सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

151-10
अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं । तो तूं हें आम्ही । जाणितलें आतां ॥151॥
प्रभो श्रीकृष्णा ! तू अनादि व स्वतःसिध्द ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तूं जन्मादिधर्मांत सांपडत नाहीस— म्हणजे तुला जन्मादिक नाहीत असा तूं आहेस, हें आज मी जाणलें.
152-10
तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री । तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें ॥152॥
तूं कालरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तूं या जीवरूपी चैतन्यांशाला अधिष्ठान आहेस. तूंच या सर्व ब्रम्हांडाला धारण करणारा आहेस हें मला स्पष्ट कळून आलें.
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे॥10.13॥

153-10
पैं आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी । जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें ॥153॥
तुझ्या वाक्याने जो अनुभव आला त्याची आणखीहि एका दृष्टीने थोरवी माझ्या अनुभवास आली कारण मागें मोठमोठ्या ऋषींनी असेंच तुझ्याविषयी सांगितले होतें.
154-10
परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥154॥
पण त्या सांगितलेल्याची सत्यता, आज माझ्या अंतःकरणाला पटली, याचें कारण देवा ! आपण माझ्यावर कृपा केली हे होय.
155-10
एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनीं गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों ॥155॥
नाही तरी नारदमुनि नेहमी आमचेकडे येत असत. तेहि अशारीतीने तुझे वर्णन करीत असत, पण त्यावेळी त्यांच्या वचनांचा अर्थ न समजतां तुझ्या गायनाचें सुखच आम्हांला प्राप्त होत असे.

156-10
जी आंधळेयांचां गांवीं । आपणपें प्रगटलें रवी । तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा? ॥156॥
अहो जी भगवंता ! आंधळ्यंच्या गावांत जर सूर्य आपण होऊन प्रकाशित झाला तर त्या आंधळ्यांना सूर्याची कोंवळी ऊनच घेतां येईल. त्याशिवाय प्रकाश मिळणें कसें शक्य आहे?
157-10
येरवीं देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं ॥157॥
त्याप्रमाणेच देवर्षि नारदमुनि देखील तुझ्या आध्यात्मस्वरूपाचेंच वर्णन करीत असत, पण त्या वर्णनाला रागरागिणीमुळे जी वरवर गोडी येत होती, तिचाच आमच्या चित्ताला लाभ होत होता, दुसरा कोणताहि लाभ होत नव्हता.
158-10
पैं असिता देवलाचेनिहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें । परी तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती ॥158॥
तसेंच असित, देवल, या ऋषीच्या मुखाने असेच तुझे वर्णन आम्ही ऐकत असूं, पण त्यावेळीं आमचें अंतःकरण विषयरूपी विषानें व्यापिलें होतें.
159-10
विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥159॥
विषयरूपी विषाचा एवढा प्रताप आहे की जीवाला, परमार्थ गोड असून कडू वाटतो व विषय कडू असूनहि गोड वाटतात.
160-10
आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे ॥160॥
भगवंता! दुसर्‍याचें कशाला सांगूं ! पुष्कळदां स्वतः भगवान व्यासांनी आमच्या राजवाड्यांत येऊन तुझ्या स्वरूपाचें सदा संपूर्ण वर्णन करीत असावें.

161-10
परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणौनि ॥161॥
पण ज्याप्रमाणे आंधारांत चिंतामणि पडला असतां तो चिंतामणि नव्हे या बुध्दीने उपेक्षा होते. नंतर उजाडल्यावर, तो चिंतामणिच होय ओळखला जातो.
162-10
तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्‍नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥162॥
त्याप्रमाणे व्यासादिकांची बोलणीं म्हणजे मला प्राप्त झालेल्या चैतन्यरूपी रत्नांच्या खाणीच होत्या, पण हे श्रीकृष्णा ! तुझ्या सूर्यप्रकिशाच्या अभावीं त्यांची उपेक्षाच होत होती.
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः॥10.14॥

163-10
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले । तयां आघवियांचेंचि फिटलें । अनोळखपण ॥163॥
तेच आतां तुझे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या अंतःकरणांत फांकल्यामुळे पूर्वी ऋषींनी जे मार्ग सांगून ठेविले आहेत त्या सर्वांची आज ओळख पटली — म्हणजे त्यांनी जे तुझ्या स्वरूपाचें पूर्ण ब्रह्मत्वाने वर्णन केले होतें तें सर्व यथार्थ होतें, याचा आज मला अनुभव आला.
164-10
जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माजीं हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ॥164॥
देवा ! त्या ऋषींचे बोलणें हें आत्मज्ञानाचे बीज होय. तें माझ्या ह्रदयरूपी भूमींत खोल पडलें व त्यावर तुझ्या कृपेचा ओलावा मिळाल्यामुळे ते बीज अंकुरित होऊन तें सर्व संवादरूपी यथार्थबोधाने फलद्रूप झाले.
165-10
अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरिता । मी महोदधीं जालां अनंता । संवादसुखाचा ॥165॥
देवा ! नारदादि संतांच्या वचनरूप नद्यांना मी एकवाक्यतारूप संवादसुखाचा समुद्र झालों.

166-10
प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें । तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्‍गुरु तुवां ॥166॥
देवा ! या आणि मागील सर्व जन्मात जेवढे काही निष्काम पुण्य केले असेल त्याचे, सद्गुरुप्राप्ती हे जे फळ, ते कधी होत नाही असे नाही. म्हणूनच तू मला सद्गुरू प्राप्त झालास.
167-10
एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें । परि कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥167॥
वस्तुतः वाडवडिलांच्या मुखाने मी तुझ्या स्वरूपाचा महिमा सदा कानाने ऐकत होतो, पण जोपर्यंत तुझी कृपा झाली नव्हती, तोपर्यंत मला तुझा महिमा कळू शकला नाही.
168-10
म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ । तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥168॥
म्हणून ज्याप्रमाणे आपले दैव जेव्हा अनुकूल होते, तेव्हा केलेले सर्व प्रयत्न सफळ होतात, त्याप्रमाणे श्रीगुरुकृपेनेच संपूर्ण श्रवण व पठण केलेल्या वचनांचा यथार्थ बोध होतो.
169-10
जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी । परि फळेंसी तैंचि भेटी । जैं वसंतु पावे ॥169॥
देवा ! माळ्याने आपल्या जिवाच्या मोबदल्याने— म्हणजे झाडाचे जगणे तेच आपले जगणे असे समजून— झाडांना पाणी घातले आणि जन्मापाठी जन्म घेऊन असेच कष्ट केले, तरीपण एवढ्या कष्टानेही झाडांना फळे येतातच असे नाही, ते वसंतऋतूच्या स्वाधीन आहे.
170-10
अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे । पैं रसायनें तैं गोडें । जैं आरोग्य देहीं ॥170॥
त्याचप्रमाणे देवा ! त्रिदोषाची विषमता कमी झाली असता, मधुररस मधुर लागतो, आणि देहाच्या ठिकाणी आरोग्य असले तरच रसायन परिणामकारक होते.

171-10
कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण । जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं ॥171॥
चैतन्य शरीरांत प्रवेश करीते तेव्हाच इंद्रियें, वाणी, प्राण यांचे असण्याचे सार्थक होते.
172-10
तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें । तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानुकूल गुरु ॥172॥
त्याप्रमाणे मनुष्य जेवढें कांही शास्रावलोकन करतो किंवा योगादिक मार्गाचा अभ्यास करतो, तेवढे सर्व श्रीगुरुची कृपा झाली तरच खरोखर स्वाधीन होते.
173-10
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें 173॥
(श्रीगुरुकृपेनेच शब्द यथार्थ समजूं शकतात.) या आलेल्या अनुभवाने अर्जुन मत्त होऊन, दृढ निश्चयाची मूर्ती होऊन, नाचूं लागला व तसेंच, ‘देवा ! तुझे म्हणणें मला पटले’ असे म्हणू लागला.
174-10
तरि साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तूं देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥174॥
हे कैवल्याचे स्वामी भगवंता ! तरी तू खरोखरच देवदानवांच्या बुध्दीस आकलन होण्यासारखा नाहीस, हें त्रिवार सत्य आहे, असा मला अनुभव आला.
175-10
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा । तो कहींचि नोहे हें स‍द्भावा । भरंवसेनि आलें ॥175॥
तुझ्या कृपेने जोपर्यंत तुझ्या वचनाचा यथार्थ स्पष्ट बोध होत नाही, तोपर्यंत आपल्या बुध्दीनेच जाणण्याचा एखाद्याने कितीहि प्रयत्न केला, तरी त्याला त्यांचा यथार्थ बोध होणे कधीहि शक्य नाही, हे मला निश्चित कळून आले.
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते॥10.15॥

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *