एकनाथी भागवत ग्रंथ उत्पत्ती, महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

!! श्रीएकनाथी भागवत ग्रंथ रचनेचा इतिहास !!

श्रीसंत एकनाथमहाराजकृत ग्रंथकौस्तुभ “श्रीएकनाथी भागवत” जयंती निमित्त्य !

हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी एक होय. शब्दापुढे अर्थ धावे अशा सर्वसामांन्यांना समजणाऱ्या नेहमीच्याच नाथ भाषेत या ग्रंथाचे प्रकटीकरण झाले आहे. श्रीमद्‍भागवताच्या बारास्कंधापैकी अकराव्या स्कंधावर नाथांनी जी टिका लिहिली अर्थात ज्या साधारणत: १५०० श्लोकांवर जनसामान्यांसाठी मराठी भाषेत जे भाष्य केले ते म्हणजेच श्रीएकनाथी भागवत होय.

प्रस्तुत ग्रंथाचे पहिले पाच अध्याय हे पैठण क्षेत्री लिहिले गेले असून उर्वरित २६ अध्याय हे काशी/वाराणसी क्षेत्री लिहिण्यात आलले आहेत.

तेथे संस्कृत वाङ्मयाचे प्राकृतीकरण होत असल्याचे पाहुन तीव्र विरोध झाला, त्यावेळी मराठी भाषेचा कैवार घेत- संस्कॄत वाणी देवे केली । तरी प्राकॄत काय चोरापासुनि झाली ? ।। असा खडा सवाल करून तेथील धर्ममार्तंडांना आपल्या भक्‍तिज्ञानाने नाथांनी प्रभावित केले; परंतु काही जणांनी पुर्णत्वास गेलेला प्रस्तुत ग्रंथ गंगेत बुडवावा असा आग्रह धरला. गंगेत ग्रंथ तरल्यानंतर मात्र काशीवासियांतर्फे नाथभागवताची राजमार्गावरुन सोन्याच्या अंबारीत हत्‍तीवरुन शोभा यात्रा काढण्यात आली.

ग्रंथाचा विषय – नाथ भागवतात भगवान श्रीकॄष्णानं उद्धवाला केलेला उपदेश हा प्रामुख्याने आला असून यात नाथांनी भक्‍तीला पंचमपुरुषार्थ मानले आहे. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ठय असं कि, यात सर्व भिन्न भिन्न साधनांचा उत्‍त्तम प्रकारे समन्वय साधण्यात आला आहे. कर्म, विवेक, वैराग्य, भक्‍ति, ज्ञान, योगादी साधनांचं महत्‍त्व स्वतंत्रपणे प्रतिपादिलं असूनही परस्परात एकवाक्यता पहायला मिळते.विपुल प्रमाणात कर्म प्रतिपादन केलं असूनही कर्मठतेचा दुराग्रह त्यात नाही. समुद्राप्रमाणे शांत आणि गंगौघाप्रमाणे संथ वाहणारी नाथांची भाषा म्हणजे सहजता, सरलता, सुगमता, निर्मलता, भावपूर्णता व गंभीरतेचा एक सुरेल संगम आहे. एवढं सर्व असूनही त्यात अहंकाराला थारा नाही. ग्रंथ कर्तॄत्‍त्वाचं सर्व श्रेय नाथांनी आपले श्रीगुरु जनार्दनस्वामींना दिलं आहे. नाथ म्हणतात- बाळक स्वये बोलो नेणे । त्यासी माता शिकवी वचने । तैसी ग्रंथ कथाकथने । स्वये जनार्दन बोलाविजे ॥

भागवता विषयी आपलं मत व्यक्‍त करताना नाथ म्हणतात – हे भागवत नव्हे तर अज्ञानी लोकांकरिता घातलेली पाणपोयीच आहे. संसार तरुन जाण्यासाठी मोठी नौकाच देवाने निर्माण केली आहे. स्त्री शूद्रादी सारे या नावेत घालून भजन भावाने एकाच खेपेत पलिकडच्या तीराला जाऊ शकतात अशा प्रकारचं तत्वज्ञान यात आहे.

इ.स.१५७१ साली एकादशीस सुरू झालेला हा ग्रंथ इ.स.१५७३ च्या कार्तिक पौर्णिमेला वाराणसी येथील पंचमुद्रा घाटावरील कॄष्ण मंदिरात पूर्णत्वास गेला.

वाराणसी महामुक्तिक्षेत्र । विक्रमशक ’वृष’ संवत्सर ।
शके सोळाशें तीसोत्तर । टीका एकाकार जनार्दनकृपा ॥ ५१ ॥
महामंगळ कार्तिकमासीं । शुक्ल पक्ष पौर्णीमेसी ।
सोमवारशिवयोगेंसी । टीका एकादशी समाप्त केली ॥ ५२ ॥
स्वदेशींचा शक संवत्सर । दंडकारण्य श्रीरामक्षेत्र ।
प्रतिष्ठान गोदातीर । तेथील उच्चार तो ऐका ॥ ५३ ॥
शालिवहनशकवैभव । संख्या चौदाशें पंचाण्णव ।
’श्रीमुख’ संवत्सराचें नांव । टीका अपूर्व तैं जाहली ॥ ५४ ॥
एवं एकादशाची टीका ।जनार्दनकृपा करी एका ।
ते हे उभयदेशा‌अवांका । लिहिला नेटका शकसंवत्सर ॥ ५५॥
पंध्राशतें श्लोक सुरस । एकतीस अध्याय ज्ञानरहस्य ।
स्वमुखें बोलिला हृषीकेश । एकाकी एकादश दुजेनिवीण ॥ ५६ ॥
एकादश म्हणजे एक एक । तेथ दुजेपणाचा न रिघे अंक ।
तेंचि एकादश इंद्रियीं सुख । एकत्वीं अलोलिक निडारलें पूर्ण ॥ ५७ ॥
त्या एकादशाची टीका । एकरसें करी एका ।
त्या एकत्वाच्या निजमुखा । फळेल साधकां जनार्दनकृपा ॥ ५८ ॥

या ग्रंथाची संत तुकाराम महाराजांनी शेकोडो पारायणे केली असल्याचा इतिहास आहे. नाथ व नाथभागवता विषयी असणाऱ्या श्रद्धेपोटी ते लिहितात –
शरण शरण एकनाथा ! पायी माथा ठेविला !!१!! नका पाहु गुण दोष ! झालो दास पायाचा !!२!! आता मज उपेक्षिता ! नाही सत्ता आपुली !!३!! तुका म्हणे भागवत ! केले शृत सकळां !!४!!

भाविकांतर्फे शेकडो ठिकाणी आजही श्रीएकनाथी भागवताच्या सामुदायिक पारायण सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

!! भानुदास एकनाथ !!
!! दत्तात्रेय जनार्दन श्रीएकनाथ !!


लेखन – योगिराज गोसावी, पैठणकर (संत एकनाथमहाराजांचे १४ वे वंशज, पैठण)

श्रीमद् भागवत महापूराण संबंधित संकलन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *