सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २२६ ते २५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

226-13
नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥13-226॥
नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.
227-13
तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥13-227॥
तो औषधयोजनेत पहिल्याप्रथम कित्येक झाडांचे कंद खाणवले व कित्येकांना मुळांसकट व पानांसकट उपटविले.
228-13
एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं ॥13-228॥
काही झाडे मध्येच मोडली (म्हणजे त्याच्या मधल्या भागाचा औषधात उपयोग केला.) काही झाडांची साल काढवली व काही फळ देण्य़ाच्या बेतात असलेल्या वनस्पती, त्यावर क्षाराचे वगैरे कसले तरी थर देऊन उकडविल्या
229-13
अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा । ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले ॥13-229॥
ज्यांनी) कोणाचे केव्हाच वाकडे केले नाही, म्हणून ज्यांना शत्रु उत्पन्न झाला नाही अशा बिचार्‍या झाडांना (त्याचा चीक काढण्याकरता) त्यांच्या सर्वांगावर भेगा पाडून, याप्रमाणे अर्जुना, त्या वृक्षांचे जीव घेऊन त्यांना कोरडे केले.
230-13
आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त । मग राखिले शिणत । आणिक जीव ॥13-230॥
आणि हालचाल करणार्‍या प्राण्यांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगांनी पीडित अशा दुसर्‍या जीवांचे रक्षण केले.
हास्यास्पद अहिंसा


231-13
अहो वसतीं धवळारें । मोडूनि केलीं देव्हारें । नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली ॥13-231॥
अहो रहाती घरे मोडून त्या घराच्या सामानाने देऊळ व देव्हारे केले व व्यवहारात लोकांना फसवून, लुटून जे द्रव्य मिळवले त्या द्रव्याच्या योगाने अन्नसत्र घातले.
232-13
मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें । घर मोडोनि केले । मांडव पुढें ॥13-232॥
डोक्यास गुंडाळण्याकरता नेसलेले वस्त्र सोडून जर ते मस्तकास बांधले तर शरीराचा खालचा भाग उघडा पडतो, अथवा जसे घर मोडून त्या घरापुढे मांडव केले
233-13
नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें । जालें आंगधुणें । कुंजराचें ॥13-233॥
अथवा पांघरुणे जाळून मग जसा शेक घेणे किंवा हत्तीचे जसे अंगधुणे झाले (हत्ती हा स्नान केल्याबरोबर आपल्या ओल्या अंगावर सोंडेने माती घेऊन जास्त मलीन होतो)
234-13
नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा । इया करणी कीं चेष्टा? । काइ हसों ॥13-234॥
बैल विकून जसा गोठा बांधावा, अथवा राघूस हाकून देऊन मग पिंजरा तयार करावा, असल्या कृतींना योग्य करणे म्हणावे किंवा चेष्टा म्हणाव्यात? का याला हसावे?
दैनंदिन हिंसा
235-13
एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥13-235॥
बा कित्येकांनी धर्ममार्ग म्हणून पाणी गाळण्याला आरंभ केला तेव्हा गाळण्याच्या तापाने जीव मेले.


236-13
एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा ॥13-236॥
कित्येक या हिंसेच्या भयाने धान्य शिजवीत नाहीत (तर कोरडेच धान्य खातात. ते कच्चे धान्य त्यास पचत नसल्यामुळे) त्यांचे प्राण कासावीस होतात, हीच हिंसा होय.
237-13
एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥13-237॥
बा, याप्रमाणे हे चांगल्या मनाच्या अर्जुना, हिंसेलाच अहिंसा ठरवण्याचा असा हा कर्मकांडात सिद्धांत आहे, तो तू नीट समजून ठेव.
238-13
पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव । तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥13-238॥
अहिंसेविषयी निरनिराळी मते सांगण्याचे जेव्हा आम्ही पहिल्या प्रथम अहिंसेच्या नावाचा उच्चार केला तेव्हा ही मते सांगावीत अशी स्फूर्तीला हाव झाली,
239-13
तरि कैसेनि इयेतें गाळावें । म्हणौनि पडिलें बोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥13-239॥
तर या मतांना कसे गाळावे? म्हणून आम्हाला बोलणे भाग पडले. त्याच प्रमाणे तुलाही निरनिराळी मते माहीत व्हावीत असा हे प्रतिपादन करण्याचा आमचा हेतु होता.
240-13
बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी । एऱ्हवी कां आडवाटीं । धाविजैल गा? ॥13-240॥
अर्जुना, बहुतकरून या अहिंसे संबंधी काही बोलावयास लागले की त्या प्रतिपादनात हाच (वर सांगितलेला हिंसात्मक अहिंसांचा) विषय आढळतो. (म्हणून आम्ही त्याची चर्चा केली). नाहीतर हाती घेतलेल्या विषयाच्या प्रतिपादनाचा धोपट मार्ग सोडून मतमतांतरे सांगण्याच्या आडवाटेला कशाला जावे लागले असते?


241-13
आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां मतांतरां । निर्वेचु कीजे ॥13-241॥
आणि अर्जुना, आपल्या स्वत:च्या मताच्या निश्चयाकरता जी दुसरी मते विचारात घेणे जरूर असेल त्यांचाही निर्णय केलाच पाहिजे.
242-13
ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी । आतां ययावरी । मुख्य जें गा ॥13-242॥
याप्रमाणे ही निरूपण करण्याची पद्धति आहे असे समज. कारण अहिंसेविषयी ज्ञानेशांचे मत
243-13
आता अर्जुना, यानंतर मुख्य जे, तें स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल । जेणें उठलिया आंतुल । ज्ञान दिसे ॥13-243॥
ते आमचे मत सांगण्यात येईल. अहिंसेची नीट कल्पना येईल, असे लक्षण करण्यात येईल. ही अहिंसा चित्तात प्रगट झाली असता त्या ज्ञान आहे असे दिसेल.
244-13
परी तें अधिष्ठिलेनि आंगें । जाणिजे आचरतेनि बगें । जैसी कसवटी सांगे । वानियातें ॥13-244॥
पण ज्याप्रमाणे कसोटी सोन्याच्या कसाला सांगते त्याप्रमाणे अहिंसेने वास्तव्य केलेल्या शरीराच्या आचरणाच्या रीतीवरून त्या शरीरात अहिंसा रहात आहे असे जाणले जाते.
245-13
तैसें ज्ञानामनाचिये भेटी । सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी । तेंचि ऐसें किरीटी । परिस आतां ॥13-245॥
त्याप्रमाणे ज्ञानामनाच्या भेटीबरोबरच (मनात ज्ञान उत्पन्न झाल्याबरोबर) अहिंसेचे चित्र उमटते, ते चित्र असे असते. अर्जुना, ऐक.


246-13
तरी तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥13-246॥
अहिंसकाचे चालणे = तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज (खळखळ) न मोडू देता
247-13
वेगें आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा । जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥13-247॥
वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टि ठेऊन बगळा जसा पाण्यात पाय घालतो,
248-13
कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥13-248॥
अथवा भ्रमर जसे कमळावर कमळातील तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात,
249-13
तैसे परमाणु पां गुंतले । जाणूनि जीव सानुले । कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥13-249॥
त्याप्रमाणे परमाणूंमधे लहान जीव आहेत असे जाणून दयेमधे आपली पाऊले लपवून चालतो.
250-13
ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥13-250॥
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते, ती दिशाच प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वत:चा प्राण अंथरतो (मग त्यावर चालतो).

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading