?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार? तर तो मिथ्याच आहे.
224-15
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । येकें परी ॥224॥
आणि या संसारवृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज.
225-15
तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे? । कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें? ॥225॥
संसारवृक्ष कोठपर्यंत खरा वाटतो? तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही.
Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण