सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

401-16
आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें । तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं ॥ 401 ॥
आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यांस छळतात) 1
402-16
सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥ 402 ॥
सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक तपी असे संन्यासी जे असतील. 2
403-16
कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें । निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं ॥ 403 ॥
किंवा भक्त आणि महात्मे, हीं माझी श्रौतादि यज्ञयागानें शुद्ध झालेलीं निवास संस्थानेच होत.3
404-16
तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें । कुबोलांचीं सदटें । सूति कांडें ॥ 404 ॥
अशा पवित्र जनांवर व्देषरूपी कालकूट विषाचे जे तीक्ष्ण वाग्बाण, यांचा वर्षाव करितात. 4
तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ 16.19॥

405-16
ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां ॥ 405 ॥
याप्रकारें जे सर्व प्रकारांनीं मजपाशी वैर करण्यास प्रवृत्त होतात, त्या पाप्याना मी जें शासन करितों, तो ऐक. 5

406-16
तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं ॥ 406 ॥
तरी, जगात मनुष्याच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्ये मात्र करीत नाहीत, त्यांचा तों देह हरण करून अशा स्थितीत ठेवितों, 6
407-16
जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा । ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें ॥ 407 ॥
क जी योनि अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरणरूप यातनेची पायवाट असून अंधकारमय (अज्ञानरूप) असते तशी योनि त्यांना देतों. 7
408-16
मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं ॥ 408 ॥
मग क्षुधा लागली तर गवतही उपयोगी पडू नये अशा व्याघ्र वृश्चिकादि जातींचा त्यांस अरण्यांत जन्म देतों. 8
409-16
तेथ क्षुधादुःखें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें । मरमरों मागुतें । होतचि असती ॥ 409 ॥
तेथें अत्यंत क्षुधित झाले असतां, आपल्याच शरीराचे लचके तोडून खाण्याची पाळी येते आणि मरून पुनःपुनः त्याच योनीत जन्म घेतात. 9
410-16
कां आपुला गरळजाळीं । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला ॥ 410 ॥
किंवा ज्याचा आपल्या विषाच्याच दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो अशा सर्पयोनींत घालून त्यास बिळांत कोंडून ठेवितों. 410

411-16
परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें । विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी ॥ 411 ॥
परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका थोडा वेळ लागतो तितकीही मी त्यांस विश्रांति लाभू देत नाही. 11
412-16
ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तयां ॥ 412 ॥
अशा अगणित कल्पांच्या कोडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यांस त्या योनींतून बाहेर काढीत नाही. 12
413-16
तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हें पहिलें पेणें । तें पावोनि येरें दारुणें । न होती दुःखें ॥ 413 ॥
तरी त्यांना पुढे जेथे जावयाचे आहे त्यांतील हा पहिला मुक्काम होय; तर मग त्यापुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय? 13
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥16. 20॥

414-16
हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारीं । जोडिली तिहीं ॥ 414 ॥
त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होत असते हे लक्ष्यांत ठेव.14
415-16
पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥ 415 ॥
पण, व्याघ्रादि तामस योनींमध्येही देहाच्या आधाराने त्यांस अधूनमधून तरी थोडी विश्रांति मिळते. 15

416-16
तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें । जेथे गेलें आंधारें । काळवंडैजे ॥ 416 ॥
तेवढी थोडी विश्रांतीही हिरावून घेऊन जेणें अंधारही काळिमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवल तमोरूप योनीमध्ये मी त्यांना घालतों. 16
417-16
जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणें जेणें ॥ 417 ॥
ज्या तमोयोनीचा पापालाही किळस येतो किंवा नरकही जिला भितो, किंवा जेथे श्रमही श्रमून मूर्च्छित होतो. 17
418-16
मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे । जयाचेनि नांवें सळे । महाभय ॥ 418 ॥
जेथे मलही मलिन होतो, तपालाही ताप होतो, किंवा ज्या योनीचे नुसतें नांव घेतले असतां महाभयही भयभीत होते. 18
419-16
पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥ 419 ॥
जेथे पापही कंटाळतें, अमंगलव देखील अमंगल होतें व विटाळही आपण विटाळू अशी भीत बाळगतो. 19
420-16
ऐसें विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । तें ते होती भोगूनियां । तामसा योनी ॥ 420 ॥
अर्जुना, साऱ्या विश्वांत अधमांतील अधम अशी जी ही तामस योनी तिच्यांत त्यांची अशा भोगांनी अशी दुर्दशा होते. 420

421-16
अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे । कटारे मूर्खीं केवढे । जोडिले निरय ॥ 421 ॥
तिचे वर्णन करितांना वाणीला कष्ट होतात, मन कच खाते आणि असे वाटते की केवढा रे घोर अनर्थ ह्यांनी ओढवून घेतला ! 21
422-16
कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधलें घोर । पतन ऐसें ॥ 422 ॥
जिच्यामुळे असा घोर पतनप्रसंग प्राप्त होतो ती आसुरी संपत्ति हे मूर्ख कशाला रे अशी वाढवितात असे वाटू लागले. 22
423-16
म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥ 423 ॥
म्हणून, अर्जुना, तू त्या संपत्तीकडे किंवा जेथे आसुरी संपत्तिमान वास करतात त्या योनीकडे नुसतें ढुंकूनही पाहू नको. की त्यांचे नांवही घेऊ नको. 23
424-16
आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं । ते त्यजावे हें काई । म्हणों कीर? ॥ 424 ॥
मग, दंभादि सहा दोषांची खाण जी आसुरी संपत्ति तिच तू त्याग कर, हे काय निराळे सांगावयाची आवश्यकता आहे? 24
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥16. 21॥

425-16
परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब । थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण ॥ 425 ॥
परंतु, काम, क्रोध आणि लोभ ह्यांच्या एकीचा वृक्ष जेथे जोरावतो जेथे शुभफलनिष्पत्ति होत असते हे लक्षांत असू दे. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *