सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

101-17
कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां । तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥ 101 ॥
किंवा वैद्याचा द्वेष करून जो औषध लाथेनें उडवितो असा रोगी जसा मरणार जसे निश्चित. 1
102-17
नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे । तें वानवसां आंधळें । जैसें ठाके ॥ 102 ॥
किंवा डोळस माणसाचा द्वेष करून जो स्वतःचेच डोळे फोडून घेतो, तो जसा घरांत आंधळा होऊन बसतो. 2
103-17
तैसें तयां आसुरां होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां ॥ 103 ॥
त्याप्रमाणे, शास्त्रीय मार्गाची निंदा करून स्वैराचाररूपी अरण्यांत जे भटकतात त्या आसुरांची तशी स्थिति होते. 3
104-17
कामु करवी तें करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना मातें पुरिती । दुःखाचा गुंडां ॥ 104 ॥
इच्छेस येईल ते करतात, ज्यावर क्रुद्ध होतील त्याला मारतात किंबहुना नसती पीडा म्हणून माझी मूर्तीही गाडून टाकतात.4
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥17. 6॥

105-17
आपुलां परावां देहीं । दुःख देती जें जें कांहीं । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥ 105 ॥
स्वतःच्या व दुसऱ्याच्या देहाला ते ह्याप्रमाणे जी पीडा करितात, ती सर्व सर्वांतर्यामीं जो मी, त्या मलाच होते. 5

106-17
पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें । परी पडिलें सांगावें । त्यजावया ॥ 106 ॥
ह्या पाप्यांच्या वर्णनाने वाणी विटाळणेही बरें नव्हे; पण, त्यांचा त्याग करावा हे सांगण्यासाठी वर्णन करावें लागले. 6
107-17
प्रेत बाहिरें घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे । हें असो हातें क्षाळिजे । कश्मलातें? ॥ 107 ॥
प्रेत घराबाहेर काढावें लागतें, ‘दूर हो’ असें बोलूनच अंत्यजापाशीं भाषण टाळावें लागतें किंवा घाण ही हातनेच धुवून टाकावी लागते. 7
108-17
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा ॥ 108 ॥
येथे शुद्धतेचा हेतु असल्यामुळे ह्या अमंगल गोष्टी केल्या असे जसे कोणी समजत नाही, म्हणून त्यांच्या त्यागार्थ केलेला अनुवाद (वर्णन) दूषणीय म्हणतां येत नाही. 8
109-17
परी अर्जुना तूं तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें । जे आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना ॥ 109 ॥
तर अर्जुना, तुला त्यांचे दर्शन झाले (असुर=तामस) तर माझे स्मरण करत जा; येथे दुसरें प्रायश्चित्त कामाचे नाही. 9
110-17
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पैं येकी । जतन करावी निकी । सर्वांपरी ॥ 110 ॥
तरी जी एक सात्विक श्रद्धा तिचेच इतःपर दक्षतेने सर्वांच्यावर जतन करावें. 110

111-17
तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपें ॥ 111 ॥
म्हणून ज्यायोगे सत्वबुद्धीची वाढ होईल असाच संग धरावा आणि आहारही सत्वाची वृद्धि करील असाच सेवन करावा. 11
112-17
एऱ्हवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीच्या ठाईं । आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु ॥ 112 ॥
अरे, पाहू गेले तर स्वभावामध्ये पालट अगर वृद्धि व्हावी अशी इच्छा असेल तर त्याला आहारावांचून अन्य बलवान हेतु नाहीं. 12
113-17
प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणीं ॥ 113 ॥
ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, शुद्धीवर असलेला जो मनुष्य त्याने दारूचे सेवन केले तर तो तत्क्षणीं माजून बरळतो. 13
114-17
कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक? ॥ 114 ॥
किंवा जो मर्यादेबाहेर अन्नसेवन करतो त्याला वात व कफ ह्यांचा विकार होतो किंवा ज्वर आला असतां दुधाच्या सेवनाने तो निघेल काय? 14
115-17
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । कां आपुलिया{ऐ}सें करी । जैसें विष ॥ 115 ॥
नाहीतर, अमृतसेवनाने जसें मरण टळते, किंवा विष घेतले असतां त्याने मृत्यु येतो. 15

116-17
तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥ 116 ॥
त्याप्रमाणे जसा किंवा ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारची धातु शरीरांत उत्पन्न होते व जशी धातु असेल त्याप्रमाणे अंतःकरणाचा (मनाचा) स्वभाव पोसला जातो. 16
117-17
जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे । तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती ॥ 117 ॥
भांडे तापलें म्हणजे आंतलें उदकही जसें तापते, त्याप्रमाणे धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ति बनत असते. 17
118-17
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तैं सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसीं ॥ 118 ॥
म्हणून सात्विक अन्नसेवनाने सत्वगुणाची व दुसऱ्या दोन जातीच्या अन्नानें रजोगुण व तमोगुण ह्यांची वाढ होते. 18
119-17
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हें सांगों करीं आदरु । आकर्णनीं ॥ 119 ॥
तरी, कोणता आहार सात्विक आहे, राजस व तामस आहाराचे स्वरूप अगर लक्षण काय ते सांगतों, नीट श्रवण कर. 19
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥ 17.7॥

120-17
आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडें दाऊं ॥ 120 ॥
आणि अर्जुना, सामान्य अन्नाचे तीन प्रकार (सत्व, रज, तम) कसे झाले ते स्पष्ट करून दाखवितों. 120

121-17
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची । आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ ॥ 121 ॥
हें पहा, भोक्त्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार होत असते आणि भोक्ता तर, गुणांचा ताबेदार आहेच. 21
122-17
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनियां त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥ 122 ॥
कर्ता भोक्ता जो जीव, तो स्वभावतःच तीन गुणांप्रमाणे तीन प्रकारचा व्यवहार करीत असतो. 22
123-17
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥ 123 ॥
म्हणून आहार तीन प्रकारचा आहे; यज्ञही तीन प्रकारचे आहेत व तप, दान व इतर क्रियाही तीन प्रकारच्या आहेत. 23
124-17
पैं आहार लक्षण पहिले? । सांगों जें म्हणितलें । तें आईक गा भलें । रूप करूं ॥ 124 ॥
परंतु आधीं प्रथम सांगितलेल्या आहाराचे लक्षण सांगतों, ते नीट श्रवण कर. 24
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥17. 8॥

125-17
तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे । तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ॥ 125 ॥
तरी, दैवयोगानें, जेव्हां भोक्ता सत्वगुणी असतो तेव्हां, मिष्टान्न सेवनाकडे त्याचा विशेष ओढा असतो. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *