सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

326-17
हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥ 326 ॥
हें भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनीं कृपा करून ते सांगावेंच. 26
327-17
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणें सात्त्विक तें मुक्ती- । रत्न देखे ॥ 327 ॥
तेव्हां कृपाळ व चक्रवर्ती भगवान म्हणाले ज्याच्या योगें सात्विक गुणाला मुक्तिरत्नाचा लाभ होतो त्याचे लक्षण ऐक. 27
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥17. 23॥
328-17
तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम । तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ॥ 328 ॥
तरी, परब्रह्म हें अनादि असून जगदादिकांचे विश्रांतिस्थान आहे; हे त्यांचे एकच नांव तीन प्रकारचे आहे. 28
329-17
तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती-/ । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥ 329 ॥
खरोखर पहातां वस्तुतः त्याला नाम किंवा जाति नाही, परंतु अज्ञानी जीवांना त्याची ओळख अथवा कल्पना व्हावी म्हणून वेदांनी खूण म्हणून त्याचे ‘ब्रह्म’ असे नांव ठेविले. 29
330-17
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं । ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ 330 ॥
मुलाला जन्मतः काही नांव नसते, पण नंतर त्याला जें नांव द्यावें त्या नांवाने हांक मारली असतां ‘ ओ ‘देते. 330

331-17
कष्टले संसारशीणें । जे देवों येती गाऱ्हाणें । तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ॥ 331 ॥
संसाराच्या कष्टानें शीण पावलेले लोक जेव्हां वेदाकडे आपलें गाऱ्हाणे सांगतात तेव्हां त्यांना ज्या नांवानें तो ‘ओ’ देतो. तो हा संकेत किंवा ती ही ब्रह्मनामक खुण होय. 31
332-17
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ॥ 332 ॥
ब्रह्मावरील अनिर्वाच्यतेचा आळ फिटावा व त्याची ऐक्यरूपाने भेट व्हावी अशा हेतूने वेदाने सकृप होऊन जीवांसाठीहे मंत्ररूप नाम शोधून ठेविलें. 32
333-17
मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें । मागां असत ठाके । पुढां उभें ॥ 333 ॥
मग ह्या खुणेच्या मंत्राने त्याला (ब्रह्माला) कौतुकानें हांक मारिलो असतां, जे मार्ग म्हणजे दृष्टीआड असल्यासारखे असतें तें प्रत्यक्ष पुढे उभे रहतें. 33
334-17
परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे ॥ 334 ॥
पण, वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरुपी नगरांत ज्यांचा ब्रह्माशी सहसमागम असतो त्यांसच हें नाम महात्म्य कळतें. 34
335-17
हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ 335 ॥
हेंही असो; ब्रह्मदेवाला सृष्टि उत्पन्न करण्याचे जे सामर्थ्य प्राप्त झालें तें ज्या एका नामाच्या आवृत्तीने म्हणजे जपाने च होय. 35

336-17
पैं सृष्टीचिया उपक्रमा-/ पूर्वीं गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥ 336 ॥
अर्जुना, सृष्टि उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटाच वेडयासारखा (कांहीं न सुचून ) बसला होता. 36
337-17
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके । तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥ 337 ॥
त्याला माझी ओळख नव्हती किंवा सृष्टि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ही नव्हते, पण, त्या वेदसांकेतिक नामाने त्याला एवढे सामर्थ्य आले. 37
338-17
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥ 338 ॥
ज्या मंत्राच्या अर्थाचें मनांत ध्यान करून व ज्या मंत्राच्या तीन अक्षरांचा जप करून त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता आली. 38
339-17
तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ॥ 339 ॥
प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञरूपी आचाराचे बंधन लावून, निर्वाहार्थं यज्ञादि साधने स्वाधीन केली. 39
340-17
पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ॥ 340 ॥
मग आणखी किती लोक निर्माण केले त्याची गणतीच नाही; तसेच त्रिभुवन निर्माण करून त्यांस व्यवहारार्थं बक्षीस करून दिले. 340

341-17
ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें । तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥ 341 ॥
ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला अशी प्रचंड शक्ति प्राप्त झाली, त्याचे स्वरूप तूं आतां श्रवण कर, असे श्रीनिवास भगवान् म्हणाले. 41
342-17
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥ 342 ॥
तरी सर्व मंत्रांचा राजा जो “प्रणव” तोच “ॐ” आदिवर्ण म्हणजे मूळ अक्षर असे जाण व ‘तत्’ हें दुसरें व ” सत्” हे या मंत्राचे तिसरे अक्षर होय. 42
343-17
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु । हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥ 343 ॥
ह्याप्रकारें “ॐ तत्सत” आकाराचें हे त्रिप्रकारक ब्रह्मनाम हेंच कोणी उपनिषदांचे सुंदर पुष्प त्याचा सुगंध तू सेवन कर.43
344-17
येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक । तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ॥ 344 ॥
ह्या वर्णत्रयाच्या ऐक्याने सात्विक कर्माचरण केले असतां मोक्ष त्याचा दास होतो. 44
345-17
परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव । लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ॥ 345 ॥
दैवयोगाने, कापुराचे अलंकार जरी मिळाले, तरी ते ल्यावे कसे हे समजणेच मोठे कठीण असतें. 45

346-17
तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ॥ 346 ॥
तसे, सत्कर्माचे आचरण व ब्रह्मनामाचा उच्चार जरी केला, तरी जर त्याच्या उपयोगाचे वर्म माहीत नसेल, 46
347-17
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे ॥ 347 ॥
तर, साधुसंत प्रेमानें घरी आले तरी त्यांचे आदरातिथ्य कसें करावें हें न जाणतां जर अपमान झाला तर पुण्य लागण्याऐवजी पाप मात्र लागते. 47
348-17
कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं ॥ 348 ॥
किंवा सोन्याचे उत्तम टीक वगैरे दागिने एकत्र गांठोड़े करून जसे गळ्यांत बांधावे 48
349-17
तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म । विनियोगेंवीण काम । विफळ होय ॥ 349 ॥
तसे मुखानें ब्रह्म नामोच्चार, हातानें सात्विक कर्म, पण त्याचा विनियोग मात्र माहीत नाही असे असेल तर तें व्यर्थ जाते. 49
350-17
अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख । जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं ॥ 350 ॥
अरे, पोटांत भूक आहे, जवळ अन्नही आहे, पण कसें जेवावे तें माहित नसलेल्या बालकाला जसा उपवास घडतो. 350

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *