सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १२६ ते १५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

126-17
आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥ 126 ॥
जे पदार्थ अंगानेच उत्तम रसभरित, गोड बव्हंशीं स्निग्ध, आणि सुपक्व असतात. 26
127-17
आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें जियें ॥ 127 ॥
जे आकाराने अवजड नसतात, स्पर्शाला मऊ असतात, जिभेला स्निग्ध रुचीचे असून जे स्वादिष्ट असतात. 27
128-17
रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं । ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें ॥ 128 ॥
रसयुक्त वरून मऊ, पाणीदार (सुकलेली नव्हेत) व अग्नितापादिकांनीं कसलेली नव्हेत. 28
129-17
आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु । तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ॥ 129 ॥
गुरूपदेशाचीं अक्षरे थोडी असली तरी अर्थ फार थोर असतो, तसा जो आहार आकाराने स्वल्प, पण परिणामाच्या दृष्टीने थोर असून ज्याचे अल्प सेवन करूनही तृप्ति टिकून असते. 29
130-17
आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नीं प्रीति वाढे । सात्त्विकांसी ॥ 130 ॥
आणि जें रुचीने गोड तसेच परिणामानेही गोड अशा अन्नाविषयीं सात्विक जीवाचे प्रेम असतें. 130

131-17
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचें त्राण । नीच नवें हें ॥ 131 ॥
सात्विक अन्नाचे लक्षण असे असते; ह्याच्या सेवनाने नित्य आयुष्यवर्धन होत असते. 31
132-17
येणें सात्त्विक रसें । जंव देहीं मेहो वरीषे । तंव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥ 132 ॥
अशा सात्विक अन्नांचा वर्षाव देहावर होत असतां दिवसेंदिवस त्या देहाच्या आयुष्य नदीला पूर येतो. 32
133-17
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥ 133 ॥
दिवसाच्या वृद्धीला जसा सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्ववृद्धीस व रक्षणास हाच आहार कारण आहे. 33
134-17
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा । हा आहारु तरी दशा । कैंची रोगां ॥ 134 ॥
आणि शरीराला व मनाला बल अर्पण करणाऱ्या ह्या आहाराचा आश्रय असल्यावर तेथे रोगाचा प्रवेश कसा होणार? 34
135-17
हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयलें जाणो ॥ 135 ॥
असा सात्विक आहार भोग्य म्हणून प्राप्त असेल तरच आरोग्याच भोग घडण्याचे शरीराचे भाग्य उदयाला आले आहे असे म्हणावें. 35

136-17
आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें । हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं ॥ 136 ॥
आणि त्याचे सर्व व्यापार या आहाराने सुखमय होतात; फार काय सांगावें? त्याची वृत्ति सदा आनंदी असते. 36
137-17
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥ 137 ॥
-ह्याप्रमाणे सात्विक आहाराचा फार थोर परिणाम असून तो अंतर्बाह्य सर्वप्रकारें उपकारक आहे. 37
138-17
आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी । करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा ॥ 138 ॥
आतां प्रसंगवशांत ज्या रसांची राजस वृत्तीच्या माणसाला आवड असते त्याचेही वर्णन करू.38
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ 17.9॥

139-17
तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट । कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥ 139 ॥
फक्त मरण आणीत नाही इतकेच काय तें कमी; बाकी कडूपणाला काळकूट विषासारखे; चुन्याहून दाह करणारे जे आंबट असते. 39
140-17
कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥ 140 ॥
कणीक भिजविण्यास लागणाऱ्या पाण्याच्या बरोबरीने आंत मीठ व अन्य खारट तुरट रस मिळविणे.140

141-17
ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी ॥ 141 ॥
असे अत्यंत खारट पदार्थ राजस प्रकृतीच्या पुरुषाला आवडतात व तो इतके कढत पदार्थ सेवन करितो की, तोंडाने जणु अग्नीच गिळतो ! 41
142-17
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसें उन्ह मागे । राजसु तो ॥ 1142 ॥
त्या पदार्थातून निघणाऱ्या वाफांवर जणु दिव्याची वातही पेटवित येईल असे उष्ण पदार्थ तो मागत असतो. 42
143-17
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसें तीख तो खाये । जें घायेविण रुपे ॥ 143 ॥
वावटळीपेक्षांही तुफान उडविणारें व प्रहार करील असें तिखट तो खातो कीं, ज्याने प्रत्यक्ष घावाशिवाय जणु जखम झाली आहे असे वाटावें. 43
144-17
आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥ 144 ॥
आणि आंत बाहेर सारखे कोरडे व रूक्ष असें तोंडी लावणे त्याला फार आवडतें. 44
145-17
परस्परें दांतां । आदळु होय खातां । तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे ॥ 145 ॥
जे पदार्थ खाऊ गेले असतां दांतावर दांत आदळावे असे कडक पदार्थ खाण्यांत त्याला संतोष वाटतो. 45

146-17
आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी । जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें ॥ 146 ॥
जातीनेच पदार्थ झणझणीत, त्यांत वर मोहरीसारखी फोडणी कीं, जी खातांना नाकातोंडांतून श्वास अगर शिंका येतात. 46
147-17
हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें । पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ॥ 147 ॥
हे असो; आगीलाही मागे टाकणारें असें सणसणीत रायतें त्या राजसाला प्राणापेक्षां आवडतें. 47
148-17
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषें अग्नि भडभडां । पोटीं भरी ॥ 148 ॥
ज्याची कितीही भक्षण केले तरी तृप्ति होत नाहीं असा जिभेचा वेडा झालेला मनुष्य, अन्नाच्या मिषाने जणू पोटांत अग्नीच सांठवितो. 48
149-17
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुईं गा सेजे खाटे । पाणियाचें न सुटे । तोंडोनि पात्र ॥ 149 ॥
त्याचप्रमाणे लवंगा, सुंठ वगैरे खाऊन भुईवर अंथरुणावर किंवा खाटेवर जो लोळतो व तोंडापुढील पाण्याचे भांडे दूर करीत नाही. 49
150-17
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातलें । माजवण पोटीं ॥ 150 ॥
तो त्यांनीं आहार केला असें न म्हणतां शरीरांत सुप्त असलेले रोगरूपी सर्प जागे करण्यासाठीं पोटांत जणू माजोरी पदाथच भरले आहेत. 150

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *