सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १ ते २५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ सप्तदशोऽध्यायः अध्याय सतरावा ॥ श्रद्धात्रयविभागयोग ॥
अध्याय सतरावा
काम चालू आहे,, ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा । । । श्रद्धात्रयविभागयोगः ।

1-17
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ 1 ॥
ज्या जीवांवर तुझ्या स्वरूपसमाधीचा प्रसाद होत नाही त्यास हे चराचर विश्व सत्य वाटते, असें सर्व गणाधीशरूप श्रीगुरुराया जे तुम्ही, त्या तुम्हांस प्रणाम असोत. 1
2-17
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला । तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥ 2 ॥
श्रीशंकर त्रिपुरासुराचा वध तुझ्या स्मरणानंतरच करू शकले, त्याप्रमाणे, त्रिगुणात्मक मायारूप असुराने वेढलेला जीवदशेमध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर तो ह्या संकटांतून गणाधीश, जो तू, त्या तुझ्या स्मरणानें मुक्त झाला. 2
3-17
म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा । तऱ्ही हळु मायाजळा- । माजीं तारूनि ॥ 3 ॥
आपल्या स्मरणाने आत्मशंभूतें माया त्रिपुराचा वध केला असल्यामुळे तुलनेने आपण (गुरुत्वांत) शंकरापेक्षांही श्रेष्ठ असून, जीवांस मायानदींतून पैलतीरावर नेणारे म्हणून नौके पेक्षांही हलके आहां.3
4-17
जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥ 4 ॥
ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही त्यांना तुं वक्रतुंड आहेस असे वाटते, पण तत्त्ववेत्यांन तू सदैव उजु अथवा समच आहेस. 4
5-17
दैविकी दिठी पाहतां सानी । तऱ्ही मीलनोन्मीलनीं । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥ 5 ॥
हे गुरु गणपते, आपली दृष्टि (नेत्र) स्वभावतःच लहान आहे खरी, पण त्यांच्या मीलनोन्मीलनाने (उघडझांपीनें) जगाचा उत्पत्ति प्रलयादि व्यवहार सहज व्हावा असें तिचे सामर्थ्य आहे.5

6-17
प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं । पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या ॥ 6 ॥
आपल्या प्रवृत्तिरूप कर्णाच्या चलनातें गंडस्थलांतून वाहणाऱ्या मदाचा सुगंध आसमंतात पसरून, त्यायोगें जीवरूपी नील भ्रमर तेथें जमा होतात व जणू कांहीं नीलकमलांनीच आपले पूजन केल्याप्रमाणे आपण शोभतां. 6
7-17
पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ॥ 7 ॥
मागाहून निवृत्तिरूप कर्णाच्या गतीने ती बांधलेली पूजा उधळून गेली (अंतर्मुखता आली) म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन होतें. 7
8-17
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ॥ 8 ॥
आपली वामांगा सरस्वती (आदिमाया) तिचा नृत्यविलासाचा प्रभाव, तोच हा जगदाभास होय; व ते तांडवकौशल्य प्रकाशन तुम्ही करितां. (तुमच्या प्रकाशानें होतें) 8
9-17
हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥ 9 ॥
हें असो; दयाळा, आपला दुसरा चमत्कार काय सांगावा? कीं, तुझ्याशी सोयरीक जोडतो तो सोयरिकीच्या व्यवहारांतून कायमचा मुक्त होतो. ( त्वद्रूप होतो, भिन्नत्वाने उरत नाही.) 9
10-17
फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो । धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं ॥ 10 ॥
बंधनांतून मुक्त करणारे असे जगद्बंधु आपण आहां, ह्या भावनेने जो तुला शरण येऊ पहातो (त्याच्या ठिकाणी तुझ्याच आनंदाचा आविर्भाव होतो). 10

11-17
तंव दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया । जेणें तूं आपणपयां । केलासि दुजा ॥ 11 ॥
त्या योगे, हे गुरुराया, ज्या देहामुळे मी एक व तू एक असा दैतव्यवहार सिद्ध होतो तो त्याचा देहच (देहात्मभावच) आपण दुजेपणानें उरू देत नाही. (देहबुद्धि बाधित होते) 11
12-17
तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे । तयां ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ॥ 12 ॥
तुला दृश्य विषय मानून जे तुझ्या दर्शनार्थ अनेक प्रकारचे उपाय योजून धांवाधाव करितात, त्यांच्या तर तू प्रायः मागेच असतोस. ( त्यांना तुझे दर्शन होतच नाहीं ) 12
13-17
जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं । ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज ॥ 13 ॥
जे ध्यान करून तुला चित्तांत आणू पहातात, त्यांन तर तुझा पत्ताच लागत नाहीं; उलट ध्यानासह ज्यांना देहबुद्धीचा विसर पडतो ते तुला फार प्रिय असतात. 13
14-17
तूतें सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणें । वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं ॥ 14 ॥
ज्याची सिद्धि केली जावी असा तू नसून तू स्वतःसिद्ध आहेस हें न जाणतांही जो वेद सर्वज्ञ म्हणून गणला जातो त्याने (वेदानें ) केलेले एवढे मोठे वर्णनही तुम्ही कानावर घेत नाही. 14
15-17
मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव । दिसती तेतुली माव । भजों काई ॥ 15 ॥
पत्रिकेवरून “मौन” हें तुझी राशिनाम आहे, मग अशा वस्तूची स्तुति करण्याची कां हांव धरावी? शिवाय जेवढे म्हणून दृश्यजात आहे ही आपली माया होय; मग भजावें तरी कसे? 15


16-17
दैविकें सेवकु हों पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों । म्हणौनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी ॥ 16 ॥
तुम्हाला सेव्य मानून सेवक होऊं असें म्हणावें तरी ह्या भेदभावनेने मी एकप्रकारें द्रोहीच ठरेन, म्हणून “तुझा मी अमुक” असें नातें लावण्याच्या भानगडत न पडणेच बरें. (त्वद्रूप होणें उत्तम) 16
17-17
जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे । हें जाणें मी वर्म तुझें । आराध्य लिंगा ॥ 17 ॥
हे आराध्य गुरुराज ह्या सर्व दृश्याचा तत्त्वतः मजपाशीं कांहीही संबंध नाहीं असें जेव्हां मी पूर्णपणे जाणेन तेव्हांच मला आपल्या अद्वयस्वरूपाचा लाभ होईल हे आपल्या स्वरूपाचे वर्म मी ओळखतों. 17
18-17
तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण । तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों ॥ 18 ॥
तरी दुजेपणानें न राहतां मीठ जलाशी जसें एकरूप होते त्याचप्रमाणे तुला खरे नमन करणे म्हणजे तुझ्या स्वरूपाहून भिन्नत्वें न उरणें हे होय; मी आणखी काय बोलावें? 18
19-17
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ॥ 19 ॥
असे पहा कीं, रिकामा कुंभ समुद्रांत बुडविला असतां जसा भरून बाहेर येतो किंवा सुताची दशी ही दीपसंगानं दीपत्व पावते. 19
20-17
तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती । आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ॥ 20 ॥
त्याप्रमाणे हे निवृत्तिनाथ श्रीगुरुराया, तुम्हाला प्रणाम केल्याने माझे अपूर्णत्व फिटलें; ( मी पूर्ण झालों ) आतां गीतार्थ स्पष्टपणे मांडतों. 20

21-17
तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीच्या श्लोकीं । जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें ॥ 21 ॥
तरी षोडशाध्यायाच्या अखेरच्या श्लोकांत देवांनीं जो असा असंदिग्ध निर्णय दिला आहे; 21
22-17
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥ 22 ॥
कीं अर्जुना, कर्तव्य काय किंवा अकर्तव्य कोणतें हे जाणणें तर शास्त्रप्रामाण्यावरूनच ती व्यवस्था तू ठरविली पाहिजे. 22
23-17
तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें । जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ॥ 23 ॥
तेव्हां अर्जुन मनांत म्हणतो, कर्मालाही शास्त्रावांचून सुटका नसावी असें कां असावें? 23
24-17
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे । कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये? ॥ 24 ॥
पण सर्वांच्या फणेला हात घालून त्यावरील मणि काढणार कसा? किंवा सिंहाच्या नाकांतील केंस कोणी उपटून आणू शकतो काय? 24
25-17
मग तेणें तो वोंविजे । तरीच लेणें पाविजे । एऱ्हवीं काय असिजे । रिक्तकंठीं? ॥ 25 ॥
पण, हे घडेल तेव्हां त्या केसांत तो मणि ओवून मगच तें भूषण गळ्यात घालावें आणि एऱ्हवी गळा काय रिकामा ठेवावा? 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *