उपदेशपर अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

1.                  उपदेशपर अभंग पर

1.      कलिमाजी दैवते उघड दिसती फार

कलिमाजी दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥
लटिका देव लटिका भक्‍त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥
तेल रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकु । फजितखोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकु ॥३॥
एका जनार्दनीं सर्वभावें सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥

2.      तीर्थाजाती उदंड

तीर्थाजाती उदंड । त्याचे पाठीमागे तोंड ॥१॥ मनवासना ठेउनी घरी । तीर्था नेली भांडखोरी ॥२॥
गंगेत मारिता बुडी । मन लागले बिऱ्हाडी ॥३॥ नमस्कार करिता देवासी । मन पायपोसापाशी ॥४॥
लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥ एकाजनार्दनी स्थिर मन । नाही तव काय साधन ॥६॥

3.      वरुषला मेघ खडकावरुता

वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्वता थेंब नाही ॥१॥
वाया तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्‍तिवीण ॥२॥
अरण्यात जैशी सुकरे बैसती । तैसे मठाप्रति करुनी बैसे ॥ ३॥
उदय होताचि लपते उलुक । तैसा तो मुर्ख समाधी बैसे ॥४॥
एकाजनार्दनी वाया गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शुन्य ॥५॥

4.      आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण

आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । यातीकुळ नाही लहान ॥१॥ आ
म्हा सोवळे वोवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ॥२॥
आम्हा सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एकाजनार्दनी बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥

5.      कामक्रोध लोभ दंभ मद मत्सर

कामक्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‍वैरी तत्पर हेचि येथे ॥१॥ क्षुधा तृषा मोद शोक जरा मरण । षड्‍ऊर्मी पूर्ण देहीं हेचि ॥२॥ आशा मनिषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजी ॥३॥ एकाजनार्दनी त्यजोनी अठरा । तोचि संसारामाजी शुद्ध ॥४॥

6.      श्वानाचाचा तो धर्म करावी वसवस

श्वानानाचा तो धर्म करावी वसवस । भलेबुरे त्यास न कळे काही ॥१॥ वेश्यांचा धर्म द्रव्यते हरावे । भलेबुरे भोगावे न कळे कांही ॥२॥ निंदकाचा धर्म निंदाती करावी । भले बुरे त्यागावी नकळे काही ॥३॥ सज्जनांचा धर्म सर्वाभूती दया । भेदाभेद तया नकळे काही ॥४॥ संतांचा धर्म अंतरी ती शांती । एकाजनार्दनी वस्ती सर्वांठायी ॥५॥

7.      पांथस्थ घरासी आला

पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥१॥ तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥ बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडूनि गेला ॥३॥ एका विनवी जनार्दना । ऐसे करी गा माझ्या मना ॥४॥

8.      जया म्हणती नीच वर्ण
जया म्हणती नीच वर्ण । स्त्री शुद्रादी हीनजन ॥१॥ सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे? ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥ तया नाही जनन । सवेचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुलि । एकाजनार्दनी देखिली ॥५॥

9.      विषयवासना भाजी त्याचे मूळ

विषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कल्लोळ प्राप्ती तुज ॥१॥ आशेचे काबाड कल्पना सगळी । उपटोनि मुळी टाकी परती ॥२॥ भेदाचे भांडे वैराग्याचे हातें । धुवोनि सरते करी बापा ॥३॥ शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एकाजनार्दनी पाय पावशील ॥४॥

10.              वैराग्य प्रथम असावी शांती

वैराग्य प्रथम असावी शांती । तेणे विरक्‍ति अंगी जोडे ॥१॥ हेचि मुख्यवर्म साधता साधन । येणे जनार्दन जवळी असे ॥२॥ उपासना मार्ग हेचि कर्मकांड । हेचि ब्रह्मांड जनीवनी ॥३॥ हेचि देहस्थिती विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥ एकाजनार्दनी शांतीक्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥

11.              इहलोकींचा हा देहे २५४

इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥ धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥धृ.॥ आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥ तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥

12.              फळकट तो संसार २७२३
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥१॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥धृ.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥३

13.              झुंजार ते एक विष्णुदास जगी

झुंजार ते एक विष्णुदास जगी  । पाप पुण्य अंगी नातळे त्या ॥ गोविंद आसनी गोविंद शयनी । गोविंद त्या मनी बैसलासे ॥ उर्ध्वपौंड्र भार कंठी शोभे माळ । कापे कळीकाळ तया भेणे ॥ तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार । नामामृत सार मुखामाजी ॥

14.              आवडीनें भावें हरिनाम घेसी

आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥ नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा । पती लक्ष्मीचा जाणतसे ॥ सकळ जीवांचा करितो संभाळ । तुज मोकलील ऐसें नाहीं ॥ जैसी स्थिती आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥ एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा । हरिकृपें त्याचा नाश आहे ॥

15.              भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त

भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥१॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥धृ.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥२॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥३॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥४॥ तुका म्हणे फार । थोडा तरी पर उपकार ॥५॥

16.              आम्ही वैकुंठवासी

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥धृ.॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥ पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जेजेकार आनंदें ॥३॥

17.              वैष्णव तो जया

वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥धृ॥पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥ तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥

18.              साधावया भक्तीकाज

साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥ ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥धृ.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥ तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥

आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

निवडक अभंग     हरिपाठ      वाराचे अभंग     गाथा

भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *