श्रीगणेश भाग ८ श्रीगणेशाची उत्पत्ती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीगणेश भाग ८ श्रीगणेशाची उत्पत्ती

गणपती हा भारतातील एक प्राचीन देव आहे. त्याचे स्पष्ट उल्लेख अतिप्राचीन वाङमयात सापडत नसले किंवा पाचव्या शतकापूर्वीच्या त्याच्या मूर्ती सापडत नसल्या तरी त्याच्या प्राचीनत्वाची शंका घेण्याचे काही कारण नाही.
सुरवातीला गणपतीची गणना शंकराच्या गणात होऊ लागली. पुढे लवकरच तो शिवगणांचा पती झाला. शिवगणांचे प्रमुख पद गणपतीला मिळाल्यावर त्याच्या भक्तांनी त्याला शिव पार्वतीचा पुत्र आणि कार्तिकेयाचा भाऊ ठरविले. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र कसा झाला व त्याला गजमस्तक कसे जडले, या संबंधात पुराणकारांची एकवाक्‍यता नाही. त्यांनी त्याविषयी ज्या कथा दिल्या आहेत, त्या अशा-
१. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र असला तरी तो अयोनिज आहे. गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शिवाने आपल्या तप:सामर्ध्याने एक तेजस्वी बालक निर्माण केला. पार्वतीने त्याला पाहिले. अशा सुंदर पुत्राला आपल्या साहचर्यावाचून एकट्या शिवानेच जन्म द्यावा, या गोष्टीचा तिला मत्सर वाटला. मग तिने त्या बालकाला शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.


२. एकदा पार्वती स्नानगृहात स्नान करीत होती. त्या प्रसंगी आपल्या अंगाचा मळ काढून तिने एक मुलगा बनविला व त्याला स्नानगृहाच्या दारावर द्वाररक्षक म्हणून उभे केले. थोड्याचा वेळात शंकर तिथे आले व ते स्नानगृहात जाऊ लागले. द्वाररक्षकानेच त्याला अडवले. तेव्हा शिवाला त्याचा राग आला आणि त्याने त्याचे मस्तक उडविले. ही दुर्घटना पाहून पार्वतीला दु:ख झाले. मग तिच्या सांत्वनाकरिता शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून त्या शिरहीन देहाला जोडले. तोच गणपती होय.
३. एकदा पार्वतीने शनीला गणपतीकडे पाहण्यास सांगितले. त्यानुसार शनीने त्याच्यावर दृष्टी टाकली. त्यामुळे गणपतीचे मस्तक गळून पडले. तेव्हा पार्वती शोकाकुल होऊन ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने तिला सांगितले की तुला पहील्या प्रथम ज्या प्राण्याचे मस्तक आढलेल, ते तू गणपतीच्या देहाला लाव, म्हणजे तो सजीव होईल. त्यानुसार पार्वती मस्तक शोधू लागली तेव्हा पथम तिला गजाचे मस्तक मिळाले. ते आणून तिने गणपतीच्या देहाला लावले.
४. एकदा शिव पार्वती हिमालयात विहार करीत होते. तिथे एक हत्तीचे जोडपे रतिक्रिडा करताना त्यांना दिसले. मग शिव-पार्वतींनीही गजरूप घेऊन रतिक्रिडा केली आणि त्या क्रीडेतून त्यांना गणपती हा गजमुख पुत्र प्राप्त झाला.


५. शिव हा फार प्राचीन काळी भूतान देशाचा एक प्रबळ राजा होता. भूत जमातीच्या लोकांचे वसतिस्थान ते भूतान होय. आजही भूतानमध्ये भूत जमात अस्तित्त्वात आहे. कैलास ही शिवाची राजधानी होती. या भूतानात सणावाराच्या दिवशी लोक निरनिराळे मुखवटे घालून मिरवतात. हे मुखवटे पशुपक्षी व अक्राळ-विक्राळ प्राणी यांचे असतात. यात हत्तीचा मुखवटा घालुन मिरवणारे लोकही होते. त्यांच्या या पद्धतीतूनच पुढे त्यांच्या गणपतीला गजमुख प्राप्त झाले.
६. या कल्पनेशी मिळतीजुळती अशी दुसरी कल्पना सांगितली जाते. शिव आणि पार्वती ही दोघे गजकचर्म परिधान करीत असत. रुद्र आणि त्याचे विनायकादी गण त्या अरण्यात वास करीत ते स्थान हत्तींविषयी प्रसिद्ध आहे. म्हणूनच गणपती किंवा विनायक याला गजानन हे अभिधान प्राप्त झाले.
गणपती ही संर्पूणत: वैदिक देवता आहे. त्यासाठी ते अथर्ववेदातील गणपत्यथर्वर्शीर्ष नावाच्या एका उपनिषदाचा दाखला देतात. या उपनिषदात गणपतीचे समग्र स्वरुप वर्णन केलेले आहे. त्यानुसार गणपती ही वैदिक देवता ठरते. काही सनातनी पंडितांच्या मतानुसार ऋग्वेदातले ब्रह्मणस्पतिसूक्त हेही गणपतीचेच सूक्त आहे. गणपतीच्या हातात जसा सुवर्णपरशू आहे, तसाच तो ब्रह्मणस्पतिच्याही हातात आहे. कार्यारंभी जसे आपण गणपतीचे आवाहन करतो, तसेच आवाहन ब्रह्मणस्पतिचेही केलेले आहे आणि त्याचाच मंत्र परंपरेने गणपतीच्या पूजेत स्वीकृत झाला आहे. तो मंत्र असा –
गणांनां त्वा गणपतिं हवामहे
कविठ कवीनामुपमश्रवस्तमम्‌।
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ न: शृण्वन्नूतिभि: सीद सादनम्‌।।

तात्पर्य हे, की इतिहासाच्या ओघात अनेक जमातींच्या देवदेवतांचे एकीकरण होत होत अथर्वशीर्षोक्त गणपती सिद्ध झाला.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *