संत ज्ञानेश्वर व नाथ संप्रदाय एक दृष्टिक्षेप

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🎄🔴🎄

२) ज्ञानदेवांचा नाथसंप्रदाय

ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. फार पूर्वी त्रिपुरारी शंकरानी पार्वतीच्या कानात उपदेश केला. तो मत्स्याच्या पोटात असलेल्या विष्णूने म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी ऐकला व ते ज्ञानसंपन्न झाले. मत्स्येंद्रनाथ संचार करत सप्तशृंगी गडावर आले. तेथे हातपाय तुटलेले चौरंगीनाथ त्यांना भेटले. मत्स्येंद्रनाथांनी चौरंगीनाथांना उपदेश केला. मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर, असे जे गोरक्षनाथ, त्यांनाही समाधिपदाचे ठिकाणी अभिषेक केला. मग गोरक्ष नाथांनी ते शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य, सामर्थ्यासह श्रीगहिनीनाथास दिले.

कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना आज्ञा दिली ती अशी की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्यपरंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळाल्या जाणार्‍या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर. मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टि करतात, त्याप्रमाणे स्वभावत: कृपाळू असलेल्या श्रीनिवृत्तिनाथांना गहिनीनाथांचा उपदेश मिळाला व त्यावर गुरुआज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित प्राण्यांच्या (दयेने, गीतेचा अर्थ) जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तिनाथांकडून ही जी शांतरसाची वृष्टि झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. असे ज्ञानदेव म्हणतात.

यावरून ज्ञानदेवांची गुरुपरंपरा अशी दिसून येते –
आदिनाथ शंकर – मत्स्येंद्रनाथ – गोरक्षनाथ – गहिनीनाथ – निवृत्तिनाथ – ज्ञानदेव.

ज्ञानदेवांच्या आधीही ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला होता. तसेच आजे गोविंदपंत व आजी नीराबाई यांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालेला होता.

ज्ञानदेवांच्या पित्याला श्रीपादस्वामींचा (किंवा रामानंद यांचा) अनुग्रह झालेला होता. मग पित्याची गुरुपरंपरा सोडून ह्या चार भावंडांनी नाथपंथात का प्रवेश केला असावा ? असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात की मातापित्यांनी जलसमाधी घेतल्यामुळे पित्याकडून परंपराप्राप्त अनुग्रह मिळण्य़ाचा त्यांचा मार्ग बंद झाला. संन्याशाची मुले म्हणून समाजाने या भवंडांना वाळीत टाकले होते. आता आपली मुंजच झाली नाही तर आपल्याला द्विज कोण म्हणणार ? ब्राह्मणत्वापासून पतित होण्याची परिस्थिती निर्माण झाली. समाजात तर चातुर्वर्ण्य व्यवस्था दृढमूल झालेली होती. आता ज्ञान, भक्ति, वैराग्य ही मोक्षप्राप्तीची सर्व साधने जवळ असून सुद्धा दीक्षामंत्राच्या आधाराशिवाय त्या साधनांचा काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता. नाथपंथामधे चातुर्वर्ण्याची आडकाठी नव्हती. शिवाय ज्ञानदेवांच्या आजोबांना व पणजोबांना नाथपंथाची दीक्षा मिळालेली होती. म्हणून ह्या चारही भावंडांनी नाथपंथ स्वीकारला. भाव्यांचे असे मत जरी असले तरी ज्ञानदेवांच्या वंशात नाथसंप्रदायाची दीक्षा परंपरेने झालेली दिसते.

तांत्रिक साधना हे मध्ययुगीन काळाचे वैशिष्ट्य होते. पंचमकार साधना हे तंत्रमार्गाचे वैशिष्ट्य होते. स्त्री हे अशा प्रकारच्या साधनेत अत्यावश्यक साधन मानले जात असे. शैव, शाक्त, कापालिक, सहजयान, वज्रयान, कौल वगैरे पंथांमधे वामाचार फैलावला होता. तंत्रातील सर्व घृणास्पद आचार अवलंबले जात होते. साधनेला अवकळा प्राप्त झाली होती. तत्कालीन साधनामार्गाला प्राप्त झालेले विकृत व भोगासक्त रूप नाहीसे करण्यासाठी नाथपंथातील संतांनी प्रथम विशुद्ध व निष्कलंक चारित्र्याचा आदर्श निर्माण केला. लोककल्याणाच्या तळमळीतून भारतभ्रमण केले व विषयासक्ती, अनाचार, दांभिकता, परमार्थाच्या नावाखाली चालणारा दुराचार अशा साधनामार्गाला लागलेल्या कलंकित गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला व योगसाधनेचे राज्य प्रस्थापित केले.

तसेच विविध संप्रदायातील उदात्त तत्वांचा आपल्या संप्रदायात समावेश केला. शुद्ध योगमार्गाला उचलून धरले. हठयोगाचे प्रतिपादन करून संयम, इंद्रियनिग्रह व ब्रह्मचर्य यांची अनिवार्यता पटवून दिली. वर्णाश्रमधर्म, रूढी, कर्मठपणा, तीर्थयात्रा इत्यादी धर्माच्या नावाखाली फोफावलेल्या आचारांना विरोध केला. त्यामुळे नाथसंप्रदाय हा केवळ वाणीचा विषय राहिला नाही. प्रत्यक्ष आचाराला यात प्राधान्य दिले गेले. अद्वयानंद अनुभवण्याचा मार्ग म्हणून पारमार्थिक लोक त्याकडे आकृष्ट झाले. त्यांच्या लोकोत्तर कार्यातूनच पुढे भारतीय साधनेत भक्तिप्रधान परंपरा निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत समाजाला भक्तिसूत्रात गुंफून ठेवण्याचे महत्वाचे कार्य गोरक्षनाथांनी केले. लोकभाषेतून समाजाला उपदेश, लोकभाषेतून ग्रंथलेखन, शिवाबरोबर दत्तात्रेयांना देवतासमूहात स्थान, योगमार्गाला दिलेली भक्तिप्रेमाची जोड ही गोरक्षनाथांच्या कार्याची विशेषता आहे. पुढे गहिनीनाथांनी नाथसंप्रदायाला कृष्णभक्तीची जोड दिली.

या संप्रदायाच्या मते शक्तियुक्त शिव हेच अंतिम सत्य आहे. शक्ति ही शिवाहून भिन्न नसून ती शिवस्वरूपी स्थित आहे. ती अखंड क्रियाशील असून ती कधी सूक्ष्म तर कधी स्थूल, कधी व्यक्त तर कधी अव्यक्त असते. तिच्या संकोच-विकासातून हे विश्वचक्र संचलित होत असते. शिवातील ‘इकार’ म्हणजे शक्ति असून तिच्या शिवाय ‘शिव’ हा केवळ ‘शव’ आहे.

शिवोऽपि शक्तिरहित: कर्तुं शक्तो न किञ्चन ।
स्वशक्त्या सहित: सोऽपि सर्वस्याभासको भवेत् ॥

स्वशक्तीने युक्तच शिव सर्व निर्माण करतो असा त्यांचा सिद्धांत आहे. गोरक्षनाथ सांगतात की
शिवस्याभ्यन्तरे शक्ति: शक्तेरभ्यन्तरे शिव: ।
अन्तरं नैव जानीयात् चन्द्रचन्द्रिकयोरिव ॥

चंद्रापासून चांदणे जसे भिन्न नाही त्याप्रमाणे शिवाहून शक्ति भिन्न नाही. जेव्हा ती विश्वरूपाने व्यक्त होते तेव्हा खर्‍या अर्थाने शिवच विश्वाचा निर्माता ठरतो. जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा शिवच स्वयंप्रकाश अद्वयरूप असतो. शिव-शक्ति नामभेदाने एक शिवस्वरूपच नांदत असते. ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली शक्ति मानवदेहात कुंडलिनीरूपाने स्थित आहे असा नाथसंप्रदायाचा विश्वास आहे. त्यामुळे नाथपंथी साधकाचे कुंडलिनी जागृत करून शिवशक्तीच्या समरसतेची सहजसमाधी अनुभवणे हेच उद्दिष्ट असते.

‘ब्रह्माण्डवर्ति यत्किञ्चित् तत्पिण्डेऽप्यस्ति सर्वथा’ जे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व पिंडात आहे असे सिद्धसिद्धांतसंग्रह मधे म्हटले आहे. तेव्हा सगुण-निर्गुणापलीकडील द्वैताद्वैतविलक्षण अशा परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधकाला पिंडज्ञानाची आवश्यकता आहे. पिंड ही ब्रह्मांडाची छोटी आवृत्तीच आहे. म्हणून नाथयोगी पिंडातच संपूर्ण चराचराचे ज्ञान करून घेतो. विविध पिंडांनी युक्त ब्रह्मांड हे ते व्यक्त असो वा अव्यक्त असो शक्तीहून भिन्न नाही आणि शक्ति ही शिवाहून भिन्न नाही. थोडक्यात शिव हाच जगाचा आत्मा आहे. म्हणून जीव व जगत् यांच्या अंतर्यामी असणार्‍या शिवाशी ऐक्यतेचा अनुभव घेणे याला समरसीकरण म्हणतात, हे अद्वयानंदवैभव नाथपंथाचे अंतिम ध्येय आहे. हे समरसीकरण साधणे म्हणजे कुंडलिनी जागृत करून समाधिस्थितीप्रत पोचणे.

ज्ञानदेवांनी सहाव्या अध्यायात यालाच ‘पिंडे पिंडाचा ग्रासु’ (६-२९१) असे म्हटले आहे. देहाच्या सहाय्य़ानेच विदेहस्थिती अनुभवणे म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करणे होय.

सांप्रदायिक वेश व आचार –

कर्णकुंडल, धंधारी, रुद्राक्षमाला, किंकरी, मेखला, जानवे, शृंगी, कंथा, दंडा, खापरी व आधारी असा नाथसंप्रदायातील साधूंचा पूर्वापार बाह्य वेश चालत आलेला आहे. धंधारी हे लाकडी किंवा लोखंडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छेदातून दोरा ओवायचा व मंत्र म्हणत काढायचा. धागा सोडवल्यास ईश्वर प्रसन्न होतो अशी या पंथाची धारणा आहे. रुद्राक्ष म्हणजे शिवाचा डोळा. पंचमुखी किंवा एकमुखी रुद्राक्षमालेत ३२, ६४, ८४ किंवा १०८ रुद्राक्ष असतात. मनगटातील स्मरणीत १८ किंवा २८ मणी असतात. किंकरी हे सारंगीसारखे वाद्य असते. जानवे हे मेंढीच्या लोकरीचे किंवा सुताचे बनवलेले असते. शृंगी बांधण्यास तिचा उपयोग होतो. शृंगी म्हणजे शिट्टी. ती हरिणाच्या शिंगाची, तांब्याची अथवा पितळेची असते. कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र असते. दीड हात लांबीच्या दंड्यास गोरक्ष दंडा अथवा भैरवदंडा म्हणतात. भिक्षेसाठी वापरावयाचा मडक्याचा किंवा नारळाच्या करवंटीचा अर्धा भाग म्हणजे खापरी. अधारी हे लाकडी दांड्यास खाली वर फळ्या ठोकून बसण्यासाठी केलेले आसन.

स्त्रीशूद्रादी भेदभाव निपटून काढून परमार्थमार्ग सर्वांना खुला करण्याचे अद्वितीय कार्य नाथपंथाने केले. त्यामुळे जातिभेदाची धार काही अंशी बोथट झाली. मुसलमान, वर्णभ्रष्ट यांनाही त्यांनी आपल्या पंथात प्रवेश दिला. या नाथपंथातील थोर विचारांचा वारसा घेऊन दया, क्षमा, शांती, बंधुता या उद्दात्त कल्पनांच्या पायावर भक्तीचे महान मंदिर उभे करण्यास कबीर, ज्ञानदेवादी संतांना प्रेरणा मिळाली.

देशी भाषांचा पुरस्कार हे या पंथाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतभर पसरलेल्या नाथ संप्रदायाने हिंदी, मराठी, बंगाली वगैरे देशी भाषेतून वाङ्मयनिर्मिती केली. लोकभाषातून पंथप्रचार व वाङ्मयनिर्मिती करण्याची परंपरा नाथसंप्रदायानेच प्रथम निर्माण केली. तीच परंपरा उत्तरकालीन गोरक्षनाथादी संतांनी चालवली.

नाथपंथाचा उगम उत्तरहिंदुस्थानात आहे. हे नाथपंथी साधु भारतभर धर्मजागृतीचे कार्य करीत असावेत असे दिसते. बंगाल, गुजराथ, कर्नाटक, वर्‍हाड, दक्षिण भारत वगैरे सर्व ठिकाणी यांचा संचार होता. या पंथाचे आदिगुरु प्रत्यक्ष आदिनाथ शंकर आहेत. म्हणून या संप्रदायाला नाथपंथ असे नाव मिळाले. सिद्धमत किंवा सिद्धमार्ग असेही या पंथाचे नाव आहे. कारण नाथ स्वत:सिद्ध असतात अशी त्यांची समजूत आहे. या मताचा ‘सिद्ध-सिद्धांत-पद्धती’ हा प्रामाणिक ग्रंथ आहे. नाथसंप्रदाय हा शैव संप्रदाय आहे व मूळ उपास्य देवता ‘आदिनाथ शंकर’ आहे.

नाथसंप्रदायाने योगमार्गावर अवास्तव भर दिला होता. सर्व समाजाला हा मार्ग अवलंबणे शक्य नव्हते. त्यामुळे नाथपंथातील उदात्त तत्त्वांचा वारसा घेऊन पुढील संतमहात्म्यांनी शुद्ध भक्तितत्त्वाच्या पायावर भक्तिपंथाची उभारणी केली. ज्ञानदेव त्यामधे अग्रणी होते.

सौ. मनीषा अभ्यंकर.

संदर्भ ग्रंथ –
१) सार्थ ज्ञानेश्वरी – सोनोपंत दांडेकर.
२) ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र – ल. रा. पांगारकर.
३) ज्ञानेश्वर दर्शन – वाङ्मयोपासक मंडळ अहमदनगर
४) महाराष्ट्र सारस्वत – कै. वि. ल. भावे
५) महाकैवल्यतेजा – इ साहित्य प्रतिष्ठान
६) ज्ञानदेव व नामदेव – डॉ. शं. दा. पेंडसे
७) श्री ज्ञानेश्वर – तत्त्वदर्शी आणि कवी – स्वामी शिवतत्त्वानंद – रामकृष्ण मठाचे प्रकाशन
९) लघुग्रंथत्रयी – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन
१०) लघुग्रंथसप्तक – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *