ॐकारगीता

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ॐकारगीता

ब्रह्मतत्त्व हे इंद्रियातीत असते, अखंड एकरसात्मक असते. गुरुने शिष्याला ‘तत् त्वं असि ’, असे सांगितले , आणि गुरुकृपेने शिष्याच्या ‘अहं’ ला त्याचा बोध झाला तरी, त्या ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान ‘अहं, त्वं, तद्‍’ अशा सर्वनामांनी होते. म्हणजे सर्वनामाइतकेच अल्पांशाने होते ! सर्वनामे ज्या नामांची दर्शक असतात ते ‘नाम’ अक्षरबध्द होऊच शकत नाही ! अगदी ‘ब्रह्मवाक्य’ सांगायचे असले तरी, ते संस्कृत सर्वनामांनीच सजविलेले असते !


ऋभू व निदाघ संवादातून ब्रह्मातत्त्वासंबंधी आस्तिक्यभाव ठेवून आपणास ब्रह्म जाणून घेता येईल, पण ते शब्दाने सांगता येणार नाही.  ब्रह्म सगुणही आहे, निर्गुणही आहे आणि त्या दोहीच्या पलीकडे गुणातीत असेही आहे ! ब्रह्मतत्त्व हे वाच्यार्थाने समजून घेता येत नाही. ‘इदं’ किंवा ‘अहं ’ या स्वरुपात ते जाणता येत नाही. ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी आपल्या पहिल्याच ओवीत सांगितल्याप्रमाणे ‘स्वसंवेद्य’ मात्र आहे ! ते नित्य, शुध्द, बुध्द आणि मुक्त आहे. ते चिद्‍घन आहे, प्रकाशमय आहे, आनंदस्वरुप आहे, परिपूर्ण सत्‍ -स्वरुप आहे. ते तर्क , न्याय, भाव अशा लौकिक परिमाणांनी सिध्द करता येत नसेल तरी, ते ‘असतचि असे !’ देहाची व मनाची पातळी सोडून ते ‘परमार्थाने’ किंवा आत्मभावाने जाणून, आत्मरुप होऊन ‘मुक्त’ व्हावे ! असा ऋभुगीतेतील ‘अमृत-योग’ हीच या खंडाची विशेषता आहे.


शिवरहस्य पुराणात ऋभु-निदाघ यांचा हा ब्रह्मसंवाद आलेला आहे. हा पुराण ग्रंथ मुख्यत:शिवस्तुतीपर आहे. शिव हे आदितत्त्व आहे. तेच परब्रह्म आहे. उत्पत्ति – स्थिती आणि लय, या विविध अवस्था जेथे सागरातील लाटाप्रमाणे निर्माण होताना दिसतात आणि तेथेच विलीन होतात, ते स्थल आपण कल्पना करुनही जाणू शकत नाही. ते जाणण्यासाठी दृष्टान्ताचा उपयोग केला तर, बुध्दी उपमान म्हणून दुसर्‍याचा आधार घ्यावा लागतो. वस्तुत: परब्रह्म वर्णनातील अनादी अनन्त आणि केवलस्वरुप आहे, हे अव्दैत जाणून घेतले, तर जाणणारा वेगळा उरतच नाही !


ब्रह्म तत्त्व हे सत् , चित् , आनंद ’ या तीन शब्दांनी व्यक्त होत असले तरी, सत्तामात्र असे शिवत्व शाश्वत रुपातच असते. त्याची त्याच्या स्पंदनाने होणारी क्रियात्मकता म्हणजे चित्‍ होय व त्यामुळे होणारा परिणाम म्हणजे आनंद असे मानता येईल. म्हणजे शिवतत्त्व हे केवळ सत् स्वरुपीच असते. ते तुरीय अवस्थेच्या पलीकडे असलेल्या उन्मनी स्थितीतच जाणता येते. विशेष असे की, ते जाणले आहे असा बोध स्वत: बोधरुप झालेला असल्याने, तेथे वाणी, मन , बुध्दीचे परिघ उरलेलेच नसतात !


या शाश्वत शिव तत्त्वात व्दैतभाव नाहीच. रुप-अरुप,सगुण-निर्गुण, साकार- निराकार यांचे अव्दैत हेच ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान होय. तीच अव्दैत सिध्दी होय !
हे ब्रह्मज्ञान गुरुशिष्य संवादातून प्रगट होते. ज्ञानरुप सद्‍गुरु आणि वृत्तिरुप शिष्य या अव्दय स्वरुपात हा ब्रह्मविषयक संवाद एकत्वात अवतरतो. बोधरुपाने उरतो.
याच खंडात आलेल्या ‘ऊँ कार ’ गीतेनेही ते ब्रह्मतत्त्व ‘ऊँ ’ च्या साडेतीन मात्रांतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते तत्त्व त्यातही सामावत नाही. ते सदा- शिव -मंगल, आनंदस्वरुप व कल्याणस्वरुप असे असते. ते जाणल्याने ‘जाणणार्‍याला’ कैवल्यपद प्राप्त होते ! असे हे ‘शिव विज्ञान’ आहे. त्या सदा -शिवाने आमच्या अंगीकार करावा. कारण याच्या श्रवणमनाने ‘ब्रह्मैव भवति स्वयम् ’ असे सद्‍गुरु ऋभूंचे ‘वरद वचन’, या गीतेतून आपणास प्राप्त होते. त्या परावाणीला आम्ही शतश: नमन करतो.

  • एक ब्रह्मजिज्ञासू

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *