सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

576-11
नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥576॥
किंवा अत्यंत जिवलग सोयर्‍यांची भेट झाली असतां, मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग, त्याला सांगतांना मनांत कांही संकोच वाटत नाही.
577-11
कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें । तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥577
किंवा जिने आपलें एकंदर शरीर व प्राण, ज्याला मनोभावाने समर्पण केलें, त्या पतीची भेट झाल्यानंतर, आपल्या मनांतील गोष्ट सांगितल्यावाचून, ज्याप्रमाणे तिला राहवत नाही.
578-11
तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥578॥
त्याप्रमाणे देवा!मी तुमच्या सलगीने प्रार्थना केली आहे.तसेंच प्रार्थना करण्याचें दुसरे आणखी एक कारण आहे.
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ।।11.45 ।।

अर्थ पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भायाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर.॥11-45॥
579-11
तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥579॥
देवा!मी तुझ्याशीं सलगी करून तुझे विश्वरूप पहाण्याचा हट्ट धरला आणि प्रेमळभक्ताच्या मायबापाने तुवां, तो हट्ट पुरविला.
580-11
सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें । देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥580॥
ज्याप्रमाणे कौतुकाने अंगणांत कल्पतरूचीं झाडें लावावीत किंवा कामधेनुचें वासरू खेळावयाला आणून द्यावे.


581-11
मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥581॥
नक्षत्ररूप फाश्यांनी डाव टाकावा व चेंडू खेळण्याकरितां चंद्र द्यावा इत्यादि हट्टासारखाच असलेला माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट, आई तूं पूर्णपणे सिध्दिस नेला.
582-11
जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥582॥
ज्या अमृताचा एक थेंब मिळविण्याकरितां देखील अत्यंत प्रयास पडतात, त्याचा चार महिने सारखा पाऊस पडावा किंवा संपूर्ण पृथ्वीची मशागत करून वाफ्यावाफ्यामध्ये चिंतामणी पेरावेत.
583-11
ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥583॥
त्याप्रमाणे भगवंता ! मला अत्यंत कृतार्थ केलें. माझा तुम्ही पुष्कळ लाड पुरविला आणि जें विश्वरूप दाखविलें, तें शंकर, ब्रह्मदेव यांनी कानांनी देखीले ऐकिले नाही.
584-11
मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥584॥
मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्या विश्वरूपाची वेदालाहि भेट घेपां आली नाही, ती ह्रदयांतील विश्वरूपाची गांठ, आपण माझ्याकरितां सोडली.
585-11
जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुलीं हौनी । गेलीं जन्में ॥585॥
देवा!कल्पांच्या आरंभापासून या क्षणापर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले,


586-11
तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥
या प्रत्येक जन्मांतील घराघरांचा शोध करून पाहतांहि हे विश्वरूप मी पाहिलें किंवा ऐकिलें असे म्हणणारा कोणी सांपडत नाही.
587-11
बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥587॥
तेथे डोळ्यांनी कोणी पाहिलें असेल ही गोष्टच कशी करायची ! किंबहूना हे विश्वरूप करतां येत नाही.
588-11
तेथा डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥588॥
तेथे डोळ्यंनी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची!किंबहूना हे विश्वरूप पूर्वी कोणी पाहिले किंवा ऐकलेहि नाही.
589-11
तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ॥589॥
ते हे विश्वरूप आपण माझ्या डोळ्याला दाखविले. त्यामुळे मला अत्यंत आनंद झाला.
590-11
परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥590॥
पण अंतःकरणांत आता अशी इच्छा आहे की, तुझ्याशी चार गोष्टी कराव्या व तुला अलिंगन देण्याकरितां तुझें सांन्निध्य प्राप्त व्हावे.


591-11
ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे । आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं ॥591॥
ह्या सर्व गोष्टी, या विश्वरूपाशी करू म्हटल्यास, तुझ्या या विश्वरूपाला संख्याच नसल्यामुळे कोणत्या एका मुखाशी बोलावे व कोणत्या रूपाला आलिंगन द्यावे?
592-11
म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ?॥592॥
म्हणून वार्‍याबरोबर धावणे किंवा आकाशाला आलिंगन देणे शक्य नाही. समुद्रात जलक्रीडा कशी करायची?
593-11
यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥593॥
याकरिता हे देवा ! माझ्या मनात या विश्वरूपाचे भय वाटते; म्हणून माझा हट्ट पुरवा, आता हे विश्वदर्शन पुरे.
594-11
पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥594॥
ज्याप्रमाणे कौतुकाने सर्व पृथ्वीचा प्रवास केल्यावर प्रवासाची दगदग नाहीशी करण्याकरिता परत घरी येऊन, सुखाने विश्रांती घ्यावी, त्याप्रमाणे तुझे हे चतुर्भुजरूप आमचा सर्व शीण नाहीसा करणारे आमचे विश्रांतीस्थान आहे.
565-11
आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥595॥
आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी याच चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा. सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयानेच पूर्ण सुखाची प्राप्ती होते, हाच सर्व शास्त्रांचा सिध्दान्त आहे.


596-11
आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥596॥
आम्ही नानाप्रकारच्या, सर्व प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान करावे, पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी, हेच असावे. या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरिता सर्व तीर्थाटन असावे.
597-11
आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥597॥
आणिकही काही जी जी दानादिक पुण्ये आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी.
598-11
ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं ॥598॥
अशी तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवड असल्यामुळे, हे तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर.
599-11
अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥599॥
हे सर्व अंतःकरणांतील जाणणार्‍या, सर्व जगाला आधार असणार्‍या व सर्व देवांना पूज्य असणार्‍या देवाच्या देवा ! माझ्यावर प्रसन्न हो.
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते । 11.46 ।

अर्थ किरीट धारण करणारा, गदा धारण करणारा, हातामधे चक्र असणारा अशाच तुला पहाण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर.॥11-45॥
600-11
कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥600॥
भगवंताच्या अंगाच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पाहा ! भगवंताच्या अंगाचे तेज इंद्रनील मण्याचे ठिकाणी कशी झांक दाखवीत आहे, पहा.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading