सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११२६ ते ११५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

1126-13
अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळां । देखावा पै ॥1126॥
आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू विवेकाच्या डोळ्याने पहाशील.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥13.33॥

श्लोकार्थ -::- हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व ब्रम्हांडाला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे एकटा आत्मा सर्व क्षेत्रांना (देहांना) एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो.
1127-13
हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटवी लोकु । नांवें नांवें ॥1127॥
ह्या सर्व उपमा राहू दे.आता मी एक गोष्ट सांगतो. ती अशी की आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी (दररोज) सर्व त्रैलोक्य प्रकाशमय करतो.
1128-13
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुतें हें न पुसा । शंका नेघा ॥1128॥
त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला (प्रतीतीला) प्रकाशक आहे. यानंतर आत्मा व देह या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका.
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥13.34॥

श्लोकार्थ -: :- याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणार्‍या प्रकृतीचा मोक्ष (म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व) जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते महात्मे परब्रम्ह परमात्म्याला प्राप्त होतात.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नाम त्रयोदशोऽध्यायः ॥13॥
अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला. ॥13॥
1129-13
शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणें तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रक्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1129॥
हे शब्दांच्या खर्‍या खर्‍या स्वरूपाचे मर्म जाणणार्‍या अर्जुना, तीच बुद्धी डोळस, की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर जाणते.
1130-13
इया दोहींचें अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1130॥
क्षेञ व क्षेञज्ञ या दोन्हीतील अंतर समजण्याकरता चतुर मुमुक्षू पुरुष ज्ञानी पुरुषांची द्वारी जाऊन त्यांची सेवा करतात.

1131-13
याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोषिती घरीं ॥1131॥
हे समजण्याकरता ते शांतीरुप संपत्ति स्वाधीन करुन घेऊन शास्ञाच्या दुभत्या गायी घरी पोसन्याचे काम करतात.म्हणजेच शास्राचे मनन,चिंतन आणि अध्ययन करतात.
1132-13
योगाचिया आकाशा । वळघिजे येवढा धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1132॥
जे साधक हे समजन्याकरिताच अष्टांग योगरुप आकाश चढुन जाण्याची इच्छा मनात धरतात.
1133-13
शरीरादि समस्त । मनिताति तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥1133॥
शरीरादि सर्व गोष्टी गवताप्रमाने तुच्छ मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे आपल्या मस्तकावर धारण करतात.
1134-13
ऐसैसिया परी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुतें होती ॥1134॥
अशा प्रकारच्या ज्ञान आत्मसात करण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करुन ते ज्ञान मिळवतात.आणि त्यायोगे अंतःकरणात निश्चिंत होतात.
1135-13
मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें । जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही ॥1135॥
देह आणि आत्मा यामधिल अंतर जे खरोखर पाहतात.त्यांच्या ज्ञानावरुन आम्ही आमचे ज्ञान ओवाळुन टाकु.

1136-13
आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं । पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥1136॥
पंचमहाभूतादि अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्याप्रकृती पसरली आहे.
1136-13
जे शुकनळिकान्यायें । न लगती लागली आहे । हें जैसें तैसें होये । ठाउवें जयां ॥1137॥
ज्याप्रमाने एखादा पोपट नळीवर येऊन बसतो तेव्हा त्या नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बद्ध न होता.तो आपल्या कल्पनेनेच बद्ध होतो,त्याप्रमाने ही प्रकृतीक्षेञज्ञ पुरुषाला न चिकटताच चिकटलेली आहे असे जानवते.
1138-13
जैसीं माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां । सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनी ॥1138॥
ज्याप्रमाणे (माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी) मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पहातो.
1139-13
कां शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती । रुपयाची भ्रांती । जाऊनियां ॥1139॥
प्रखर अशा उजेडात दुरवर पडलेले शिंपले आणि त्यावर मिथ्या रुपयाचे ज्ञान होते. पण बारीक विचाराने रुप्याची भ्रांती जाऊन शिंपले हे शिंपलेच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते.
1140-13
तैसी वेगळी वेगळेपणें । प्रकृति जे अंतःकरणें । देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती ॥1140॥
त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंत:करणाने जे पहातात ते ब्रम्हरुप होतात, असे श्रीकृष्ण स्वःता म्हणतात.

1141-13
जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड । जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी ॥1141॥
जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यासाम्य उरू देत नाही.
1142-13
आकारु जेथ सरे । जीवत्व जेथे विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जें ॥1142॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे,
1143-13
तें परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- ! राजहंसु ॥1143॥
अर्जुना असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात.
1144-13
ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥1144॥
श्रीकृष्ण व अर्जुन
(संजय धृतराष्ट्रास म्हणतो) महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा असा प्रकृती-पुरुष-विचाराचा सर्व हिशोब दिला.
1145-13
येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी । आपणपें तया श्रीहरी । दिधलें तैसें ॥1145॥
ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसर्‍या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वत:ला (आपल्या बोधाला) त्या अर्जुनाला दिले. (आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला).

1146-13
आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनातें श्रीकृष्ण । हा मी म्हणे ॥1146॥
आणि कोण कोणाला देणारा आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा (अर्जुन) मी (श्रीकृष्ण) आहे असे, श्रीकृष्ण म्हणालेही.
1147-13
परी असो तें नाथिलें । न पुसतां कां मी बोलें । किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें ॥1147॥
परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलत आहे? फार काय सांगावे? श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले.
1148-13
कीं तो पार्थु जी मनीं । अझुनी तृप्ती न मनी । अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥1148॥
(अर्जुनाचे श्रवण) तथापि तो अर्जुन मनामधे अजून तृप्ती मानीत नव्हता, तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवीत होता.
1149-13
स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी ॥1149॥
भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली.
1150-13
तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥1150॥
जेथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोक्तेही मिळाले आहेत तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो,

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *