सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

176-17
तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं । कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ॥ 176 ॥
केवल स्वधर्म म्हणून, अन्य कशाच्याही इच्छेकरितां नव्हे अशा वैराग्यवृत्तीने ते तो यज्ञ सर्वांगानें सालंकृत म्हणजे यथासांग करतात. 76
177-17
परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें । कां तळहातींचें दीपें । रत्न पाहिजे ॥ 177 ॥
परंतु, आरशांत आपले स्वरूप जसे आपल्या डोळ्यांना दिसते किंवा तळहातावरील रत्नाची दिव्याने परीक्षा करावी. 77
178-17
नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारें । देखोनियां ॥ 178 ॥
किंवा सूर्योदय झाल्यावर आपला इच्छित अगर कोणताही मार्ग जसा स्पष्ट दिसतो तसा वेदाज्ञेचा निर्णय पाहून.78
179-17
bकुंडे, मंडप, वेदी व आणखी लागणाऱ्या सामग्रीची सिद्धता करितात; ती अशी कीं, जणू विधीने मूर्तरूपाने अवतरून ती स्वतःच केली आहे असे वाटावे. 79
180-17
सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें । तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ॥ 180 ॥
सर्व देहाचे अवयव यथा योग्य आभरणांनीं जसें श्रृंगारावे तशी यज्ञाची सर्व सामग्री जेथीच्या तेथे मांडतात.180

181-17
काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ॥181॥
त्याचे आणखी किती वर्णन करावें? यज्ञाच्या निमित्तानें, सर्व साहित्यासह साक्षात् यज्ञविद्याच तेथे अवतरली आहे असे वाटते.81
182-17
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनियां लागु । महत्त्वाचा ॥182॥
याप्रमाणे कोणताही विशिष्ट हेतु न बाळगतां जो सांगोपांग यज्ञ केला जातो. 82
183-17
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ॥183॥
फल, पुष्प, छाया यांपैकी कांहींही प्राप्ति नसलेली तुळशीची झाडं लोक जशीं पाटाच्या पाण्यावर रक्षण करतात. 83
184-17
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥184॥
किंबहुना, फलाशेवीण अशा दक्षतेनें जो यज्ञ केला जातो तो सात्विक म्हणावा. 84
185-17
आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचि{ऐ}सा । परी श्राद्धालागीं जैसा । अवंतिला रावो ॥ 185 ॥
अर्जुना, दुसरा जो राजस यज्ञ तोही विधि असाच असतो, पण श्राद्धाच्या दिवशी इष्ट पंगतीला राजाला आमंत्रण देण्यासारखे हे असतें. 85

186-17
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥ 186 ॥
राजा जर भोजनास आला तर पुष्कळच उपयोग होण्यासारखा असतो, लौकिकही वाढतो आणि श्राद्धही पार पडले 86
187-17
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ॥187॥
तसा तिहेरी हेतु मनांत बाळगून तो मनांत समजतो कीं, यज्ञफल म्हणून स्वर्ग ठेवलेलाच; दीक्षित म्हणून लोकांत मान मान्यता होणारच; आणि यज्ञासारखें महत्कार्य घडल्याचे श्रेयही मिळाले. 87
188-17
ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं । पार्था निष्पत्ति जे यागीं । राजस पैं ते ॥188॥
असा केवल फलाशेने व लोकांत प्रसिद्धि व्हावी म्हणून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ होय. 88
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ 17.13॥

189-17
आणि पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं । तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ ॥189॥
आणि पशु व पक्षी ह्यांच्या विवाहांत कामेच्छेवांचून दुसरा जस कोणी जोशी म्हणून लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला एक आग्रहावांचून अन्य कांहीं कारण लागत नाही. 89
190-17
वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसीं बिहे । आगी जरी ॥ 190 ॥
वाऱ्याला वाहण्यास काय मार्ग लागतो? मरणाला काय मुहूर्त पाहिजे? किंवा अग्नि काय पवित्र अपवित्र यास भितो? हें जर होत असेल तर- 190

191-17
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥191॥
तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा लागेल; पण अर्जुना, तो स्वतःच निर्बंधरहित आहे. 91
192-17
नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं ॥192॥
त्याला विधिची चाड नसते, मंत्राची गरज लागत नाही आणि त्या मंडपांत माशीच्या तोंडालाही अन्न लागत नाही. 92
193-17
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥193॥
ब्राह्मण जेथे डोळ्यासमोर नको, तेथे दक्षिणेचा प्रश्न कोठून येणार? आणि आगीला जसे वाऱ्याचे सहाय्य व्हावें. 93
194-17
तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखती श्रद्धेचें । नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर ॥194॥
त्याप्रमाणे पुष्कळ द्रव्य खर्च होऊनही तेथे श्रद्धेचा लेशही नसतो; म्हणजे निपुत्रिकाचे घर त्याच्यामागून वाटेल त्याने बळकवावें तसेच हे होय. 94
195-17
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥ 195 ॥
देव म्हणाले अर्जुना, ऐक बरे! असा जो यज्ञाभास ‘ (नाममात्र यज्ञ ) तो तामस यज्ञ. 95

196-17
आता गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं । एक मळीं एक आणी । शुद्धत्व जैसें ॥ 196 ॥
अरे, गंगोदक तेच; परंतु निरनिराळ्या प्रकारानें उपयोग केला म्हणजे गटारात सोडलेले अपवित्र होते, व दुसऱ्यानें तीर्थ म्हणून शुद्धता येते. 96
197-17
तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप । तें एक केलें दे पाप । उद्धरी एक ॥ 197 ॥
त्याप्रमाणे तपही तीन गुणांनीं त्रिधा झाले आहे. त्यांतील एकाचा आचार पापाला कारण होतो, तर एकाचा उद्धाराला कारण होतो, 97
198-17
तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी । जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण ॥198॥
तरी त्याचेच तीन भेद कोणते हे जाणावयाची इच्छा असेल तर, प्रथम तप म्हणजे काय हे समजून घे. 98
199-17
येथ तप म्हणजे काई । तें स्वरूप दाऊं पाहीं । मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों ॥199॥
आतां, तप म्हणजे काय ते प्रथम सांगून तीन गुणांनीं तें त्रिविध कसे झाले आहे हें मग सांगू 99
200-17
तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥200॥
तरी यथार्थ तपाचे, शरीर, मानसिक आणि शाब्द असे तीन भेद आहेत. 200

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 17th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Satarawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 17 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *