पंढरी-पंढरपूर महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

आधी रचिली पंढरी । मग 1
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलिया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरि । तें म्यां देखिली पंढरी ॥ ७ ॥

कृत त्रेता द्वापार कली 2
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौयुगांचा मेळी ।
तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्री ॥१॥


ऐसा ब्रह्मयाचा दिनांतर । तैसीच रात्र एक सहस्त्र ।
तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥

ऐसें बारामास । त्याचे एक वरुष ।
शतभरी आयुष्य । ब्रह्मयाचे ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषं गणित ।
ज्या प्रळयी पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥

ऐसी अठ्ठाविस युगे जाण । पंढरपूरासी झाली पूर्ण ।
जो की ब्रह्मयाचा दिन । प्रळय काळ ॥५॥

नामा म्हणे पंढरीची संख्या । सांगितली संत महंत लोकां ।
लसूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥

ऐका पंढरीचें महिमान 3
ऐका पंढरीचें महिमान । राउळे तितुकें प्रमाण ।
तेथील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥

ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकी गति ।
तें आणिका तीर्था जाती । ती वंदिती तयांसी ॥२॥

वाराणसीं चालिजे मासा । गोदावरी एक दिवसा ।
पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥

ऐसें शंकर सांगें ऋषीजवळीं । सकळ तीर्थेमाध्यान्हकाळीं ।
येती पुंडलिकाजवळीं । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥

ऐसेनि तीर्थी पाप घडे । ऐसे बोलतां जिव्हां झडे ।
नामा विनवी संतांपुढे । पंढरी पेठ न सांडावी ॥५॥

पाहतां देऊळाची पाठ 4
पाहतां देऊळाची पाठ । तीर्थे घडली तीनशेसाठ ॥१॥ स्नान करितां पद्माळें । उध्दरती सर्व कुळें ॥२॥ सन्मुख पाहतां विठाई । त्यासी उपमा द्यावया नाहीं ॥३॥ ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णूं म्हणे नामा ॥४॥

आषाढी कार्तिकी विसरू नका मज 5
आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥१॥ पतितपावन मी तो आहे खरा । तुमचेनि बरा दिसतसे ॥२॥ तुम्हीं जातां गांवा हुरहुर माझे जीवा । भेटाल केधवा मजलागीं ॥३॥ धांवोनियां देव गळां घाली मिठी । स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ॥४॥ तिन्हीं त्रिभुवनीं मज नाहीं कोणी । म्हणे चक्रपाणि नामयासी ॥५॥

आषाढी कार्तिकी हेचि पंढरपूर 6
आषाढी कार्तिकी हेचि पंढरपूर सुगी । शोभा पांडुरंगी घनवटे ॥१॥ संतांची दर्शनें हेचि पीक जाण । देतां आलिंगन देह निवे ॥२॥ देह निवे किती नवल सांगावें । जीवासी दुणावें ब्रह्मानंद ॥३॥ नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग । त्याचेनि अव्यंग सुख आम्हां ॥४॥

हेचि देवा पैं मागत । चरणसेवा 7
हेचि देवा पैं मागत । चरणसेवा अखंडित ॥१॥ वास द्यावा पंढरीचा । सदा संग हरिदासांचा ॥२॥ जन्म हो का भलते याति । परि मी न चुकें हरिभक्ति ॥३॥ नामा म्हणे कमळापती । हेंचि द्यावे पुढतपुढती ॥४॥

पंढरीच्या सुखा अंतपार नाही 8
पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा । शेषां सहस्त्रमुखां न वर्णवेचि ॥१॥ पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोजन्मीं वारी घडली तयां ॥२॥ पंढरीस जातां प्रेम उचंबळत । आनंदे गर्जत नामघोष ॥३॥ विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखें । विसरला दुःखें देहभाव ॥४॥ नामा म्हणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥

उठाउठी अभिमान । जाय ऐसे 9
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ॥१॥ तें या पंढरीस घडे । खळा पाझर रोकडे ॥२॥ नेत्री अश्रूचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ॥३॥ तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥४॥

होय होय वारकरी । पाहें पाहे 10
होय होय वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणे ॥२॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥३॥ तुका म्हणे डोळा । विठो बैसला सांवळा ॥४॥

तेथें सुखाची वसती । गाती 11
तेथें सुखाची वसती । गाती वैष्णव नाचती । दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरिनामें ॥१॥ दोषा झाली घे घे मारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारी । नाहीं उरी परताया ॥२॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥३॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेलीच राहे । तुका म्हणे पाहे । कोण वास मुक्तीची ॥४॥

आवडे पंढरी भीमा पांडुरंग 12
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पुंडलिक ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरविती ॥२॥ तुका म्हणे जीवा थोर झाले सुख । नाठवे हे भूक तहान कांहीं ॥३॥

पंढरीची वारी आहे माझे घरीं 13
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवाशी । गाईन अहर्निशी मुखीं नाम ॥२॥ नाम विठोबाचें घेईन मी वाचें । बीज कल्पांतीचे तुका म्हणे ॥३॥

सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा 14
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिखें तें ॥१॥ नलगे हिंडणे मुंडणें तें कांहीं । साधनाचा नाहीं आटाआटी ॥२॥ चंद्रभागें स्नान विधी तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥३॥ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ । विशेष हा लाभ संतसंगे ॥४॥

कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं 15
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥१॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरी । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥२॥ चालती स्थिर स्थिर । गरुडटकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥३॥ मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदे डुल्लती । शूर उठावती । एक एक आगळे ॥४॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदली सकळ । आलें वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥५॥ आस करिती ब्रह्मादिक । देखोनि वाळवंटीचे सुख । धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचा कैसा ॥६॥ मरण मुक्ती वाराणसी । पितृऋण गया नासी । उधार नाहीं पंढरीसी । पायापाशी विठोबाच्या ॥ ७ ॥ तुका म्हणे आतां । काय करणे आम्हां चिंता । सकळ सिध्दींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥८॥

जया दोषां परिहार । नाहीं धुंडितां 16
जया दोषां परिहार । नाहीं धुंडितां शास्त्र । तें हरती अपार । पंढरपूर देखिलिया ॥१॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मतीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनाद ॥२॥ सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥३॥ नाही उपमा द्यावया । समतुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जया । जें पंढरपूर देखती ॥४॥ उपजोनी संसारी । एक वेळ पाहें पां पंढरी । महादोषां कैंची उरी । देवभक्त देखिलिया ॥ । ५ ॥ ऐसी विष्णुची नगरी । चतुर्भुज नरनारी । सुदर्शन घरटी करी । रीघ न पुरे कळिकाळा ॥६॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैंची मज मति । जे पंढरपुरा जाती । तें पावती वैकुंठ ॥ ७ ॥ तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । तो अधम जन्मांतरींचा । जया पंढरी नावडे ॥८॥

पंढरीचा महिमा । देतां 17
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥२॥ आहेति सकळ । तीर्थेकाळें देती फळ ॥३॥ तुका म्हणे पेठ । भूमीवरी हे वैकुंठ ॥४॥

उदंड पाहिले उदंड ऐकिलें 18
उदंड पाहिले उदंड ऐकिलें । उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ॥१॥ ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ॥२॥ ऐसें संतजन ऐसे हरिदास । ऐसा नामघोष सांगा कोठे ॥३॥ तुका म्हणे आम्हां अनाथाकारणें । पंढरी निर्माण केली देवें ॥४॥

आमुची मिरासी पंढरी 19
आमुची मिरासी पंढरी । आमुचे घर भीमातीरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रखुमाई आमुची माता ॥२॥ भाऊ पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥३॥ तुका जुनाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥४॥

वाराणसी गया पाहिली द्वारका 20
वाराणसी गया पाहिली द्वारका । परि नये तुका पंढरीचा ॥१॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेकां ॥२॥ तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरी यम नये ॥३॥

संपूर्ण पंढपूर महात्म्य, अभंगासहित

संपूर्ण पंढपूर महात्म्य, अभंगासहित

वारकरी सांप्रदाय परिचय

वारकरी सांप्रदायिक नित्यनेम

वारकरी ग्रंथ

वारकरी वैभव

वारकरी संपर्क

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *