सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

76-17
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥ 76 ॥
तर ज्यांचे अंत:करण सात्विक श्रद्धयुक्त असते, त्यांच्या बुद्धीचा ओढा प्रायः स्वर्गादि प्राप्तीकडे असतो. 76
77-17
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकीं ॥ 77 ॥
ते सर्व विद्या शिकतात, यज्ञक्रियेविषयी चर्चा करतात व आपण कोणता करावा हे ठरवितात; किंबहुना, ते देवलोकाला जातात. 77
78-17
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसां । खेचरां हन ॥ 78 ॥
आणि अर्जुना, ज्यांच्या ठिकाणी राजस श्रद्धेचा पगडा आहे ते राक्षस पिशाचादिकांच्या भजनीं लागतात. 78
79-17
श्रद्धां जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं । जे कां केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वें ॥ 79 ॥
आणि तामस श्रद्धेचे जे लोक त्यांचे लक्षण तुला सांगावयाचे तर ते केवळ पापाची राशि, कठोर व निर्घृण (दयाशून्य) असतात. 79
80-17
जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं । स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती जे ॥ 80 ॥
ते प्राणिवध करून बळी देतात आणि स्मशानांत सायंकाळीं भूतप्रेतादि अमंगळ देवतांची पूजा करतात. 80

81-17
ते तमोगुणाचें सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें ॥ 81 ॥
ते तमोगुणचा अर्क काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे माहेरघरच होय. 81
82-17
ऐसी इहीं तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं । पैं हें ययालागीं । सांगतु असें ॥ 82 ॥
अशी या तीन श्रद्धांची तीन चिन्हें ह्या जगांत दिसून येतात; पण तुला अशाकरितां सांगत आहें कीं, 82
83-17
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥ 83 ॥
त्यांतील जी सात्विक श्रद्धा तिचे जतन करून अन्य तद्विरुद्धा ज्या दोन त्यांचा तू त्याग करावा. 83
84-17
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य तें ॥ 84 ॥
अर्जुना, ज्याला अशा सात्विक बुद्धीचे संरक्षण किंवा आधार आहे त्याला ते कैवल्यपद म्हणजे कांहीं बागुलबुवा (कठीण) नव्हे. 84
85-17
तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं ॥ 85 ॥
तो, वेद, ब्रह्मसूत्रादि न पढो, शास्त्रों अवगाहन (चर्चा) न करो, किंवा त्याला शास्त्रसिद्धांत हस्तगत नसोत. 85

86-17
परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥ 86 ॥
परंतु जे श्रेष्ठ विद्वान श्रुतिस्मृतींच्या अर्थाची जणू मूर्तीच बनून त्यांचा अनुष्ठानाचा जगाला कित्ता घालून देतात. 86
87-17
तयांचीं आचरती पाउलें । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे ॥ 87 ॥
त्यांच्या आचरणाच्या पावलावर टाकून जो सात्विक श्रद्धावान् चालतो, त्याला, त्यांना जे फल मिळतें, तेंच फल प्राप्त होतें. 87
88-17
पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लाऊं बैसें । तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा? ॥ 88 ॥
हे पहा, एकाने सर्व सामग्री जमा करून खटपटने दिवा लावला व तेथे दुसरा आयता येऊन बसला, तर प्रकाश काय त्याच्याशी प्रतारणा करील? 88
89-17
कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई? ॥ 89 ॥
किंवा एखाद्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून घर बांधले आणि कोणी वाटसरू तेथे वस्तीस आला तर त्याला त्या घरांतील सुखसोईचा काय भोग घडत नाहीं? 89
90-17
हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी । कीं सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे? ॥ 90 ॥
हें असो; जो तलाव बांधील त्याचीच तेवढी तृषा ते हरण करणार काय? किंवा घरांत सिद्ध झालेले अन्न एका स्वयंपाक्यापुरतेच असते आणि इतरांस नाहीं असें कां होतें? 90

91-17
बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा । येरां समस्तां काय जगां । वोहोळ जाली? ॥ 91 ॥
फार काय सांगावें? गौतमांनीं दीर्घ प्रयत्नांनी आणिलेली गंगा काय त्यांनाच तेवढी गंगा? आणि इतर जगाला ती ओहोळ होते काय? 91
92-17
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥ 92 ॥
म्हणून, स्वतःसाठीच जे दक्षतेनें (कुशलतेने) शास्त्रानुष्ठान करितात,त्यांचे जो श्रद्धाळू जाणून अनुकरण करतो, तो मूर्खही तरून जातो. 92
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥17. 5॥

93-17
ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें । परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंकों नेदिती ॥ 93 ॥
ज्याला आवाजी साफ करण्यासाठी ‘‘ हां हुं”’ वगैरे खाकरावें कसें इतकेच कळत नाही तो गाणार काय? त्याप्रमाणे शास्त्राच्या नांवाने ज्याला स्वतःला काडीचेही ज्ञान नाही, पण कोणी शास्त्रज्ञ आला तर त्याला नुसता थाराही देत नाहीत. 93
94-17
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडितां डाकुलिया । वाजविती ॥ 94 ॥
वडिल माणसांचे आचरणादि पाहून जे त्यांच्या चेष्टा करतात व पंडित कांहीं सांगू लागले तर ते टाळ्या किंवा टिमक्या वाजवितात. 94
95-17
आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें । साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती ॥ 95 ॥
आपल्याच शहाणपणाच्या तोऱ्यात आणि धनाच्या गर्वात जे पाखंडी जनांच्या तपाचा व आचरणाचा आदर करतात. 95

96-17
आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥ 96 ॥
आपल्या समोरील जीवांच्या अंगावर शस्त्र चालवून, रक्तमांसने यज्ञपात्र भरभरून, 96
97-17
रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याच्या तोंडीं । नवसियां देती उंडी । बाळकांची ॥ 97 ॥
जळत्या अग्नीकुडांत आहुति देतात; तसेच चेड्यादि देवतांना आहुति देऊन व नवस करून त्यांच्यापुढे बालकांचे बळी देतात.97
98-17
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवतां वरीया । अन्नत्यागें सातरीया । ठाकती एक ॥ 98 ॥
आग्रहास पेटून क्षुद्र देवतांचा प्रसाद व्हावा म्हणून अन्नत्यागपूर्वक सात दिवस जे स्वतः अनुष्ठान करितात. 98
99-17
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा । पेरिती मग पुढां । तेंचि पिके ॥ 99 ॥
अरे, स्वतःला व अन्याला पीडा देऊन जें बीज तमोरूप भूमींत पेरतात तेच पुढेही पिकास येते. 99
100-17
बाहु नाहीं आपुलिया । आणि नावेतेंही धनंजया । न धरी होय तया । समुद्रीं जैसें ॥ 100 ॥
स्वतःला तरून जाण्यासारखे समर्थ बाहु नांहींत आणि नावे चाही आश्रय करावयास तयार नाही याची सागरांत जी स्थिति होते. 100

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *