सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

201-17
आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं । तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय ॥201॥
आतां या तीहींतील प्रथम शारीर तप कोणतें तें ऐक; त्या तपस्व्याचे उपास्य शंकर असो किंवा विष्णू असो. 1
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥17a14॥

202-17
तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया । आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥ 202 ॥
त्या आपापल्या प्रिय देवतांच्या दर्शनार्थं अगर त्यांच्या यात्रादिकांसाठी, आठही प्रहर जणू त्याच्या पायांत भोंवरे बांधले आहेत. (जो सारख्या यात्रा करीत राहतो) 2
203-17
देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां । करावया म्हणियां । शोभती हात ॥ 203 ॥
देऊळ वाडा स्वच्छ ठेवून व सुशोभित करून, पूजासाहित्य व अलंकारादि पुरवून तसेच देवसेवा करून ज्याचे हात शोभत आहेत. 3
204-17
लिंग कां प्रतिमा दिठी । देखतखेंवों अंगेष्टी । लोटिजे कां काठी । पडली जैसी ॥ 204 ॥
शिवलिंग किंवा विष्णुमूर्ती ह्यांचे दर्शन होतांच जो दंडायमान भूमीवर साष्टांग नमस्कार घालतो. 4
205-17
आणि विधिविनयादिकीं । गुणीं वडील जे लोकीं । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥ 205 ॥
आणि विधिपालनाने वा विनयादिकानें गांवांत जे कोणी श्रेष्ठ ब्राह्मण असतील त्यांची जो सेवा करितो. 5

206-17
अथवा प्रवासें कां पीडा । का शिणले जे सांकडां । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥ 206 ॥
अथवा प्रवासादिक किंवा अन्यपीडेने संकटांत असलेले जे कोणी, त्यांची सुखसोय अथवा लावतो. 6
207-17
सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें । तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ॥ 207 ॥
अथवा सकल तीर्थाचे तीर्थ जी मातापितरे त्यांच्या, जो सेवेपुढे आपले शरीरही तुच्छ लेखण्याची ज्याची तयारी आहे.7
208-17
आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ॥ 208 ॥
आणि संसारासारखा घोर शीण हरण करणारे व ज्ञानदानाविषयी सदैव सकरुण असलेले जे श्रीगुरु त्यांची जो सेवा करितो. 8
209-17
आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥ 209 ॥
आणि अर्जुना, जडदेहाभिमानरूपीं जें बुद्धीवर कीट आलेले आहे तें झडून जावें म्हणून जो नित्य स्वधर्माचरणावृत्तिरूप अग्नीचा त्याला ताव देतो. 9
210-17
वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे । स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ॥ 210 ॥
सर्वांतर्यामी एकच परमात्मा आहे ह्या बुद्धीनें जो भूतमात्राच्या ठिकाणीं लीन असतो, नित्य परोपकाररत असतो, आणि स्त्रीविषयींची गोष्टही ऐकणेस जो तयार नसतो. 210

211-17
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें । तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे ॥ 211 ॥
जन्माच्या वेळीं जो मातेच्या देहाच स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्रीजातीचा स्पर्श; तेथून पुढे त्या विषयासंबंधी शरीर आजन्म सोंवळे आहे.11
212–17
भुतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥ 212 ॥
गवतालाही जीव आहे म्हणून तेंही उपटू नये, किंवा अन्य छेदक वा भेदक कायिक वाचिक क्रिया जो टाळतो. 12
213-17
ऐसैसी जैं शरीरीं । रहाटीची पडे उजरी । तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ॥ 213 ॥
असे वागण्याचे जे शरीराला सहज वळण पडलेले असतें तें मूर्त अथवा खरें शारीर तप असे समज. 13
214-17
पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें । म्हणौनि ययातें मी म्हणें । शारीर तप ॥ 214 ॥
अर्जुना, ह्याला शारीर तप म्हणण्याचे कारण असे की ह्या सर्व क्रिया देहाच्या आश्रयाने होत असतात. 14
215-17
एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप । आतां आइक निष्पाप । वाङ्मय तें ॥ 215 ॥
ह्याप्रमाणे शारीरतपाचे लक्षण सांगितले; आतां निष्पाप वाणीचे तप कोणतें तें ऐक. 15
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ 17.15॥

216-17
तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परीसें तेणें ॥ 216 ॥
परिस हा लोखंडाचा आकार, वजन वगैरे कशालाही न्यूनता न आणितां जसे याचे सुवर्ण करितो. 16
217-17
तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥ 217 ॥
शेजाऱ्याला अगर जवळ येणाराला न दुखवितां त्याला सुख होईल अशी ज्याच्या भाषणांत साधुता दिसेल. 17
218-17
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेंचि जियें । तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ॥ 218 ॥
पाणी झाडांना म्हणून दिले जाते, पण, याच्या ओलाव्यावर गवत सहजच बाढते, त्याप्रमाणे एकापाशीं केलेले भाषण सर्वांना हितकर असतें. 18
219-17
जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी । स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे ॥ 219 ॥
अमृतगंगा प्राप्त झाली तर अमरत्व येते, स्नानाने पाप व ताप जातात व प्राशनालाही गोड असतें. 19
220-17
तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे । आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी ॥ 220 ॥
त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरच्या भाषणाने अज्ञान नाहीसे होते, आत्मस्वरूपदर्शन (अनादित्व) होते आणि ते ऐकत असतां, जसा अमृताचा वीट येत नाही तसा कधीं वीटही येत नाही. 220

221-17
जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें । नातरी अवर्तणें । निगमु का नाम ॥ 221 ॥
जर कोणी कांहीं प्रश्न केला तर भाषणाचा हा प्रकार असतो नाहींतर स्वाध्याय (वेदपाठ) अथवा हरिस्मरण चालू असते. 21
222-17
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥ 222 ॥
ऋग्वेदादि तिन्ही वेदांची वाग्मंदिरांत प्रतिष्ठा करून वदन म्हणजे जणु ब्रह्मशाळाच बनवितात! 22
223-17
ना तरी एकाधें नांव । तेंचि शैव का वैष्णव । वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ॥ 223 ॥
किंवा, शिव अथवा विष्णु ह्यांपैकी एकाद्या देवतेचे नांव मुखांत सारखे असते, तेंच वाचिक तप होय. 23
224-17
आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥ 224 ॥
लोकनाथ नायक भगवान म्हणाले, आतां मानसिक तप कथन करितों, तेंही ऐक. 24
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ 17.16॥

225-17
तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं । का चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें ॥ 225 ॥
तरी तरंगावांचून सरोवर, अभ्रांवांचून आकाश अथवा सर्पावांचून चंदनवन अथवा उद्यान. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *