सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

551-15
पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती । रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं ॥ 551 ॥
किंवा, ज्याप्रमाणे, शुक्ति स्वतः रूपे न होतां नेणत्याला रुप्याचा भास होण्यास कारण होते 51
552-15
कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे । विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ॥ 552 ॥
नित्य प्रकट असणारें सोने अलंकाररूपानें स्थित असले म्हणजे नेणत्यांना लपाल्यासारखे होऊन त्यांना फक्त अलंकारच दिसतात; याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हांही विश्व न होतां नेणत्यांच्या दृष्टीला दिसणाऱ्या विश्वाचा आधार आहे. 52
553-15
हें असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा । तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो ॥ 553 ॥
हें असो. जल व त्यावरील लाटा ह्यात जशी भिन्नता नसते (पाण्याच्या अस्तित्वावरच लाटांचे अस्तित्व असते) त्याप्रमाणे, उत्तम पुरुषाच्या अस्तितेवरच नांदनारे जगत् (अन्वयदृष्टीने) त्याहून वेगळे नाही 53
554-15
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा । हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा ॥ 554 ॥
केवळ चंद्राच्या संकोच विकासावरच जसा त्याच्या प्रतिबिंबाचा संकोच विकास अवलंबून आहे, त्याप्रमाणे आत्म्याचे प्रगट होणें अगर स्वरूपावस्थान असणे ह्यावर विश्वाचा प्रकटपणा अगर लोप अवलंबून आहे. 54
555-15
तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं कहीं न जाये । जैसा रात्रीं दिवसें नोहे । द्विधा रवि ॥ 555 ॥
तसाच विश्वस्थितींत तो कांहीं होतही नाहीं अगर विश्वाच्या लोपाने तो कोठे जातही नाही. (आहे तसाच असतो ) ह्याला उदाहरण, रात्र आणि दिवस हे सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करू शकत नाहीत. 55

556-15
तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे । जयाचें सांगडें । जयासीचि ॥ 556 ॥
याप्रमाणे तो कशांतही नसतो, कशानेहि न्यूनता पावत नाही; म्हणून तो कसा आहे हे सांगणे झाल्यास त्याच्यासारखाच तो आहे असे म्हणावें लागते. 56
यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ 15.18॥

557-15
जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया । काय बहु बोलों जया । नाहीं दुजें ॥ 557 ॥
अन्यप्रकाशनिरपेक्ष जो आपला आपणच प्रकाश करितो (स्वप्रकाशरूप आहे) तो, अर्जुना, काय सांगावें? केवल एकरूप आहे. त्यावांचुन दुसरें कांहीं नाहींच. 57
558-15
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु । म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु ॥ 558 ॥
असा क्षराक्षराहून उत्तम किंवा श्रेष्ठ जो मी, हे माझे निरुपाधिक स्वरूप होय; म्हणूनच वेदांनी व लोकांनी ह्यांचे पुरुषोत्तम असे वर्णन केले आहे. 58
यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् ।
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ 15.19॥

559-15
परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया । जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें ॥ 559 ॥
परंतु हें असो, अर्जुना, असा जो भी पुरुषोत्तम त्याला तोच एक पाहू शकतो की, ज्याच्या अंतःकरणांत यथार्थ ज्ञानसूर्याचा उदय झाला आहे. 59
560-15
चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न । तैसें स्फुरतें त्रिभुवन । वावों जालें ॥ 560 ॥
जागे झाल्यावर स्वप्नव्यवहार जसा नाहीसा होतो, तसेच “चेइलिया आपुलें ज्ञान” म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर दिसणारे विश्व स्वप्नवत् वाव होते. 560


561-15
कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा । तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो ॥ 561 ॥
जिच्यावर सर्पभ्रम झाला होता ती माळच हाती घेतल्यावर (अपरोक्ष झाल्यावर) जसा सर्पभ्रम व भीति नाहीशी होते, तसें ज्याला माझे ज्ञान झाले आहे तो ह्या टवाळ म्हणजे मिथ्या जगदाभासाने फसत नाही. (दृढमिथ्यात्वनिश्चयामुळे) 61
562-15
लेणें सोनेंचि जो जाणें । तो लेणेंपण तें वावो म्हणे । तेवीं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु ॥ 562 ॥
अलंकाराला ज्याने सुवर्णत्वाने जाणलें तो जसा अलंकार म्हणून कांहीं स्वतंत्र वस्तु मानीत नाही त्याप्रमाणे ज्याला माझे ज्ञान झाले त्याची, अलंकाराच्या दृष्टांताप्रमाणे, भेदबुद्धि पार नाहींशी अगर बाधित होते. 62
563-15
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु । जो आपणेनसीं भेदु । नेणोनियां जाणे ॥ 563 ॥
मग, असा भेदबुद्धि बाधित झालेला पुरुष, स्वतःसिद्ध सच्चिदानंदस्वरूप असा मीच सर्वत्र आहे असे म्हणतो; व आपल्या स्वतःलाही दुजेपणाने न पहातां मला जाणतो. 63
564-15
तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें । जे तया सर्व उरलें । द्वैत नाहीं ॥ 564 ॥
आतां त्याला त्या पुरुषालाच सर्व ज्ञान झालें हेंही म्हणणे अपुरें म्हणजे वस्तुस्थितिदर्शक नाही; कारण, त्याला सर्व म्हणून कांहीं द्वैत उरलेच नाहीं. 64
565-15
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना । गगन जैसें आलिंगना । गगनाचिया ॥ 565 ॥
म्हणून, अर्जुना, माझे भजन करावयास तोच (मद्रूप झालेला) एक योग्य होय; अरे! गगनाला आलिंगन देण्याची योग्यता एका गगनाचीच आहे, अन्याची नव्हे. 65

566-15
क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरसागरचिपणें । अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं ॥ 566 ॥
क्षीरसागराचा पाहुणचार क्षीरसागरानेच करणे अथवा अमृतत्वानेच अमृतास मिळणे जसे योग्य 66
567-15
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें । तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी ॥ 567 ॥
उत्तम सुवर्णात तद्रूप होण्यास जसे उत्तम सुवर्णच पाहिजे, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला यालाच माझी भक्ति करणे शक्य व योग्य आहे. 67
568-15
हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती? । म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे? ॥ 568 ॥
गंगा सिंधूहून जर भिन्न असती तर ती सिंधुरूप कशी झाली असती? म्हणून “मी न होतां “ म्हणजे माझी सर्वव्यापकता न बाणतां परिच्छिन्न बुद्धी केलेली भक्ति खरी किंवा सार्थ होईल काय? 68
569-15
ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं । तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो ॥ 569 ॥
ह्यासाठी, समुद्राच्याच्या लाटा जशा समुद्राशीं सर्वथैव अनन्य (अभिन्न) आहेत, त्याप्रमाणे माझे भजन करणारा अनन्य असा, अगर अनन्य असेल त्यानेच खरे भजन केलें असें जाण. 69
570-15
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणें लोभें । तो पाडु मानूं लाभे । भजना तया ॥ 570 ॥
सूर्य आणि प्रभा यांचे जसें नित्य ऐक्य आहे तशी वरील अनन्यभजनाची योग्यता आहे. 570
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ ॥
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात् कृतकृत्यश्च भारत ॥15. 20॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥15॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तमयोग नावाचा हा पंधरावा अध्याय समाप्त झाला. ॥15॥

571-15
एवं कथिलयादारभ्य । हें जें सर्व शास्त्रैकलभ्य । उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं ॥ 571 ॥
ह्याप्रमाणे अध्यायाला आरंभ केल्यापासून येथवर जे सर्व सांगितलें तें केवळ शास्त्रांपासूनच प्राप्त होत असते; आणि कमलांना सुगंध ही जशी शोभा, तसें हे गीताशास्त्र हे उपनिषद्रूप कमलांचा सुगंध होय. 71
572-15
हें शब्दब्रह्माचें मथितें । श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें । मथुनि काढिलें आयितें । सार आम्हीं ॥ 572 ॥
शब्दब्रह्मरूप जो वेदार्णव त्यापासून व्यासबुद्धिरूप रवीनें मंथन करून आम्हीं हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे.72
573-15
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी । विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे ॥ 573 ॥
ही गीता ज्ञानामृताची गंगा, आनंदरूप चंद्राची सतरावी कला, अथवा विचाररूप क्षीरसागरांतून अवतरलेला नवीन लक्ष्मीचाच अवतार होय.73
574-15
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें । मीवांचोनि हों नेणें । आन कांहीं ॥ 574 ॥
म्हणून ही, आपल्या प्रत्येक शब्दानें, वर्णनाने, आणि अर्थरूपी जिव्हाळयानें मजवांचून दुसरी कोणतीही गोष्ट जाणत नाही. 74
575-15
क्षराक्षरत्वें समोर जालें । तयांचें पुरुषत्व वाळिलें । मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं ॥ 575 ॥
तिच्यासमोर क्षर व अक्षर असे दोन पुरुष आले असतां (दर्शनानेच) त्यांचे पुरुषत्व तिने नाकारले, व मग, आपलें सर्वस्व मज पुरुषोत्तमास अर्पिले. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *