अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378


संतश्रेष्ठ प्रात:स्मारणीय श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे “अमृतानुभव. “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट घेतो, वणवण फिरतो ते केवळ सुख, शांती, व समाधान मिळवण्यासाठी. पण खरंच माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होतात का? व्यक्ती कोणत्याही वयाची, लिंगाची, धर्माची, पंथाची असो, कोणत्याही प्रदेशात राहणारी असो, की वर्णाची असो ह्या तीन गोष्टी मिळवण्यासाठी त्याची सारखी धडपड सुरू असते. अनेकदा ह्या गोष्टी हातात आल्या असं वाटतं पण त्या केंव्हा हातातून सुटून जातात हे कळत नाही. मग आनंदाची प्राप्ती दूर राहते. सुख, शांती, समाधान ह्या तिन्ही गोष्टी बद्दल आपणांस आवड आहे, ओढ आहे .

पण नक्की सुख म्हणजे काय? शांती कशात आहे व समाधान कसे मिळते? हेच आमच्या लक्षात येत नाही. आयुष्यभर संसार, शिक्षण, पैसा, सत्ता, सन्मान मिळवण्यासाठी कष्ट घेऊनही शेवटी लक्षांत येते, जीवाला सुख मिळाले नाहीच. चित्त शांत झाले नाही. आनंदाच्या ऐवजी दुःख प्राप्त झाले. चित्त शांतीसाठी अनेकजण जप-जाप्य, होम-हवन, यम-नियम, दान- धर्म करतात पण त्यापासून मिळणारी शांती सुध्दा अनेकवेळा क्षणभंगुर ठरते.जप-जाप्य करीत असताना मन स्थिर होते, पण सांसारिक दुःख, व्यावहारिक अडचणी, शारीरिक असमर्थता आली की आमचे जप नीट होत नाहीच, पण ते न झाल्याचे दुःख पदरी येते. हीच गोष्ट होम-हवनाची सुयोग्य साधन सामग्री नाही मिळाली की मन उदास होते. वयपरत्वे यम-नियम पाळले जात नाहीत. कलियुगात तर आचारधर्म सुद्धा नीट पाळता येत नाहीत. दान सुद्धा सत्पात्री झाले तरच आनंद मिळतो. अनेकदा घरासाठी, मुलांसाठी आयुष्यभर कष्ट घेऊनही उतार वयात ते मान देत नाहीत म्हणजे पुन्हा दुःखच. या दुःखापासून दूर जाण्यासाठी काहीच मार्ग नाही का?


मानवाला ‌दुःखापासून, चित्ताच्या चंचलतेपासून, देहाच्या अस्वस्थते पासून दूर होण्याचा काहीच मार्ग मिळणार नाही का? एक असा मार्ग, असे काही औषध, अशी काही साधना नाही का, ज्यामुळे आम्ही सुख, शांती, व समाधान प्राप्त करून घेऊ व आनंदाची अनुभूती घेऊ शकू. मुळांत आमच्या सुखाच्या कल्पनाच चुकीच्या आहेत. सर्व दुःखाचे कारण मन हेच आहे. हे मन अस्तित्वहीन आहे. अतिशय चंचल आहे. आपल्या शरीरात मन नावाचा काही अवयव आहे का? नाही. ज्याला स्वःताचे अस्तित्व नाही अशा मनाच्या मागे आम्ही धावतो. मृगजळ आपली तहान भागवू शकत नाही त्यामुळे आम्ही अतृप्त राहतो. अशा अशाश्वत चंचल मनाचा लय केला पाहिजे त्याला प्राणशक्तीच्या स्वाधीन केले पाहिजे. नित्य नवे संकल्प, नव्या इच्छा, नव्या ईर्षा ह्या बंद झाल्या, त्यापासून दूर जाता आले तरच शांतीचा अनुभव घेता येतो, हा खरा आनंद मिळवण्यासाठी उत्तम उपाय आहे. आता आपण विचार करू असा अनुभव कोणी घेतला आहे का? ह्या मार्गावरून कोणी गेले आहे कां? सुख शांती व आनंदाची प्राप्ती कोणाला झाली आहे का? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘होय’ अशी आहेत. मग अशी व्यक्ती विश्वासार्ह आहे का? होय,

अशी व्यक्ती ज्यांनी अनेक हालअपेष्टा, दुःख, अपमान सहन करून सुद्धा त्यांची शांती ढळली नाही. चित्त विचलित झाले नाही. कायम आनंदाचे डोही आनंद तरंग अशा अवस्थेत राहिले. सन्मान त्यांचे पायी लोळण घेत राहीला. त्यांची समाधी सुद्धा संजीवन झाली. कीर्ती त्रिभुवनात गाजली. देवत्व तर असे प्राप्त झाले की आज शेकडो वर्षानंतर लाखो करोडो लोकांच्या हृदयात भगवंता इतकेच विराजमान आहेत, ते म्हणजे संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज.
ज्ञानेश्वर महाराज ज्या समाजाने त्यांचा, त्यांच्या भावंडांचा अतोनात छळ केला, त्याच समाजाचा विचार करून, समाजाच्या उद्धाराकरिता वेदांचे सार असलेली ‘गीता’ सामान्य माणसाला समजावी म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला.भगवत वचन सोपे करून, ज्ञानाची पाणपोई सुरू केली. आजही सामान्य माणसाला दीपस्तंभासारखा हा ग्रंथ दिशा देतोय. असं सांगतात, खरं तर ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज आपले श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज यांचेकडे समाधीस जाण्याची परवानगी घेण्यासाठी गेले. पण श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जीवनातील अनुभव, चैतन्य शक्तीचे लाभलेले अनुभव त्यांनी ओवीबद्ध केले. अपल्यासारख्या सामान्य माणसाच्या भवरोगावर औषध रूपाने दिले, तेच हे अमृततुल्य औषध म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांचे ‘अमृतानुभव’.

ह्या अमृताचे रसपान करावे व दुःख, अशांती, असमाधान यांपासून मुक्त होऊन खऱ्या आनंदाचे अनुभव घ्यावे.अमृतानुभव ह्या ग्रंथाचा समारोप करतांना माऊली स्वतः म्हणतात
ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत । ते हे अनुभवामृत ।
सेवोनी जीवन्मुक्त । हेचि हेतू ।।

जीवन्मुक्तीचा आनंद ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांनी हा ग्रंथ जरूर वाचावा, अभ्यासावा आणि आचरणात आणावा.
सर्वांत श्रीमंत कोण? ज्याला सुख, शांती, समाधान प्राप्त झाले आहे व आनंदमय झाला आहे. शांतचित्त आनंदकंद श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ” हो! ही श्रीमंती मी अनुभवली आहे. त्यायोगे मी जीवन्मुक्त झालो. माझी अशांती, दुःख दूर गेले. ही शांती आणि आनंदमयता सर्वांना मिळावी म्हणून श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार सर्वांसाठी शब्दरुपी अमृतकुंभ आपणांस देत आहे. तोच हा अमृतानुभव आहे.”


सर्व रोगांचे मूळ एकच आहे, मन आणि त्या मनांत चाललेले असंख्य विचार. हे विचारही स्थिर नाहीत. कधी अतिशय शुद्ध, सात्विक, उच्च तर कधी अतिशय लोभी, हिणकस, दृष्ट, क्रूर ह्या द्वंद्वामुळे आपणास दुःख प्राप्त होते. जीवनातील आनंद निघून जातो. पदरी निराशा येते. आज हजारो बालक, तरुण, वृद्ध सुध्दा नैराश्यात जातात. जीवनातील रस निघून गेल्याप्रमाणे पशुवत जीवन जगतात. तर काहींना आपली जीवन यात्राच संपवावी असे वाटते. ह्या मनाच्या रोगाला अमृता समान असे हे औषध माऊलींनी आपल्यासाठी सिद्ध केले आहे.गीतेच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेला पंथराज माऊलींनी स्वतः अनुभवला आहे. त्याचेच हे अनुभव सिध्द रसायन त्यांनी आपणांस दिले आहे.आपला जीवन स्रोत हा मुळातच चैतन्य आहे, प्राणशक्ती, कुंडलिनी शक्ती, अल्लाकी देन, होलीलाईट कोणत्याही नावाने तिला प्रतिलिपीत करा पण ही सारी त्या एकाच चैतन्यघन परमात्म्याचीच नावं आहेत.


चैतन्य हे सर्व चराचरात व्यापून राहिले आहे. प्रत्येक जिवाच्या ठिकाणी चैतन्य आहेच. हे चैतन्य दृश्य-अदृश्यांत, स्थूल-सूक्ष्मांत सर्वत्र आहे. ते आहे म्हणून ही सृष्टी आहे. म्हणूनच एका अर्थाने आपण त्या एकाच चैतन्याच्या विविध मूर्ती आहोत, चैतन्यमूर्ती आहोत. आपलं अस्तित्व, स्थूल शरीराचे असणे-नसणे हे सुद्धा त्या चैतन्याची एक क्रिया आहे. ह्याच चैतन्याचे वर्णन, थोरपण, त्याचा जीवाशी असलेला संबंध हे सारे वर्णन माऊलींनी ह्या ग्रंथात केले आहे. एक महान योग्याने त्यांच्या अनुभूतीच्या साहाय्याने व श्रीगुरूंच्या प्रेरणेने सामान्य लोकांना दिलेले हे वरदान आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी संपूर्ण मानव जातीवर केलेले फार मोठे उपकार आहेत. काहीसा कर्मकांड, व केवळ चालीरूढी यांवर विशेष भर देणारा समाज त्यावेळी प्रभावी झाला होता. ज्ञान हे केवळ वाचन, तर्क, चर्चा, माहिती असा समज झाला होता पण खरं ज्ञान ह्यापलीकडे असते, ते केवळ श्रीगुरुकृपेने व आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपोआप प्राप्त होते. कालौघात ही अनुभव सिद्ध प्रणाली काहीशी मागे पडत चालली होती. ह्या मार्गाला माऊलींनी पंथराज केले. निर्गुण, निराकार परब्रह्म समजणे अवघड आहे याची जाणीव माऊलींना होती, आणि म्हणूनच अनेक उदाहरणे देऊन अत्यंत क्लिष्ट वाटणारा हा साधा सोपा व प्रभावी आत्मोद्धाराचा मार्ग माऊली येथे विशद करतात. खरं तर हा अनुभव घेण्याचा विषय आहे. शक्तिपात, ध्यानमार्गातील साधकांसाठी हा अतिशय मार्गदर्शक ग्रंथ आहे.
माझे श्रीगुरु प.पु. योगतपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज, ज्यांनी मला व माझ्यासारख्या असंख्य साधकांना हे सुख सिद्धयोगाची दीक्षा देऊन भरभरून प्राप्त करून दिले. शक्तिपात दीक्षा देऊन आनंद काय असतो हे दाखवून दिले. त्यांनीच प्रेरणा दिली म्हणूनच हा अमृतकुंभ आपल्या चरणीं अर्पण करीत आहे. शब्दांत मांडणे अवघड आहे, भाषां प्राचीन मराठी आहे, त्यावर विविध टिकाही उपलब्ध नाहीत. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द व श्रीगुरु काका महाराजांची प्रेरणा ह्यामुळे नक्कीच हे लिखाण आपणांस निरपेक्ष आनंदाची प्राप्ती करून देईल. निरपेक्ष, निरामय आनंदाची प्राप्ती आपणांस व्हावी हीच ह्या संतद्वयांचे चरणीं प्रार्थना.
[19/12, 3:27 pm] प्रमोद कुलकर्णी सार्थ अमृतानुभव सर्व भाग: श्री श्री गुरवे नमः

सिद्धयोग, महायोग म्हणजे काय?
अमृतानुभव ज्यांना घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी सिद्धयोग किंवा महायोग हा अतिशय उत्तम मार्ग आहे. आजकालच्या युगांत आपणांस अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कामाचे स्वरूप बदलत चालले आहे. प्रत्येक माणूस आर्थिक, शारीरिक, सामाजिक, अशा अनेक विवंचनाचा रोज सामना करीत असतो. अनेक पंथ, अनेक उपासना पद्धती, नवनवीन योग यांचा गलबला झाला आहे. अनेकजण आपापला झेंडा घेऊन निघाले आहेत. पण शास्त्रोक्त बिनखर्चाचा, प्रभावी व अनुभवास येईल असा काही तरी उपाय पाहिजे ना? श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी दिलेला, गितोक्त मार्ग म्हणजे महायोग किंवा सिद्धयोग म्हणता येईल. प.प.श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांच्या द्वारे ही योगविद्या आपल्या महाराष्ट्रात सर्वश्रुत झाली. त्यांचे शिष्यद्वय प.पु. योगीराज गुळवणी महाराज व प.पु. योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज यांनी तो संपूर्ण देशात नव्हे विश्वात रूढ केला. ब्रम्हर्षी दत्त महाराज कवीश्वर यांचेही योगदान खूप मोठे आहे. श्री वासुदेव निवास, पुणे व महायोग ट्रस्ट, नासिक येथून हे कार्य अजूनही चालू आहे. प.पु. श्री शरदशास्त्री जोशी महाराज व प्रभुणे महाराज तसेच अन्य दिक्षाधिकारी हा मार्ग लोकांप्रति पोहोचवत आहेत.


काय आहे हा मार्ग ?
हा अतिशय साधा, सोपा, व बिनखर्चाचा मार्ग आहे. श्रीगुरु वचनावर दृढ विश्वास, समर्पणभाव व नित्य साधना अशा अत्यंत सहजसाध्य गोष्टी पाहिजे. साधना म्हणजे डोळे मिटायचे, शरीर अत्यंत ढिले सोडायचे, आपोआप होणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे व जे होतेय ते शांतपणे अनुभवायचे. आपण स्वतः काहीही करायचे नाही. गुरुशक्तीच सर्व काही करेल. अर्थात त्यासाठी श्रीगुरुकृपा ( दीक्षा ) प्राप्तीसाठी योग्य दीक्षा घेतली पाहिजे. अर्थात पूर्वाभ्यास म्हणून घरीच सुरवातीस रोज दिवसातून एकदातरी 9 ते 27 मिनिटे वर सांगितल्याप्रमाणे बसा तुम्हाला उत्तम अनुभव येतो, मन प्रसन्न राहते, चित्त शांत होते, उत्तम विचार येतात.
दीक्षा घेणेही अतिशय सोपे आहे श्रीगुरुंना प्रार्थना करावी ते सांगतील त्यादिवशी, त्यावेळी आपल्याच घरी सुद्धा दीक्षा होऊ शकते. शक्य असेल तर गुरू सानिध्यात दीक्षा घ्यावी. रोज नियमाने साधना करावी व आनंदाची अनुभूती घ्यावी.

अमृतानुभव – ज्ञानदेवांनी आपला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सद्गुरूंच्या चरणी सादर केला. त्यावेळी निवृत्तिनाथांनी त्यांना आपला परमात्मप्राप्तीचा अनुभव शब्दबद्ध करण्याची आज्ञा केली. आपल्या गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी हा आपला अनुभव अमृतानुभवात शब्दबद्ध केला आहे. ज्ञानदेवांनी स्वत: या ग्रंथाचे नाव अनुभावामृत असे दिले आहे. पण अमृतानुभव या नावाने याची प्रसिद्धी आहे.

ज्ञानेश्वरी व आमृतानुभव हे दोन ग्रंथ जरी ज्ञानेश्वरांनीच लिहिले असले तरी या दोन्ही ग्रंथांच्या भूमिका भिन्न आहेत. ज्ञानेश्वरीचा श्रोता हा सामान्य माणूस आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान हे मानवजातीच्या दु:खाचे मूळ आहे. ते अज्ञान ज्ञानाने नाहीसे करून स्वरूपाचे ज्ञान करून देणे यावर ज्ञानेश्वरीचा रोख आहे.
परंतु ज्ञान व अज्ञान या परस्पर सापेक्ष आहेत. या द्वन्द्वाच्या पलिकडे असणारी जी शुद्ध चित्स्वरूप अनुभूती आहे, ते अनुभवरूपी अमृत वाचकांना त्यांनी अमृतानुभवातून दिले आहे.

ज्ञानाच्या भूमिकेवरून लिहिलेला हा सिद्धानुवाद आहे. सदा सिद्ध अशी जी परब्रह्मवस्तु तिच्या विषयीचा ज्ञानी मनुष्याचा अद्वैतानुभव या ग्रंथात सांगितला आहे. ज्ञानदेवांनी स्वत:ही म्हटले आहे की ‘तर्‍ही सिद्धानुवाद । लाहों आवडी करूं’ (१०-१२) ते म्हणतात की ‘नित्यसिद्ध आत्मस्वरूपाचे वर्णन मी आवडीने प्रेमभराने केलेले आहे’. अर्थात एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूप सर्वत्र ओतप्रोत भरलेले आहे, या परब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही, जीवही ब्रह्मस्वरूपच आहे. हा अनुभव त्यांनी या ग्रंथात वर्णिला आहे.

जीव हा नित्य ब्रह्मरूप आहे. हेच परब्रह्म लीलेसाठी स्फूर्तिरूप होऊन अनेकरूप व्हावे म्हणून आपणच शिवशक्ति अशी एकपणातीलच दोन रूपे होऊन जगताची निर्मिती करते. पण दिसणारे हे दोनपण वास्तविक नसून एकमेवाद्वितीय परब्रह्माचीच सत्ता आहे असा एकंदर ह्या ग्रंथाचा विषय आहे.

लेखकाचे मनोगत व परिचय

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय सद्गुरूनाथ योगतपस्वी श्री नारायणकाका महाराज की जय

श्रीगुरूंच्या कृपेने आपण अमृतानुभव या महान ग्रंथाचा व कुट ग्रंथाचा अभ्यास करत आहोत. अर्थात हा अभ्यासपूर्ण आहे परिपूर्ण आहे, असा कोणताही दावा नाही.

कारण की, ज्ञानेश्वर माऊलींचा सारख्या श्रेष्ठ योग्याचे हे अनुभव आहेत आणि त्यांचे अनुभव आपल्यासारख्यांना सहज आकलन होतील असे नाही. त्यामुळेच त्याचा जो काही सद्गुरूंच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आज्ञेने अर्थ लावता आला तो आपल्या पुढे मांडत आहे.

अर्थात हे सर्व करत असताना कोणताही संदर्भ ग्रंथ किंवा अवतरणिका किंवा कोणाची टीका या ग्रंथाबद्दल ती वाचलेली नाही व वाचतही नाही. परंतु मूळ संहिता ही शासकीय वाचनालयातून उपलब्ध करून घेतली व त्यावर आपण आपल्या कुंडलिनी शक्ती मार्गाच्या, शक्तिपात मार्गाच्या अनुषंगाने विवेचन करत आहोत. हे विवेचन आपल्याला आवडावे किंवा त्यातून काही बोध व्हावा ही इच्छा आहे.

आपणास हे योग्य वाटते किंवा नाही हे आपण ठरवावे व आपणास योग्य वाटत नसेल तर त्याचे वाचन थांबवावे. परंतु जर योग्य वाटत असेल तर निश्चित वाचा. त्याबद्दलचे अभिप्राय हे मला कळवा. म्हणजे जर काही आपल्याला अभिप्रेत असलेला बदल असेल किंवा सुधारणा असतील तर त्या मी निश्चितच पुढील अध्यायाच्या अभ्यासामध्ये अंगीकृत करेल. संत वाड्मय वाचण्याचा किंवा त्यांची शिकवणूक अंगिकारण्याचा अधिकार, हा प्रत्येक मानवाला आहे. त्यासाठी कोणताही अधिकार असण्याची किंवा त्यासाठी विशेष असा काही आशीर्वाद असण्याची गरज आहे, असं वाटत नाही.

किंबहुना तो आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणूनच आपण हा अभ्यास करत आहोत. हा अभ्यास आपण सद्गुरु परमपूजनीय योगतपस्वी श्री नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या सांगण्यावरून व त्यांच्या आज्ञेने सुरू केला होता. तो अभ्यास क्रमशः सुरू आहे आणि त्यातलाच काही भाग योग्य वाटला तो आपल्यासमोर ठेवत आहे. अनेकांनी माझ्याकडे याबाबत माझ्या वैयक्तिक माहितीचे विचारणा केलेली आहे म्हणून स्पष्टीकरण देत आहे.


मी प्रमोद कुलकर्णी, औरंगाबाद येथे असतो
1986 साली मला परमपूजनीय काका महाराजांची कृपादीक्षा झाली.
त्यांचा सहवास अंदाजे 1968/1970 पासूनच लाभला होता.
सुमारे 40 वर्षांचा सहवास लाभला व त्याच बरोबर त्यांच्या समवेत अनेक वेळा प्रवास व सामूहिक साधना घडली. त्याच्यातूनच हा जो काही अभ्यास घडला तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काही योग्यता प्राप्त लिखाण झाले असेल तर ती त्यांची कृपा आहे. माझे कर्तृत्व नाही.

श्रीगुरुचरणी समर्पित
प्रमोद कुलकर्णी, औरंगाबाद.
7588811378
श्री श्री गुरवे नमः

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *